अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात रमेश कदमच्या कोठडीत वाढ

  • First Published :30-December-2016 : 16:54:51 Last Updated at: 30-December-2016 : 19:40:33

  • ऑनलाइन लोकमत

    सोलापूर, दि. 30 - अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश कदम यास सोलापूर जिल्हा न्यायालयाने २ जानेवारी २०१७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. 

    आमदार रमेश कदम याची सोलापूर शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास वैद्यकीय तपासणी करून सोलापूर कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र कोर्ट दुपारी तीन वाजता सुरू होणार होते म्हणून शहर पोलिसांनी तात्पुरत्या स्वरूपात रमेश कदमला जेल रोड येथील जेलमध्ये ठेवले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजता कदम याला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा न्यायालयाने २ जानेवारी २०१७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी न्यायालय परिसरात मोहोळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. 

    आमदार कदम याने मुंबई येथील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कार्यालयामार्फत सोलापुरातील सुनील सुभाष चव्हाण यांच्या नावाने धनादेश सोलापूर विकास महामंडळात पाठविला होता. ती रक्कम कदम याचा कार्यकर्ता सुनील बचुटे याने काढून वाहन खरेदी करून फसवणूक केली. याप्रकरणी तत्कालीन घोटाळेबाज अध्यक्ष कदम याला या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयीन कोठडीतून सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले़ सोलापूर येथील चौकशीनंतर कदम यांची पुन्हा मुंबई न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे, असे सोलापूर शहर पोलिसांनी सांगितले.महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS