सरडा रंग का बदलतो?

 • First Published :13-May-2017 : 19:06:45 Last Updated at: 13-May-2017 : 19:20:13

 •  - गजानन दिवाण

  सरडा आपला रंग का बदलतो?

  - स्वत:ला वाचवण्यासाठी?

  दुसऱ्याला घाबरवण्यासाठी की 

  मादीला आकर्षित करण्यासाठी?

  पण एकाचवेळी तीन-तीन रंग 

  तो कसे तयार करतो?..

  - याचे उत्तर शोधण्यासाठी आमोदने 

  थेट साताऱ्यातील पठार गाठले. 

  रणरणत्या उन्हात त्यांना पकडण्याची

  कसरत करायची, 

  रोबोट सरड्यांसोबत प्रयोगशाळेत त्यांचा अभ्यास करायचा..

  या प्रश्नाचं उत्तर त्यानं शेवटी 

  शोधूनच काढलं..

  सरडा तीन-तीन रंगांची कसरत का करीत असतो? मानेच्या खाली असलेला पातळ पडदा वर-खाली का होतो? सरड्याची ही कसरत आम्ही नेहमी अनुभवत असतो आणि त्याचा आनंदही घेत असतो. पण हे असे का, असा प्रश्न फारसा कोणाला पडत नाही. पडला तरी त्याचे उत्तर शोधण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधील संशोधक आमोद झांबरे आणि डॉ. मारिया ठाकर यांना हा प्रश्न पडला आणि एक वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांनी यावर उत्तरही शोधले. सुपरब फॅन थ्रोटेड लिझार्ड हे इंग्लिश कॉमन नाव आणि सरडा सुपरबा या लॅटीन नावाच्या सरड्यावर या द्वयींनी संशोधन केले आणि ‘अ‍ॅनिमल बिहेविअर’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नलमध्ये पेपर प्रकाशित केला. 

  निसर्गात वेगवेगळे रंग आढळतात. तसे ते प्राण्यांतही आढळतात. वेगवेगळे प्राणी त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करीत असतात. कोणी स्वत:ला वाचविण्यासाठी त्याचा वापर करतो. कोणी दुसऱ्याला घाबरविण्यासाठी, तर कोणी मादीला आकर्षित करण्यासाठी या रंगांचा वापर करतो. त्यातही पुन्हा हाच रंग का? हा रंग तयार कसा केला जातो? हा सरडा तर एकाचवेळी तीन-तीन रंग कसे तयार करतो? त्याचे कारण काय? - अशा अनेक प्रश्नांनी पुण्याचा रहिवासी असलेल्या आमोदला अस्वस्थ केले. प्राण्यांसाठी रंग तयार करणं फार महागडं असतं. विशेषत: यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. उगीच करमत नाही म्हणून रंग तयार करीत नाही. उदाहरणार्थ काही फुलपाखरं हे भडक रंग दाखवून आपल्या हल्लेखोरांना मी किती विषारी आहे दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. काही प्राणी भडक रंग दाखवून त्यांच्या माद्यांना आकर्षित करतात. या सरड्याचे कारण काय, याचे उत्तर शोधण्यासाठी आमोदने सातारा जिल्ह्यातील पठार गाठले. 

  सरड्याचा अभ्यास करायचा तर मग सुपरब फॅन थ्रोटेड लिझार्डच का? सरड्याच्या या प्रजातीशी निगडित जवळपास दहाएक प्रजाती आढळतात. या सर्वांत सुपरब फॅन थ्रोटेड लिझार्ड हा कलरफुल आणि आकाराने मोठा आहे. हा भारत, नेपाळ, श्रीलंकेत आढळतो. साताऱ्याच्या पठारात तो मोठ्या संख्येने आढळतो. त्यामुळे हेच ठिकाण आणि हाच सरडा निवडल्याचे आमोद सांगतो. या सरड्याच्या गळ्याच्या खाली लोंबणारी त्वचा (ड्युलाप) नारंगी, काळा आणि निळा अशा तीन रंगांची आहे. सरड्यांमधील मीलनाच्या आधी हे रंग तयार होत असावेत आणि मादीला आकर्षित करण्यासाठीच हे रंग असावेत, असे त्याला वाटायचे. पण, मग एकाचवेळी तीन रंग का? एकच का नाही? त्याच्या अभ्यासाचा हाच विषय होता. 

  सरड्याला मुख्य अडचण असते स्वत:ची जागा निर्माण करण्याची. वाघासारखाच नर सरडाही स्वत:ची जागा स्वत: शोधत असतो. या परिसरात दुसऱ्या नराला तो येऊ देत नाही. ही जागा मिळविण्यासाठी नर सरड्यांमध्ये प्रचंड भांडणे असतात. हा परिसर माझा आहे आणि त्यात कोणीही घुसखोरी करायची नाही, हे समोरच्या सरड्याला सांगायचे असते. ते सांगायचे कसे? गळ्याच्या खालची त्वचा उडवून हा नर सरडा समोरच्या सरड्यावर गुरगुरत असतो. तो याद्वारे संवाद साधत असतो म्हणजेच भांडत असतो. मादीला आकर्षित करण्याचीही पद्धत हीच, फक्त रंग वेगळा. 

  या सर्वांचा अभ्यास कसा करणार? दोन सरडे समोर ठेवून हे शक्य नव्हते. यावर आमोदने उपाय शोधला. सरड्यासारखे दिसणारे आणि त्यांच्यासारखेच लोंबणारी त्वचा उडविणारे रोबोट त्याने तयार केले. या रोबोटना प्रत्यक्ष सह्याद्रीच्या रांगांत कधीच नेले नाही. साताऱ्यातच एक छोटीशी लॅब तयार करण्यात आली. त्यात काचेची पेटी ठेवण्यात आली. पठारावरून सरडे पकडून आणायचे व या पेटीत ठेवायचे. रोबोटला कातडीऐवजी नारंगी, काळा आणि निळा असे तीन ड्युलाप लावण्यात आले. पेटीच्या दोन्ही बाजूला दोन रोबोट ठेवून देण्यात आले. नंतर हे रोबोट नर आणि मादी सरड्याला दाखविण्यात आले. मग लक्षात आले की मादी फक्त नारंगी रंगाकडे आकर्षित होते. निळ्या रंगाचे तिला फारसे आकर्षण नव्हते. नर सरडा काळा आणि निळा रंग दिसताच संवाद साधू लागला. नारंगी रंगाचे त्याला फारसे देणेघेणे नव्हते. हे सरडे मार्चपासून जूनपर्यंत प्रचंड चपळ असतात आणि दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत तेवढेच गतिशील असतात. साताऱ्याच्या पठारावर मार्च-एप्रिलमध्ये दुपारी ११ ते १ दरम्यान साधारण ४५ अंश डिग्री सेल्सिअस तपमान असते. अशा भर उन्हात एकावेळेला चार ते पाच सरडे पकडायचे आणि अभ्यासानंतर त्यांना सोडून द्यायचे. कारण सरड्यांना त्रास होऊ द्यायचा नाही, ही काळजीदेखील तेवढीच महत्त्वाची होती. या प्रकल्पासाठी आमोदने साधारण दोनशेवर सरड्यांचा अभ्यास केला.

  आता शोध प्राण्यांच्या रंगांचा..

