साई संस्थानकडून शासनाला १४ वर्षांत २५० कोटींची मदत

By admin | Published: May 19, 2015 01:40 AM2015-05-19T01:40:22+5:302015-05-19T01:40:22+5:30

संस्थानच्या विकासात्मक बाबींसाठी आर्थिक मदत तर दूरच परवानगी देण्यासाठीही टाळाटाळ करत विश्वस्त मंडळ नियुक्तीलाही सरकारला सवड नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे़

250 crore assistance from Sai Institute in 14 years | साई संस्थानकडून शासनाला १४ वर्षांत २५० कोटींची मदत

साई संस्थानकडून शासनाला १४ वर्षांत २५० कोटींची मदत

Next

प्रमोद आहेर ल्ल शिर्डी
गेल्या चौदा वर्षांत साईबाबा संस्थानने शासनाच्या विविध विकास कामांसाठी तब्बल अडीचशे कोटींची मदत केली सरकारने मात्र संस्थानच्या विकासात्मक बाबींसाठी आर्थिक मदत तर दूरच परवानगी देण्यासाठीही टाळाटाळ करत विश्वस्त मंडळ नियुक्तीलाही सरकारला सवड नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे़
नैसर्गिक, राष्ट्रीय आपत्तीतच नव्हे तर शासनाची जबाबदारी असलेल्या विकास कामांनाही संस्थान देणगीतून यथाशक्ती मदत करते़ नुकतीच संस्थानने ‘जलशिवार’साठी ३४ कोटींची मदत देऊ केली आहे़ गेल्या चौदा वर्षांत पूर, दुष्काळ, त्सुनामी,भूकंप, मुख्यमंत्री व पंतप्रधान निधी, शाळा- कॉलेजला मदत, ग्रामपंचायतींना मदत, साईगणेश बंधारे, विमानतळ, जिल्हा परिषद शाळांना बेंचेस, अन्य देवस्थानांचा विकास आदी कामांसाठी गेल्या चौदा वर्षांत संस्थानने तब्बल २५० कोटींचा निधी दिल्याचे मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ त्यातच संस्थानचे जीवनदायी योजनेचे ३८ कोटी गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अडकले आहेत, तर शंभर कोटींहून अधिक रक्कम संस्थानने राज्यातील हजारो गरजू रूग्णांना उपचारासाठी खर्च केली आहे़
समाजोपयोगी व शासनाला पूरक कामे करत असूनही संस्थानला शासनाकडून नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. राज्यातील प्रथम क्रमांकाचे देवस्थान म्हणवणाऱ्या संस्थानच्या विकासकामांचे डझनवारी प्रस्ताव गेल्या सरकारच्या दरबारी पडून होते़ ते विश्वस्त मंडळाची नियुक्तीही करू शकले नाहीत, त्यानंतर आलेल्या सरकारने दहा महिन्यांत घोषणा देण्यापलिकडे अद्याप काही केले नाही़
सिंहस्थ दोन महिन्यांवर येऊन ठेपले असताना अद्याप शिर्डीत स्थानिक पातळीवर बैठकांच्या उठबशा सुरू आहेत़ नाशिकला सिंहस्थासाठी तेवीसशे कोटींचा निधी देण्यात आला, त्यातील पन्नास टक्के भाविक शिर्डीला येण्याची शक्यता असतानाही शिर्डीला मात्र ठेंगा दाखवण्यात आला़ विश्वस्त मंडळ नसल्याने निर्णय प्रक्रिया रखडल्या. संस्थानकडे निधी असूनही परवानग्यांच्या जंजाळात अडकल्याने भाविकांच्या समस्या कायम आहेत़ कचरा, पाणी, वाहनतळ, दर्शनबारी, स्वच्छतागृहे अशा एक ना अनेक समस्यांनी शिर्डीला घेरले आहे.राज्य सरकारणदील निम्म्याहून अधिक मंत्री साईभक्त असतानाही साईदरबारी समस्यांचे अमाप पीक आले आहे.

34
कोटींची मदत ‘जलशिवार’ योजनेसाठी
देऊ केली

250 कोटींचा निधी गेल्या चौदा वर्षांत संस्थानने पूर, दुष्काळ, त्सुनामी,भूकंप, मुख्यमंत्री व पंतप्रधान निधी, शाळा- कॉलेजला मदत, ग्रामपंचायतींना मदत, साईगणेश बंधारे, विमानतळ, जिल्हा परिषद शाळांना बेंचेस, अन्य देवस्थानांचा विकास आदी कामांसाठी दिला.

38 कोटी जीवनदायी योजनेचे गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे अडकले आहेत

Web Title: 250 crore assistance from Sai Institute in 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.