भाजप जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढणार

  • First Published :22-December-2016 : 23:30:24

  • आॅनलाइन लोकमत,

    अहमदनगर, दि. २२- नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. आता जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची आहे. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी वर्चस्व संपले आहे. यापुढे अहमदनगर जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाईल. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केली.

    जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नगर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा गुरूवारी शेंडी येथे झाला. त्यात त्यांनी ही घोषणा केली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, दिलीप भालसिंग, विलास शिंदे, शाम पिंपळे, हरिभाऊ कर्डिले, अक्षय कर्डीले, बन्सी कराळे, दत्तात्रय मगर, सुभाष झिने, दत्तात्रय सप्रे, बाजीराव गवारे, भानुदास सातपुते आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे म्हणाले बाजार समिती निवडणुकीत कर्डिले-पाचपुते यांना पाडण्यासाठी महाआघाडी स्थापन केली जाते. आता मलाही शह देण्यासाठी विरोधक महाआघाडीच्या तयारीत आहेत. जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी संपलेली असून अखेरची घटका मोजत आहे. सेनेचे काहीही खरे नाही. जिल्ह्यात भाजपची ताकत वाढली असून नंबर एक पक्ष बनला आहे. कर्डिले, पाचपुते डावपेच खेळण्यात तरबेज असल्यामुळे मी नेहमी त्यांच्या बाजूला बसतो.

    या निवडणुकीत भाजपची सत्ता येणार यात तिळमात्र शंका नाही. जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश त्यांनी दिले. कर्डिले म्हणाले, थोरात-विखे यांच्यात भांडण लागत नाही, तोपर्यंत आपली पोळी भाजणार नाही. म्हणूनच राहुरी नगरपालिकेत विखे यांच्याबरोबर युती केली होती. यामुळेच राहात्यात भाजपला यश मिळाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या पराभवालाही काँग्रेसच कारणीभूत आहे. विखे नेहमीच विरोधी पक्षाला मदत करण्याचे काम करतात. या डावपेचामुळेच राहात्याच भाजपला फायदा झाला. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किल्ल्या पलिकडे जात नाहीत. किल्ला सोडून हात घातला तर आपले अस्तित्व राहणार नाही, हे त्यांना माहीत आहे. पाचपुते म्हणाले ,कर्डिले यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी लक्ष घालावे लागणार आहे. जिल्हाध्यक्ष बेरड यांनी नगर तालुक्यात अविचाराची आघाडी तयार झाली असून ही संधी साधुंची टोळी आहे. नगर तालुक्याचे विभाजन झाले असले तरी कर्डिले यांच्या माध्यमातून तालुक्याला पालकत्व मिळाले आहे. अहमदनगर महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी भिडली.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS