बाहुबलीचं वादळ थांबता थांबेना, तब्बल 1500 कोटींची कमाई

 • First Published :19-May-2017 : 15:22:31

 • ऑनलाइन लोकमत
  मुंबई, दि. 19 - 'बाहुबली 2' चित्रपटासोबत आलेलं वादळ थांबण्याचं नाव घेत नसून चित्रपटाने आपल्या नावावर असे काही रेकॉर्ड केलेत जे तोडणं सहजासहजी शक्य नाही. चित्रपटाने 1500 कोटींचा पल्ला गाठला असून कमाईच्या बाबतीत शिखर गाठलं आहे. आतापर्यंत 100 कोटी कमावल्यावर जंगी पार्टी करणा-या बॉलिवूडकरांनी तर तोंडात बोटं घातली आहेत. चित्रपटाने 1500 कोटींची कमाई केली असून अद्यापही घोडदौड सुरु आहे. हा आकडा नेमका कितीपर्यंत पोहोचणार आहे हे येणारी वेळ सांगेल. 
   
  'बाहुबली 2' ने याआधीच 1000 कोटींची कमाई करत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होण्याचा मान मिळवला आहे. एस. एस. राजामौली यांचा 'बाहुबली 2' हा बहुप्रतिक्षित सिनेमा 28 एप्रिलला प्रदर्शित झाला. अखेर दोन वर्षांनंतर प्रेक्षकांना कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं. बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.  'बाहुबली 2' या सिनेमाची जादू केवळ भारतातच नाही तर सात समुद्रापारही पाहायला मिळत आहे. एकट्या अमेरिकेत 100 कोटींची कमाई करणारा बाहुबली हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरला आहे. तर जगभरात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करण्याचा मानही या चित्रपटाने पटकावला आहे. 
   
  सगळ्या रेकॉर्ड्सना अक्षरक्ष: पायदळी तुडवत बाहुबलीची वाटचाल सुरु आहे. रिलीज होण्याआधीच 500 कोटींची कमाई करणा-या चित्रपटाची लोकांना प्रचंड उत्सुकता होती. भारतात 6500 आणि जगभरातील किमान 9000 स्किन्सवर 'बाहुबली 2' रिलीज झाला. चित्रपटाची चित्रपटाने फक्त दोन दिवसांत तब्बल 599 कोटींची कमाई केली होती. 
   
   चित्रपटाने पहिल्या दिवसापासून रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली होती. बाहुबलीने पहिल्याच दिवशी भारतात 121 कोटी आणि जगभरात 217 कोटींची कमाई केली. आपली घोडदौड सुरु ठेवत दुस-या दिवशीही चित्रपटाने भारतात 285 कोटी तर जगभरात 382 कोटींची कमाई केली. 
   
  'बाहुबली : द बिगिनिंग हा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं होतं. मात्र कटप्पाने बाहुबलीला का मारलं ?, या प्रश्नाचं उत्तर या सिनेमात अपूर्ण राहिलं. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलची सर्वांना उत्सुकता लागली होती. 
   
  एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया, सत्यराज, रम्या कृष्णन यांच्या भूमिका आहेत. 
   


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS