पोलिसाला नडला आमदाराशी पंगा!

By admin | Published: February 8, 2016 04:11 AM2016-02-08T04:11:18+5:302016-02-08T04:11:18+5:30

कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे काम करत असताना, मंत्री व लोकप्रतिनिधींशी वाद घालण्याच्या फटका मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश कासले यांना बसला आहे.

Police is trapped naked MLA! | पोलिसाला नडला आमदाराशी पंगा!

पोलिसाला नडला आमदाराशी पंगा!

Next

जमीर काझी,  मुंबई
कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे काम करत असताना, मंत्री व लोकप्रतिनिधींशी वाद घालण्याच्या फटका मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश कासले यांना बसला आहे. सेनेचे आमदार अ‍ॅड. अनिल परब यांच्याशी वादावादी झाली होती. या प्रकरणात परब यांना अवमानकारक वागणूक दिल्याचे चौकशीतून समोर आले. त्यामुळे कासले यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
आमदाराशी वाद घातल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई होण्याची ही मुंबई पोलीस दलातील पहिलीच घटना आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी मंत्री, लोकप्रतिनिधींना सौजन्य व सन्मानपूर्वक वागणूक देण्याची सूचना, दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी केली होती. त्याबाबत जारी केलेल्या नियमावलीच्या आधारे कासले यांना दोषी ठरवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचा परिणाम अन्य पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या विशेष शाखा-१मध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ निरीक्षक नरेश कासले २०१४मध्ये उत्तर प्रादेशिक विभागातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या वेळी केबल नेटवर्कमधील जगजीतसिंग कोहली यांच्या कंपनीतील, सेटटॉप बॉक्स मालमत्तेतील चोरीबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४०९, ५०६(२), ३८०, ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये संतोष अकोलकर यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यांची अटक टळावी, यासाठी सेनेचे आमदार अनिल परब प्रयत्न करत होते. पोलीस ठाण्यात येऊन त्याबाबत कासले तपास अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. परब हे तपासकामात हस्तक्षेप करत असल्याचा समज होऊन कासले यांनी त्यांना सुनावले. लोकप्रतिनिधी असला तरी कायदा सर्वांसाठी समान असल्याचे सांगत असताना त्यांच्याशी हुज्जत घातली. जोरदार वादावादीमुळे पोलीस ठाण्यात गोंधळ निर्माण झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला होता. अ‍ॅड. परब यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार केल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. दोघांचे सविस्तर जबाब नोंदविण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कासले यांची त्या पोलीस ठाण्यातून विशेष शाखा-१मध्ये बदली करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक कासले यांच्यावर कारवाईची नोंद सेवा पटलावर होत असल्याने, त्याचा परिणाम पदोन्नती व अन्य अ‍ॅवॉर्डवेळी होणार आहे. त्यामुळे या शिक्षेविरुद्ध त्यांना ‘मॅट’मध्ये धाव घ्यावी लागेल. मात्र, अशा प्रकारची शिक्षा आपल्या वाट्याला येऊ नये, यासाठी नियमानुसार काम करत असलो, तरी मंत्री, आमदार-खासदारांशी आता वाद घालायचे नाहीत. अशा वेळी कोणी वरिष्ठ पाठीशी राहात नाहीत. त्यामुळे ‘दबंग’गिरी न दाखविता, जितके जमते तितके काम करायचे, अशी मानसिकता अधिकाऱ्यांची होत असल्याचीच आज दिवसभर चर्चा पोलीस वर्तुळात होती.

Web Title: Police is trapped naked MLA!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.