  आमोद झांबरे सध्या अमेरिकेत युनिव्हर्सिटी आॅफ मिनीसोटामध्ये पीएच.डी. करीत आहे. २८ वर्षांचा आमोद मूळचा पुण्याचा आहे. तो बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्ये सेंटर फॉर इकॉलॉजीकल सायन्सशी जोडला गेलेला असून, या विभागाच्या प्रोफेसर डॉ. मारिया ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. ज्येष्ठ संशोधक वरद गिरी हे आमोदचे गुरुजी. गिरी यांच्या बोटाला धरूनच त्याने या क्षेत्रातले सुरुवातीचे धडे गिरवले आहेत. सध्या सरड्याच्या फक्त एका प्रजातीवर संशोधन केले आहे. इतर प्रजातींमध्ये काही कॉमन आहे का, ते शोधता येईल का, याचा आता आमोद शोध घेणार आहे. अनेक प्रकारचे प्राणी रंग का तयार करतात आणि त्याचा वापर कशासाठी करतात याचाही शोध आमोदला घ्यावयाचा आहे. हा प्रकल्प त्याची सुरुवात आहे.

  सरडे रंग कसा तयार करतात?

  प्राण्यांना वेगवेगळे रंग वेगवेगळ्या पद्धतीने तयार करावे लागतात. प्राण्यांमध्ये मूळत: दोन प्रकारचे रंग असतात. स्ट्रक्चरल कलर आणि पिगमेंट. पहिल्या प्रकारात प्राण्यांच्या त्वचेखाली असलेल्या पेशींचा आकार आणि ठिकाणावरून रंग ठरत असतो. पिगमेंट म्हणजे रासायनिक रंग. आता सरड्याच्या बाबतीत बोलायचे तर नारंगी हा रासायनिक रंग आहे. प्राथमिक अभ्यासानुसार सरड्यांना नारंगी रंग तयार करता येत नाही. ते जे किडे खातात, त्यातून हा रंग सरडे एकत्र करतात आणि त्याचा ड्युलापमध्ये वापर करतात. मात्र, काळा आणि निळा रंग त्यांना पेशीच्या माध्यमातून तयार करता येतो. पिगमेंट खाण्याच्या माध्यमातून तयार करता येतात. याचा अर्थ सरडा जेवढे खाईल, तेवढा तो नारंगी होईल म्हणजेच तेवढाच तो धष्टपुष्ट होईल. मादी सरड्याला हेच हवे असते. आपली पुढची पिढी चांगली जन्माला यावी यासाठी ती अशाच सरड्याच्या शोधात असते. त्यामुळे अशा सरड्यांना अधिकाधिक माद्या आकर्षित होत असतात. दोन नरांमध्ये भांडण सुरू झाल्यास निळा रंग वापरला जातो. या रंगातूनच राग-संताप व्यक्त केला जातो. तुम्ही जितके कलरफुल तेवढे देखणे. तेवढेच माद्यांसाठीही आकर्षण असते. रंगीबेरंगी असण्याचे हे फायदे असले तरी तोटाही आहे. रंगीबेरंगी दिसण्यामुळे शत्रू प्राणी-पक्षी सहज शोधून हल्ला करू शकतात. ते जिवावर बेतणारे असते. त्यामुळे रंगीबेरंगी असण्याची सरड्यांना मोठी किंमत मोजावी लागते. मादी सरड्याला एकदम छोटे ड्युलाप असते. त्यावर कुठलाच रंग नसतो. मादी नराशी कधीच भांडत नसली तरी सारख्याच वा इतर प्रजातींच्या मादींशी ती प्रचंड भांडत असते. थोडक्यात ती भांडकुदळच असते.

  सरड्याच्या प्रजातीला धोका

  सातारा जिल्ह्यातील पठारावर आता खूप ठिकाणी पवनचक्क्या लावल्या जात आहेत. त्यामुळे या सरड्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. रस्त्यावर येऊन गाड्यांखाली मरणाऱ्या सरड्यांची संख्या वाढली आहे. स्वत:ला डिस्प्ले करण्यासाठी म्हणजे मी कोण हे दाखविण्यासाठी या सरड्याला मोठे दगड लागतात. पवनचक्क्यांमुळे हे दगड फोडले जात आहेत. त्याचाही परिणाम या सरड्यांच्या संख्येवर होण्याची शक्यता आहे.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS