इंग्रज अधिकाऱ्याच्या प्रेमाचं प्रतीक साताऱ्यात काळाआड

By admin | Published: January 19, 2017 12:08 AM2017-01-19T00:08:15+5:302017-01-19T00:08:15+5:30

५२ वर्षांनंतरही आठवणी ताज्या : दहावे पोलिस प्रमुख मॅनले यांनी इंग्लंडनहून येऊन थडग्यावर टेकला माथा

The black body of Satyarthi symbolizes the love of the British officer | इंग्रज अधिकाऱ्याच्या प्रेमाचं प्रतीक साताऱ्यात काळाआड

इंग्रज अधिकाऱ्याच्या प्रेमाचं प्रतीक साताऱ्यात काळाआड

Next


सातारा : ब्रिटिशांची नोकरी करत असताना साताऱ्याचे दहावे पोलिस प्रमुख म्हणून साताऱ्यात आलेले डब्ल्यू. बी. मॅनले यांच्या पत्नी जेकब मॅनले यांचे थडगे अनोख्या प्रेमाची साक्ष देत काही वर्षांपर्यंत उभे होते. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांनी येथील थडगी जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केल्याने या थडग्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या इंग्रज अधिकाऱ्याच्या प्रेमाचं प्रतीक साताऱ्यात थडगे आता काळाआड झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आयुष्याच्या संध्याकाळी हजारो किलोमीटर दूर असलेल्या दिवंगत पत्नीच्या थडग्यावर माथा टेकवण्यासाठी मॅनले सातासमुद्रापार इंग्लंडनहून साताऱ्यात आले. या प्रेमकहाणीला यंदाच्या मकरसंक्रांतीला ५२ वर्षे पूर्ण झाली.
कपडे बदलावीत तसे जोडीदार बदलणाऱ्या पाश्चात संस्कृतीत वाढलेल्या मात्र, चरितार्थासाठी ब्रिटीश सरकारची नोकरी करत असताना तत्कालीन सातारा जिल्ह्याचे पोलिस प्रमुखपद भूषवलेल्या डब्ल्यू. बी. मॅनले यांच्या पत्नी प्रेमाची कहाणीही तितकीच अनोखी आहे. १६ मार्च १९२१ ते ९ मार्च १९२४ या कालावधीत डब्ल्यू. बी. मॅनले हे जिल्ह्याचे दहावे पोलिस प्रमुख होते. ते या पदावर कार्यरत असताना मॅनले यांच्या प्रिय पत्नीचे १६ नोव्हेंबर १९२३ रोजी प्लेगने निधन झाले.
त्याकाळी ब्रिटीश व्यक्तींसाठी ‘सिमिट्री’ ही वेगळी स्मशानभूमी होती. शहराच्या अगदीच बाहेर असलेली ही स्मशानभूमी कल्याण रिसॉर्टच्या पाठीमागे आजही आहे. याच स्मशानभूमीत ख्रिस्ती रिवाजाप्रमाणे त्यांच्या पत्नीचे दफन करण्यात आले. त्यावर थडगे बांधून तशी संगमरवरी प्लेटही बसविण्यात आली. कालांतराने मॅनले हे जिल्हा पोलिस प्रमुख पदावरून निवृत्त झाले आणि मायभूमी इंग्लंडनला परत गेले.
भारतात वास्तव्यास असताना होमिओपॅथिकचा अभ्यास केलेल्या मॅनले यांनी इंग्लंडमध्ये होमिओपॅथिकचा दवाखाना उघडून रुग्णसेवा सुरु केली. काही वर्षांनी मॅनले यांना दिवंगत पत्नीची प्रचंड आठवण येऊ लागली. पत्नीच्या थडग्यावर एकदा माथा टेकवून प्रार्थना करण्याची तीव्र इच्छा झाली. त्यावेळी त्यांचे वय ८६ होते. मॅनले यांनी त्यानंतर इंग्लंडहून मुंबई मूळचे कोरेगाव तालुक्यातील असलेले तत्कालीन निवृत्त पोलिस आयुक्त सखाराम रावजी पटवर्धन यांना फोन केला. ‘मी १४ जानेवारीला साताऱ्याला जाण्यासाठी भारतात येत असून, सातारा तेथे माझ्या पत्नीच्या थडग्यावर जाऊन प्रार्थना करावयाची आहे. सध्या त्या थडग्याची काय परिस्थिती आहे,’ ते कळविण्याची विनंती केली. त्यावेळी पटवर्धन यांचे वय ८९ होते. वयोमानाने त्यांना हे शक्य नसल्याने त्यांनी साताऱ्यात राहत असलेल्या चुलत पुतण्या श्रीधर पटवर्धन यांना कळवले व मॅनले यांच्या पत्नीचे थडगे कोठे आहे तेही सांगितले. मॅनले यांच्या पत्नीचे थडगे शोधून साफसफाई, डागडुजी केली.
मुंबईहून पुणे व तिथून टॅक्सीने साताऱ्यात पटवर्धन यांच्या घरी आले. त्यानंतर श्रीधर पटवर्धन, माधव पटवर्धन व मॅनले हे टांग्यातून कल्याणी बॅरेक येथील सिमिट्रीमध्ये गेले. वार्धक्याकडे झुकलेल्या त्या ब्रिटीश पोलिस अधिकाऱ्याने आपल्या प्रिय पत्नीच्या थडग्यावर फुले वाहिली, प्रार्थना म्हटली आणि अतिशय भावनावश झालेल्या मॅनले यांनी आपल्या अश्रूंचा अभिषेकच त्या थडग्यावर केला होता. (प्रतिनिधी)
मॅनले यांचे ‘मराठी प्रेम’
१४ जानेवारी रोजी मॅनले यांनी शहरात संध्याकाळी फेरफटकाही मारला व त्यांचे तत्कालीन मित्र डॉ. वा. वि. आठल्ये यांची भेट घेतली. त्यांच्याशी गप्पा मारल्या, विचारपूस केली. विशेष म्हणजे, बरीच वर्षे महाराष्ट्रात नोकरी केल्याने त्यांना चांगले मराठी बोलता येत असे तसेच आणि समजतही असे. त्यांना मराठीबद्दल खूप प्रेमही होते.
अतिशय भावनावश झालेल्या मॅनले यांनी ‘मला माझ्या कर्मभूमी असलेल्या सातारा येथे मरण यावे आणि माझ्या प्रिय पत्नीच्या शेजारी चिरविश्रांती घेण्याचे भाग्य मिळावे,’ अशी इच्छा प्रकट केली. हे पाहून उपस्थित पटवर्धन कुटुंबीयही हेलावून गेले. हा अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग आठवणींच्या कप्प्यात कायमचा बंदिस्त करत सर्वजण परत शहरात आले. तो दिवस होता, १४ जानेवारी मकरसंक्रांतीचा. त्यामुळे ५२ वर्षांनंतरही या आठवणी ताज्या होतात.

Web Title: The black body of Satyarthi symbolizes the love of the British officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.