आपण जागे होणार का?

By admin | Published: July 5, 2015 02:52 AM2015-07-05T02:52:36+5:302015-07-05T02:52:36+5:30

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात पावसास सुरुवात झाली आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण फुलले. गेल्यावर्षी ज्या भागात दुष्काळी स्थिती होती, त्या भागातही या वर्षी वरुणराजाने हजेरी लावली.

Will you wake up? | आपण जागे होणार का?

आपण जागे होणार का?

Next

- डॉ. रामचंद्र साबळे
(लेखक राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाचे राज्य सल्लागार आहेत.)

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात पावसास सुरुवात झाली आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण फुलले. गेल्यावर्षी ज्या भागात दुष्काळी स्थिती होती, त्या भागातही या वर्षी वरुणराजाने हजेरी लावली. त्यामुळे सगळीकडे समाधान होते. मात्र मराठवाड्यातील वाशिम, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील जून महिन्याच्या सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. अद्यापही त्या भागात पाऊस अपुरा असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी चारा इत्यादी प्रश्न ऐरणीवर आले आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांतही तेथील जूनच्या सरासरीपेक्षा पाऊस थोडा कमी झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत काही भागात सरासरीहून अधिक, तर काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला आणि त्या भागात खरिपातील पिकांच्या पेरण्या झाल्या असल्या, तरी तेथील उगवून आलेली पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आता पावसात उघडीप आणि खंड काही काळ जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरलेली पिके अडचणीत आली आहेत. तेथे पावसाने अधिक ओढ दिल्यास पिके पाण्यावाचून जाणे शक्य असून, तेथे दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. तसेच दुबार पेरणीसाठी निवडावयाची पिके, त्यांच्या जाती आणि बियाण्याची उपलब्धता हे प्रश्न शेती व्यवस्थापनातील महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तसेच जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता हाही प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकरी अडचणीत येणार आहेत. बागायत क्षेत्रात या समस्येचे स्वरूप अत्यल्प प्रमाणात राहील. मात्र केवळ १८ टक्केच क्षेत्र महाराष्ट्रात बागायत असल्याने उरलेल्या कोरडवाहू क्षेत्रात आणि दुष्काळी पट्ट्यात या समस्येचे स्वरूप वाढलेले दिसून येईल.
या सर्व समस्यांचे स्वरूप हवामान बदलामुळे होत आहे. कमी दिवसात अधिक पाऊस होणे आणि बराच काळ पावसात खंड पडणे, तसेच पावसाचे एकूण दिवस कमी होणे, अशी स्थिती या २१व्या शतकात केवळ हवामान बदलाच्या परिणामाने जाणवत आहे. दुष्काळी पट्ट्यात केवळ तीन आठवड्यांतील ३ ते ४ दिवसांत भरपूर पाऊस होऊन पाणी वाहून जाणे आणि उरलेल्या मान्सून काळात अल्पसा पाऊस होणे, ही स्थिती या शतकाच्या सुरुवातीपासूनच जाणवत आहे. सन १९७२ साली केवळ ८४ तालुके दुष्काळी गणले होते. मात्र सन २०१२ साली १२३ तालुके दुष्काळी होते. म्हणजेच गेल्या ४० वर्षांत ४० हून अधिक तालुक्यांची भर पडत आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चित्र चिंताजनक आहे. तापमानवाढ व हवामान बदल या समस्येस वाहनांच्या संख्येत होणारी वाढ, कारखान्यांच्या संख्येत होणारी वाढ व त्यातून बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साइड, कार्बन मोनोआॅक्साईड आणि विमानांमधून बाहेर पडणारा क्लोरोफ्ल्युरो कार्बन यामुळे या समस्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहेत. दुसऱ्या बाजूस कार्बन वापरणारी यंत्रणा म्हणजे वनामधील वनस्पतींचे प्रमाण कमी झालेले असल्याने कार्बन वापरणारी यंत्रणा मानवानेच संपुष्टात आणली आहे. त्यामुळे हवेत कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण वाढत जाणार आहे. माणसांच्या आरोग्यासाठीही या बाबी भविष्यात घातक ठरणार आहेत आणि ते दिसूनही येत आहे. हे सारे बदल होत असताना उपाय योजण्यासाठी आपण जागे होणार आहोत का?

Web Title: Will you wake up?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.