नीरजाचे कुटुंब निर्मात्यांविरोधात जाणार न्यायालयात

By Admin | Published: May 23, 2017 03:45 PM2017-05-23T15:45:12+5:302017-05-23T15:45:12+5:30

विमान अपहरणकर्त्यांच्या कचाट्यातून प्रवाशांची सुटका करणाऱ्या नीरजा भानोत हिच्या आयुष्यावर बेतलेल्या नीरजा चित्रपटाने निर्मात्याला गलेलठ्ठ कमाई करून दिली

Neeraj's family to go against court | नीरजाचे कुटुंब निर्मात्यांविरोधात जाणार न्यायालयात

नीरजाचे कुटुंब निर्मात्यांविरोधात जाणार न्यायालयात

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - जिवाची पर्वा न करता विमान अपहरणकर्त्यांच्या कचाट्यातून प्रवाशांची सुटका करणाऱ्या नीरजा भानोत हिच्या आयुष्यावर बेतलेल्या नीरजा चित्रपटाने निर्मात्याला गलेलठ्ठ कमाई करून दिली. नीरजा चित्रपटाच्या निर्मात्यानं चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्या चित्रपटातील काही हिस्सा नीरजाच्या कुटुंबीयांना देण्याचंही मान्य केलं होतं. मात्र पैसा हातात मिळताच नीरजा चित्रपटाच्या निर्मात्यानं कुटुंबीयांना त्यांचा हिस्सा देण्यास नकार दिला. त्यामुळे नीरजाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा निर्मात्यानं ठरवलेला वाटा मिळावा, यासाठी कुटुंब न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. 

नीरजाने 5 सप्टेंबर 1986 रोजी स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन प्रवाशांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवलं. त्यामुळे नीरजाच्या धाडसाचे जगभरात कौतुक करण्यात आले होते. देशाची शूरवीर मुलगी म्हणून नीरजाचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. तिला मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करण्यात आले होते. नीरजा चित्रपटाच्या निर्मात्यांनी नीरजाच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचे ठरवले. त्यासाठी नीरजाच्या कुटुंबीयांची परवानगीही मिळवली. तसेच या चित्रपटातून मिळणाऱ्या एकूण कमाईतील 10 टक्के हिस्सा भानोत कुटुंबीयांना देण्यासंबंधी करारही करण्यात आला.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने यात नीरजाची भूमिका निभावली आहे. जगभरात अल्पावधीतच हा चित्रपट हिट झाला. नीरजाने तब्बल 125 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर निर्माता आणि भानोत यांच्यात झालेल्या करारानुसार 125 कोटींपैकी 10 टक्के रक्कम मिळणे भानोत कुटुंबाला अपेक्षित होते. पण निर्मात्याने ते अद्यापपर्यंत दिलेले नाहीत. यामुळे निर्मात्याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी भानोत कुटुंबाने केली आहे. नीरजाच्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही ही लढाई लढणार असल्याचे नीरजाचा भाऊ अनीश भानोत याने सांगितलं आहे. 

Web Title: Neeraj's family to go against court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.