हॅण्डसम नायक

By admin | Published: April 28, 2017 01:24 AM2017-04-28T01:24:51+5:302017-04-28T06:35:49+5:30

सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा आघाडीचा ‘हॅण्डसम’ नायक, भौतिक जीवनाचा वीट येऊन विरक्तीकडे वळलेला संन्यासी

Handsome hero | हॅण्डसम नायक

हॅण्डसम नायक

Next
>सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा आघाडीचा ‘हॅण्डसम’ नायक, भौतिक जीवनाचा वीट येऊन विरक्तीकडे वळलेला संन्यासी, तब्बल चार वेळा लोकसभेवर निवडून गेलेला यशस्वी राजकारणी आणि उत्तरार्धात पुन्हा चंदेरी पडद्यावर झळकणारा अभिनेता, असे वर्तूळ विनोद खन्ना यांनी त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात पूर्ण केले. त्यांच्या बहुआयामी कारकिर्दीचा हा संक्षिप्त आढावा...
विनोद खन्ना यांचा जन्म ६ आॅक्टोबर १९४६ला पेशावर येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यावसायिक होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. त्यांचे शिक्षण मुंबई, दिल्ली आणि नाशिकमध्ये झाले. शिक्षण घेत असतानाच ते ‘मुघल-ए-आझम’, ‘सोलवा साल’ यांसारख्या चित्रपटांनी प्रभावित होऊन त्यांनी अभिनयात करियर करण्याचे ठरवले.
सुनील दत्त यांच्या ‘मन का मीत’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या काही चित्रपटांत त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. ‘पूरब और पश्चिम’, ‘आन मिलो सजना’, ‘सच्चा झुठा’ या चित्रपटांतही त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या.
‘हम, तुम और वो’ या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा नायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते ‘मेरे अपने’ या चित्रपटात झळकले. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची जोडी अधिक गाजली. ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘परवरिश’, ‘हेरा फेरी’, ‘अमर अकबर एन्थॉनी’ असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्या काळात त्यांना अमिताभ यांच्यापेक्षा अधिक मानधान मिळायचे, असेही म्हटले जाते. नुकतेच त्यांनी ‘दिलवाले’, ‘दबंग २’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले होते.

‘मन का मीत’ का चित्रपट
प्रदर्शित झाल्यावर केवळ एका आठवड्यात विनोद खन्ना यांनी १५ चित्रपट साइन केले. या यशानंतर त्यांनी आणि गीतांजलीने लग्न करायचे ठरवले. पण अभिनेता असल्याने कोणीच त्यांना घर विकायला तयार नव्हते. अखेर त्यांना एक घर मिळाले, त्यानंतर त्यांचा विवाह झाला.

वडिलांनी रोखली होती विनोद खन्नांवर बंदूक
कॉलेजमध्ये विनोद खन्ना यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले. कॉलेजमध्ये असतानाच एका पार्टीत सुनील दत्त यांच्याशी त्यांची भेट झाली. त्याच पार्टीत त्यांनी चित्रपटात काम करण्याची आॅफर दिली. पण चित्रपटात काम करण्यास त्यांच्या वडिलांचा विरोध होता. त्यांनी विनोद खन्ना यांच्या डोक्यावर अक्षरश: बंदूक रोखली होती. पण आईने त्यांना समजावले आणि विनोदला चित्रपटसृष्टीत येण्याची संधी मिळाली.
विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी कुर्बानी, शंकर शंभू, दयावान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ते दोघे खूप चांगले मित्र होते. विशेष म्हणजे, विनोद खन्ना यांचे निधन २७ एप्रिल २०१७ला कर्करोगाने झाले, तर फिरोज खान यांचे निधन बरोबर आठ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २७ एप्रिल २००९ रोजी कर्करोगानेच झाले होते. ‘कुर्बानी’ या चित्रपटातील ‘ईश्वर का दुसरा नाम दोस्ती है,’ हा संवाद आज त्यांच्या मैत्रीसाठी चपखल ठरला.
-विनोद खन्ना लहानपणी खूपच लाजाळू होते. शाळेत असताना एका टीचरने त्यांना नाटकात काम करण्यास भाग पाडले होते. मात्र विनोद यांनी कौतुकास्पद असा अभिनय करून सर्वांचीच वाहवा मिळवली होती.
-विनोद यांनी अचानकच ओशो आश्रमात जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची पत्नी गीतांजली निराश झाली होती. पुढे दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांना अक्षय आणि राहुल अशी दोन मुले आहेत. पुढे विनोद यांच्यात चित्रपटांविषयीचे आकर्षण पुन्हा वाढले. १९८७मध्ये त्यांनी ‘इन्साफ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.
-१९९०मध्ये विनोद यांनी कविताबरोबर दुसरा विवाह केला. कविता आणि विनोद यांना साक्षी आणि श्रद्धा नावाच्या दोन मुली आहेत.
यशस्वी राजकारणी
विनोद खन्ना यांनी पहिल्यांदा १९९९मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर पंजाबमधून निवडणूक लढवली आणि लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी एकूण तब्बल 
चार वेळा खासदारकी भूषविली. तसेच केंद्रात राज्यमंत्री म्हणूनही काम केले. राजकारणी म्हणूनही त्यांची कारकिर्द यशस्वी आणि लोकप्रिय ठरली.
एफटीआयआयमध्ये आठवणींना उजाळा-
दिग्गज अभिनेता असूनही कोणतीही प्रौढी नाही... विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी मिळून-मिसळून वागणारे... आश्वासक वातावरण निर्माण करण्याचे कसब, अशा अभिनेत्याच्या विविध आठवणींना एफटीआयआयमध्ये उजाळा मिळाला. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना एफटीआयआयच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विनोद खन्ना २००१ ते २००५ या काळात संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. विनोद खन्ना यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास या वेळी छायाचित्रांच्या माध्यमातून झळकला. 

