नोटाबंदीचा देशावर परिणाम वाईट - शरद पवार

  • First Published :30-December-2016 : 22:14:56

  • ऑनलाइन लोकमत

    सोलापूर, दि. 30 - नोटाबंदी झाली खरी; परंतु चलन तुटवड्याचा वाईट परिणाम व्यवसाय, उद्योग, रोजगार, शेतकरी यांच्यासह समाजातील सर्व घटकांवर झाला आहे. यामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून, याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

    वरवडे (ता. माढा) येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण व नूतन इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील होते. प्रारंभी वरवडेतील विविध विकासकामांचा शुभारंभही करण्यात आला. यावेळी सरपंच शोभा घाडगे, उपसरपंच नागनाथ पाटील, जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक प्रताप घाडगे, भारत गायकवाड, संजीव पाटील, सरोज पाटील, डॉ. गणेश ठाकूर, सीताराम गोसावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

    नोटाबंदी होऊन पन्नास दिवस झाले तरी अजूनही बँकांसमोरील रांगा कमी होईनात. या रांगांमध्ये एकही धनवान दिसला नसून, सर्व गोरगरीब व सर्वसामान्य जनता दिसत आहे. मी ज्यावेळी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यावेळी जिल्ह्यात भयानक दुष्काळी परिस्थिती होती. पूर्वी वरवडे या गावाचा तालुका मोडनिंब होते. मिरज संस्थानच्या काळात मोडनिंबला तालुक्याचा दर्जा होता. पुन्हा त्याचा माढा तालुका झाला. परंतु शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सतत माझ्यापुढे मांडणारे आ. गणपतराव देशमुख, भाई एस. एम. पाटील आहेत. भाई एस. एम. पाटील यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

    प्रास्ताविक प्राचार्य गणेश ठाकूर यांनी केले. यावेळी माजी आ. एस. एम. पाटील, ए. डी. पाटील, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, डॉ. अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एक लाख रुपयांचा निधी संस्थेसाठी खा. शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमाला आ. गणपतराव देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. भारत भालके, माजी आ. विनायकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, मनोहर डोंगरे, कल्याणराव काळे, माढा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष कैलास तोडकरी, जि. प. च्या माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, उत्तम आवारी, शहाजी डोंगरे, कमलाकर महामुनी, प्राचार्य साहेबराव लेंडवे, अनिल पाटील यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma