स्मार्ट सिटीसह मोठ्या प्रकल्पांचे काम थंडावणार

  • First Published :12-January-2017 : 03:31:50

  •  पुणे : महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या अनेक कामांना मंजुरी न मिळाल्याने कोट्यवधी रुपयांची रक्कम विनाखर्च शिल्लक राहिली आहे. त्याचबरोबर आचारसंहितेमुळे स्मार्ट सिटी, नदीसुधार प्रकल्प, २४ तास पाणीपुरवठा आदी मोठ्या प्रकल्पांची नवीन कामांना मंजुरी मिळू शकणार नाही. कोणतीही नवीन घोषणा या काळात करता येणार नाही. ज्या कामांना मंजुरी मिळून त्यांचे वर्कआॅर्डर निघाल्या आहेत, त्याचबरोबर ते यापूर्वीच सुरू आहेत, त्या कामांवर मात्र आचारसंहितेचा कोणताही परिणाम होणार नाही.

    महापालिकेच्या वतीने यंदा ५ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. डेंगळे पूल, बीआरटी असे काही मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. मात्र अंदाजपत्रकीय निधीची तरतूद असूनही शिवसृष्टीसह काही प्रकल्प मार्गी लागू शकले नाहीत. त्यांचा कोट्यवधी रुपयांचा निधी शिल्लक राहिला आहे.

    स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांसाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ज्या कामांना यापूर्वी मंजुरी मिळाली आहे, त्या कामांवर परिणाम होणार नाही. नवीन कामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यासाठी आचारसंहितेच्या काळात बैठक होऊ शकणार नाही. त्याचबरोबर नदीसुधार प्रकल्पांच्या नवीन कामांची घोषणा किंवा सुरुवात करता येऊ शकणार नसल्याने दीड महिना काम थांबणार आहे.

    महापालिकेची मुदत संपत असतानाच यंदा नगर परिषदा निवडणुका, विधान परिषद निवडणूक त्यानंतर लगेच महापालिका निवडणूक अशा आचारसंहिता लागल्याने अनेक विकासकामांचा निधी खर्च होण्यामध्ये अडचणी आल्या आहेत. तरी पालिकेची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेकडो कोटी रुपयांच्या विकासकामांना स्थायी समिती व मुख्य सभेकडून मंजुरी देण्यात आली. वर्क आॅर्डर काढण्यासाठी मंगळवारी रात्रीपर्यंत धांदल उडालेली होती.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS

महत्वाच्या बातम्या