प्रतिक्रिया-
लोकप्रिय अभिनेते, समर्पित नेते - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपट अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांच्या निधनाबद्दल बुधवारी तीव्र दु:ख व्यक्त केले. लोकप्रिय अभिनेते आणि समर्पित नेते म्हणून ते कायम स्मरणात राहतील, असे मोदी म्हणाले. त्यांच्या निधनाने दु:ख झाले, असे टिष्ट्वट त्यांनी केले. 
 
दैवी देणगी लाभलेला अभिनेता - सोनिया
अभिनयाची दैवी देणगी लाभलेले अभिनेते म्हणून विनोद खन्ना कायम स्मरणात राहतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिली.
 
लोकसभा अध्यक्षांना दु:ख
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. विनोद खन्ना यांच्या अकाली मृत्यूने अतीव दु:ख झाले. मृदू आणि भावनाशील अभिनेत्याच्या रूपात जगभरातील चाहत्यांचे मन जिंकणारे विनोद खन्ना ज्येष्ठ आणि निष्ठावान राजकारणी असण्यासह एक प्रतिभावंत अभिनेतेही होते, असे महाजन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले.
 
हॅण्डसम, उत्कृष्ट अभिनेता यांना आज आपण गमावले आहे. - श्रद्धा कपूर
 
तुमचे चित्रपटसृष्टीतील कार्य आमच्या सर्वांसाठी खूप मोलाचे ठरेल. तुमच्या अभिनयाची जादू दीर्घकाळ आमच्यासोबत असेल.
- साजिद खान

विनोद खन्नांसारखा कुल आणि गुडलुकिंग अभिनेता होणे नाही. खरंच तुम्हाला सॅल्युट. 
- वरुण धवन

बेधडक आणि गुडलुकिंग अभिनेता. त्यांच्या अभिनयाने संपूर्ण सृष्टीला मोहून टाकले आहे. - बाबा सेहगल
विनोद खन्ना सर गेल्याचे कळताच फार वाईट वाटले. सळसळत्या उत्साहाच्या अभिनेत्यांपैकी ते एक होते. त्यांनी जो काळ गाजवला तो आता त्यांच्यासोबतच संपला आहे. - अक्षय कुमार

आम्ही लहानपणापासून त्यांचाच अभिनय पाहत आलो आहोत. - करण जोहर
माझा प्रिय मित्र विनोद खन्ना... तुझी खूप आठवण येईल. 
- रजनीकांत
 
तू नेहमीच माझा ‘अमर’ राहशील मित्रा. - ऋषी कपूर


विनोद खन्ना खऱ्या अर्थाने माझा जवळचा मित्र होता. मला पाठिंबा देणारा आणि माझे सर्वांत आवडते व्यक्तिमत्त्व आणि हुशार सुपरस्टार आता आपल्यात नाही.
- शत्रुघ्न सिन्हा

सिनेसृष्टीतील बहुतांश नट वाह्यात असतात. विनोद खन्ना याला अपवाद होता. तो स्वत:च्या कामाकडे प्रामाणिकपणे लक्ष देणारा आणि प्रत्येक बाब शांततेने तपासून पाहणारा अभिनेता होता. - श्रीराम लागू
विनोद खन्ना यांच्या स्टाईल, वागणुकीने मी नेहमीच प्रभावित होतो. माझ्यासाठी नेहमीच तो एक जंटलमॅन असणार आहे. 
- संजय दत्त

विनोद खन्ना यांच्या चेहऱ्यात मार्दव आणि देखणेपणाचे मिश्रण होते. खरेतर अशा उमद्या अभिनेत्याला इतका क्लेशकारक मृत्यू यायला नको होता.
- जब्बार पटेल

Web Title: Handsome hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.