म्हापसा पोलीसांची शोधमोहिम सुरुच डिएनए चाचणीनंतरच तपासाची दिशा ठरणार

  • First Published :09-May-2014 : 00:51:23 Last Updated at: 09-May-2014 : 01:44:55

  • बार्देस : ५ रोजी म्हापसा-तार येथील राष्ट्रीय महामार्गावरील काही अंतरावरील पुलाखालच्या पाईपमध्ये बॅगेत कुजलेल्या अवस्थेतील सापडलेला मृतदेह हा करंजाळे येथील आंतोनिओ फर्नांडीस यांचा असल्याचे त्यांच्या कुटुंबियांचे व पोलिसांचा दावा आहे. हा खून गळा दाबून झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट झाले; मात्र आता डीएनए केल्यावरच हा आंतोनिओचाच मृतदेह आहे की आणि अन्य कुणाचा आहे हे निि›त होणार आहे.
    बुधवारी गोमेकॉत मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात आली. या मृत व्यक्तीच्या डोक्यावर एक खोलवर जखम असल्याचे तसेच गळा दाबल्याची खूण असल्याचे शवचिकित्सा अहवालात म्हटले आहे. यावरून मारेकर्‍यांनी मृताच्या डोक्यावर वार करुन नंतर त्याचा गळा दाबून खून केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान मृतदेहाचा चेहरा व करंजाळे पणजी येथील ४ एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या आंतोनिओ याच्या चेहर्‍याशी साम्य दर्शवत असल्याने व आंतोनिओच्या कुटूंबियांकडूनही याला दुजोरा मिळत असल्याने डिएनए चाचणीचा पर्याय असल्याचे पोलीसांनी सांगीतले.
    दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वा. कामावरून सुटून आपल्या ॲक्टीव्हा स्कूटरने घरी जायला निघालेला दिवाडी फेरीबोटीवरील कॅप्टन म्हणून काम करणारे आंतोनिओ घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने त्याच दिवशी जुने गोवे पोलीस स्थानकात आंतोनिओ बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. दरम्यान आंतोनिओ यांची स्कूटर ७ एप्रिल रोजी विर्नोडा-पेडणे पंचायत क्षेत्रातील भूतनाथ येथे पोलिसांना सापडली होती. जुने गोवे पोलिसांनी ही स्कूटर ताब्यात घेतली आहे.
    या मृतदेहाविषयी म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर म्हणाले, हा मृतदेह आंतोनिओचाच असावा असा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे; पण त्याची खात्री त्यांनी दिली नाही. त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची डीएनए करणे आवश्यक आहे. त्यानंतरच काय ते निष्पन्न होईल. तपासाला त्यानंतर दिशा मिळू शकेल. पोलीसांनी शोध घेतल्यानंतर गुरुवारीही मृतदेहाचे दोन्ही हात व पोटाखालचा भाग आढळला नाही. पोलींसांसमोर या घटनेने एक आव्हान निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS