एसटीत इलेक्ट्रॉनिक मशिन घोटाळा

By admin | Published: September 3, 2015 02:17 AM2015-09-03T02:17:33+5:302015-09-03T02:17:33+5:30

एसटी प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीची इलेक्ट्रॉनिक तिकिट यंत्रे आणली. हे काम देताना अनेक अटी धाब्यावर बसविल्याने त्यावेळी एसटी प्रशासनाने चौकशी करून काही

ST electronic electronic machine scam | एसटीत इलेक्ट्रॉनिक मशिन घोटाळा

एसटीत इलेक्ट्रॉनिक मशिन घोटाळा

Next

मुंबई : एसटी प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीची इलेक्ट्रॉनिक तिकिट यंत्रे आणली. हे काम देताना अनेक अटी धाब्यावर बसविल्याने त्यावेळी एसटी प्रशासनाने चौकशी करून काही अधिकाऱ्यांना निलंबितही केले होते. या प्रकारानंतरही आता पुन्हा एकदा यात घोटाळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रायमॅक्स कंपनीची मुदत संपलेली असतानाही ते स्वत:च्या ताब्यात न घेता पुन्हा निविदा काढण्यात आली आणि त्यामध्ये ट्रायमॅक्स कंपनीलाच हे काम मिळेल, अशा अटी निविदांमध्ये नमूद करण्यात आल्या. याची माहिती एसटीच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर याची चौकशी करावी आणि ते काम रद्द करावे, असे पत्रच परिवहन मंत्र्यांना देण्यात आले आहे. परंतु याची माहिती नसल्याचे सांगत एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनाच याबाबत विचारा, असे परिवहन मंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
महामंडळाने २00९ साली ट्रायमॅक्स कंपनीची इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिन्स आणल्या. एसटी प्रशासन आणि ट्रायमॅक्स कंपनीत झालेल्या करारानुसार वर्षाला ७५ कोटींपेक्षा अधिक तिकिटे विकली गेल्यास प्रत्येक तिकिटामागे २१ पैसे दराने ट्रायमॅक्सलाच रक्कम मिळणार. ७५ कोटींपेक्षा कमी तिकिटे विकली गेल्यास नुकसानभरपाई म्हणून एसटी प्रशासन ट्रायमॅक्सलाच भरपाई देणार. हा अजब करार करताना एसटी महामंडळाने स्वत:च्या फायद्याचा विचार केलाच नाही. ही सेवा राबविण्यासाठी एसटीकडून समन्वय समिती नेमण्यात आली होती आणि या समितीत असणाऱ्या एसटीच्या अधिकाऱ्यांनी फसविल्याने एसटीने प्रचंड नुकसान सहन केले होते.
असे असतानाही महामंडळाने ट्रायमॅक्सला फायदा होईल, असाच काहीसा प्रकार केल्याचे एसटीच्या मुख्य सुरक्षा व दक्षता विभागाने पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. हे पत्र परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते आणि एसटी व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांना पाठवण्यात आले आहे. ट्रायमॅक्स कंपनीसोबत असलेली पाच वर्षांची मुदत २0१४च्या डिसेंबरमध्ये संपली. मुदत संपलेली असतानाही एसटीने हे काम आपल्या ताब्यात न घेता निविदा काढली आणि ट्रायमॅक्सलाच पुन्हा काम मिळेल, अशातऱ्हेने अटी तयार केल्या. तसेच यापूर्वी प्रत्येक तिकिटामागे थेट ४१ पैसे एवढी वाढ दिली. या संशयास्पद व्यवहाराची माहिती घेऊन ट्रायमॅक्सला हे काम देण्यात येऊ नये, असे परिवहन
मंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद असल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: ST electronic electronic machine scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.