हिमालयाच्या हाका .. तरीही येतीलच!

By admin | Published: May 2, 2015 06:29 PM2015-05-02T18:29:49+5:302015-05-02T18:29:49+5:30

एव्हरेस्टचे दुसरे नाव आव्हान. या आव्हानाला भिडण्यातला आनंद खरोखर विरळा. मीही त्या हिमालयाला जाऊन भिडलोय. अनेकदा. पण .. 25 एप्रिलचा तो दिवस. नि:शब्द करणारा.. आतून पुरता हलवून टाकणारा..

Hailahalah's call will still come! | हिमालयाच्या हाका .. तरीही येतीलच!

हिमालयाच्या हाका .. तरीही येतीलच!

Next
सुरेंद्र चव्हाण
 
 शब्दांकन : पराग पोतदार
एव्हरेस्टचे दुसरे नाव आव्हान. या आव्हानाला भिडण्यातला आनंद खरोखर विरळा. 
मीही त्या हिमालयाला जाऊन भिडलोय. अनेकदा. पण .. 25 एप्रिलचा तो दिवस. नि:शब्द करणारा.. 
आतून पुरता हलवून टाकणारा.. 
त्यादिवशी एव्हरेस्टवर जे काही घडले ते अकल्पित आणि अनाकलनीय. विचार कुंठीत करणारे. मन सुन्न करून सोडणारे. 
मी स्वत: गिर्यारोहणाचे सारे वातावरण अनुभवलेले आहे. त्यामुळे तिथे पावलापावलावर जिवाची भीती असते हे खरेच. ‘रिस्क हाच आपला सच्च साथीदार असतो. पण त्यावर मात करतच सारेजण पुढे चाललेले असतात. पण एखादा दिवस मात्र काळदिवस बनून येतो तो असा. 
तो दिवस आठवला तरी अंगावर अक्षरश: काटा येतो. त्याचा व्हिडीओ पाहून तर आणखीनच हादरून जायला झाले. कारण त्यात ती घोंघावत येणारी लाट प्रत्यक्षात दिसते आणि लोकांची जीव वाचवण्यासाठी चाललेली प्रचंड धडपडदेखील. त्यादिवशी एव्हरेस्टच्या बेसकॅम्पवर असलेल्या गिर्यारोहकांच्या मनात असेल हिमालयाला भिडण्याचे आव्हान.. एव्हरेस्टवर पाऊल ठेवण्याची ऊर्मी. मनात हुरहुर, थोडीशी भीती आणि एक पॅशनही. 
पण हिमालयाच्या मनात मात्र काही औरच. 
एक मोठा आवाजदेखील हिमप्रपातासाठी पुरेसा असतो. 
इथे तर धरणीच हलली..
एका बेसावध क्षणी तीनही बाजूंनी बर्फाच्या अजस्त्र लाटा आल्या आणि एव्हरेस्ट बेसवरच्या तंबूतले गिर्यारोहक  त्याखाली अक्षरश: गाडले गेले.
अशा वेळी मानसिकदृष्टय़ा आपण कितीही खंबीर असलो, विविध प्रशिक्षणो घेतलेली असली आणि कितीही वर्षाचा गिर्यारोहणाचा अनुभव गाठीशी असला तरीही अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कुणाचे काय चालणार? 
अशी नैसर्गिक आपत्ती, तीदेखील इतक्या मोठय़ा स्वरूपात येते तेव्हा कुठेही हालचाल करायचादेखील अवकाश मिळत नसतो. अशावेळी तुमचे गिर्यारोहणाचे कौशल्य अजिबात कामी येऊ शकत नाही. त्यामुळे जे लोक त्या आपत्तीतही बचावले ते खरोखर नशिबवान. त्यांचे दैव ख:या अर्थाने बलवत्तर..!
एव्हरेस्टवर मी आजवर केलेल्या मोहिमांमध्ये असा अनुभव मला कधी आलेला नाही. अथवा भूकंपाचाही अनुभव कधी आलेला नाही. परंतु हिमालयावर जाण्यापूर्वी शिवलिंग शिखर मोहीम करत असताना मात्र अॅव्हलाँच कोसळणं हा काय प्रकार असतो तो मी प्रत्यक्षात अनुभवला होता. अर्थात तो भूकंपामुळे नव्हता, परंतु आम्ही भूकंपप्रवण क्षेत्रतूनच फिरत होतो. त्यामुळे त्याक्षणी वाटलेली भीती, जिवाचा उडालेला थरकाप मी अनुभवलेला आहे. तिथं आमची जर ही स्थिती झाली होती तर एव्हरेस्ट बेसकॅम्पवर अजस्त्र बाहूंनी येणारा मृत्यू कसा असेल याची आपण फक्त आणि फक्त कल्पनाच करू शकतो. 
माङया गिर्यारोहणाच्या अनुभवावरून मी एक सांगू शकतो की मुळात अशा बर्फाळ प्रदेशात केव्हा हिमप्रपात होईल हे सांगताच येत नाही. जेव्हा जमीनच भूकंपाने हलू लागते तेव्हा दगडावरचा बर्फ निघायला कितीसा वेळ लागणार? त्यातून तो कुठल्या बाजूने कसा आणि किती प्रमाणात निघेल याविषयी कुणीच काहीही सांगू शकत नाही. मोठय़ा आवाजानेही अॅव्हलाँज ट्रिगर होण्याच्या अनेक घटना यापूर्वीही एव्हरेस्टवर घडलेल्या आहेत. त्यामुळे या भूकंपानंतर तिथे काय घडलं असेल आणि त्याची भयानकता काय असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. या अपघातानंतर जे वाचले त्यांनी पुन्हा मोहीम सुरू ठेवण्याचा आततायीपणा केला नाही ते एका अर्थी फार बरे झाले अन्यथा पुन्हा त्यांनाही जीवाचा धोका होताच. कारण भूकंप होऊन गेला असला तरी येणा:या काही दिवसांमध्ये ही पडझड अशीच होत राहण्याची दाट शक्यता आहे. 
आता प्रश्न उरतो यानंतर पुढे काय? हिमालयाचे हे रौद्ररूप पाहिल्यानंतर आता गिर्यारोहकांचे पुन्हा तिथे जाण्याचे धाडस होईल का? हिमालयाचे ग्लॅमर कमी होईल का? ..  तर माङयामते, असे काहीही होणार नाही. हिमालयाची ओढ आहे तशीच कायम राहिल आणि हिमालयाविषयीचे आकर्षणही. कारण जे गिर्यारोहक आहेत त्यांना एव्हरेस्ट कायम खुणावत राहणारच. त्यात कितीही अडचणी, आव्हाने आणि अशा दुर्घटना आल्या तरीही.. आणि त्यामुळेच हिमालयाच्या ओढीने लोक पुढे जाणारच.
जे घडले ते खचितच वाईट. परंतु निसर्गापुढे कुणाचे काय चालणार? हे लक्षात ठेवूनच आपले प्रत्येक पाऊल पुढे टाकायचे. 
 
(लेखक एव्हरेस्टवीर आहेत.)

Web Title: Hailahalah's call will still come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.