राष्ट्रवादी-भाजपामध्ये लढत

 • First Published :12-January-2017 : 03:30:32

 • पुणे : आगामी महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर सध्याचा महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व लोकसभा, विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणारी भाजपा यांच्यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी थेट लढत होईल, असे चित्र दिसून येत आहे. त्याच वेळी विरोधी पक्ष राहिलेले काँग्रेस, मनसे, शिवसेना, रिपाइं निकराची झुंज देतील. एकंदरीत, सर्वच प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  यंदा प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने पालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक ४८ जागा जिंकून काँग्रेसकडून पालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर पाच वर्षांनी २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये आणखी ७ जागांनी वाढ करून ५५ जागा मिळवून पुन्हा राष्ट्रवादी सत्तेवर आली आहे. गेल्या १० वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारांपुढे कौल मागितला जाणार आहे. भाजपाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही विद्यमान नगरसेवक प्रवेश करीत आहेत. आतापर्यंत ४ नगरसेवकांनी इतर पक्षांतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

  भाजपाने केलेल्या सर्व्हेमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा भाजपाला फायदा होईल, असे निष्कर्ष आल्याने त्यानुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रभागरचना करतानाही त्यामध्ये भाजपाकडून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप झाल्याची टीका करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर इतर पक्षांमधील आजी-माजी नगरसेवकांना पक्षात घेण्याचा सपाटा भाजपाकडून लावण्यात आला आहे. आतापर्यंत १० विद्यमान नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. मागील निवडणुकीत भाजपाला २६ जागा मिळाल्या होत्या.

  मनसेने मागील पालिका निवडणुकीत २९ जागा मिळवून विरोधी पक्षनेतेपद पटकावले होते. दरम्यान त्यांची जातीच्या दाखल्यामुळे त्यांची एक जागा कमी झाल्याने विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडून काँग्रेसकडे गेले. मात्र काँग्रेस, भाजपा, शिवसेना आदी प्रस्थापित पक्षांना धक्का देऊन मनसेने पालिकेच्या राजकारणात स्वत:चे स्थान निश्चित केले होते. मात्र, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आलेले मोठ अपयश तसेच पक्षाचा करिश्मा कमी झाल्याने अनेक विद्यमान नगरसवेक पक्ष सोडून जात आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

  महापालिकेसाठी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळावे म्हणून एके काळी जंगजंग पछडावे लागत होते, त्याच काँग्रेसला

  या वेळी उमेदवार मिळविण्यासाठी आटापिटा करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS