डायबेटिस पेशंट्ससाठी खुशखबर. इन्सुलिनच्या इंजेक्शनला द्या आता सुट्टी

 • First Published :19-May-2017 : 18:27:51

 •  - मयूर पठाडे

   
  डायबेटिसला आपण आता इतकं किरकोळ समजायला लागलो आहोत, की त्याकडे फारसं कोणी लक्षही देत नाही. त्याचं कारण एकच. जिकडे पाहावं तिकडे आपल्याला डायबेटिस पेशंट दिसतात. इतक्या लोकांना डायबेटिस आहे, मग आपल्याला आहे, तर त्यात काय विशेष, असं म्हणून या विकारातील गांभिर्यताच आपण हरवून टाकली आहे. पण अशा डायबेटिस पेशंट्ससाठी आता एक खुशखबरही आहे. इन्सुलिनला पर्यायी पण इन्सुलिनच्या तुलनेत खूपच प्रभावी आणि कमीत कमी दुष्परिणाम करणारं औषध आता विकसित करण्यात आलं आहे. 
   
   
  भारतात डायबेटिसचे किती पेशंट्स असावेत? 2015च्या एका अंदाजानुसार भारतात पाच कोटीपेक्षाही जास्त लोक डायबेटिस अर्थात मधुमेहानं त्रस्त होते. त्यात आता आणखीच वाढ झाली आहे. जगातील कोणत्याही देशात आपल्याइतके डायबेटिसचे पेशंट्स नाहीत. त्यामुळेच भारताला ‘डायबेटिस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ असंही म्हटलं जातं. अर्थातच हे बिरुद काही भुषणावह नाही. यातील बरेचसे रुग्ण टाईप टू च्या डायबेटिसनं प्रभावित आहेत. 
  आपल्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे होणारा हा आजार ‘तसा’ घातक नसला तरी आपल्याला हळूहळू तो मरणाकडे नेतो हेदेखील वास्तव आहे. हा आजार होऊ नये यासाठी खरं तर थोडीशी काळजी घेतली तरी पुरेसं आहे. आपली लाइफस्टाईल सुधारणं आणि रोज पुरेसा व्यायाम करणं एवढय़ा दोन गोष्टी केल्या, तरी डायबेटिसपासून तुम्ही कायमचं दूर राहू शकता. पण तरीही आपण असं करत नाही.
  परिणाम, इन्सुलिनच्या इंजेक्शन्सचा आपल्याला सातत्यानं मारा करावा लागतो. खरं तर बाहेरुन इन्सुलिनचा मारा करणं आपल्या आरोग्यासाठीही चांगलं नाहीच, पण नाही घेतलं इन्सुलिनचं इंजेक्शन तर आणखी त्रास, त्यामुळे आपल्याला त्या इंजेक्शन्सना सामोरं जावंच लागतं.
   
   
  पण सातत्यानं इन्सुलिनची इंजेक्शन्सं घेणार्‍या डायबेटिसच्या पेशंट्ससाठी आता एक खुशखबर आहे. 
  संशोधकांनी इन्सुलिनला पर्याय असणारी औषधं, गोळ्या आता शोधून काढल्या आहेत. इन्सुलिनच्या इंजेक्शन्सना त्या पर्याय तर आहेतच, पण अत्यंत प्रभावी आणि कमीत कमी साईड इफेक्ट्स असणार्‍या आहेत. 
  या आजारावर एकाच वेळी चक्क दोन संशोधनं यावेळी झाली आहेत. एक झालंय अमेरिकेत आणि दुसरं झालंय ऑस्ट्रेलियात. 
  दोन्ही संशोधनांचा निष्कर्ष हेच सांगतो, की इन्सुलिनला पर्यायी अशा या गोळ्या खूपच सेफ आहेत. लवकरच या गोळ्या बाजारातही येऊ शकतील. पण तोपर्यंत आपल्या इन्सुलिनची मात्रा आणि आपली लाइफस्टाईल आपल्याला आटोक्यात ठेवावीच लागेल. 

  घाम न गाळता कसा ठेवाल 
  डायबेटिस कंट्रोलमध्ये?
   
   
  या घ्या सोप्प्या ट्रिक्स..
  व्यायाम करून तुम्हाला घाम गाळायचाच नसेल, तर काही अगदी सोप्या ट्रिक्स आहेत. त्या तरी कराल की नाही?
  1- रात्री अल्होहोल, कॅफिन आणि स्पायसी फूड आवर्जून टाळा.
  2- तुमच्या झोपायच्या खोलीतलं वातावरण काहीसं कुल ठेवा.
  3- तिथे बाहेरुन फारसा प्रकाश आणि आवाज येणार नाही याची काळजी घ्या.
  4- झोपायची वेळ ठरवून घ्या, आणि रोज त्याच वेळी झोपायला जा. झोपा. 
  बघा, तुमच्या डायबेटिसमध्ये नक्कीच फरक पडेल.


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS