कोकण रेल्वेला आता तुतारीची साद

  • First Published :19-May-2017 : 21:22:57 Last Updated at: 19-May-2017 : 22:45:53

  • ऑनलाइन लोकमत

    मुंबई, दि. 19 - कोकण मार्गावर धावणाऱ्या गाड्यांपैकी दादर-सावंतवाडी या ट्रेनचे नामकरण करण्यात आले आहे. दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलून तुतारी एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे. मुंबईतल्या दादर येथे झालेल्या रेल्वेच्या कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलण्यात आले आहे.

    दादर-सावंतवाडी ही ट्रेन कोकण मार्गावर 1 जुलै 2011 रोजी राज्यराणी एक्स्प्रेस नावाने कोकणवासीयांच्या सेवेसाठी सुरू केली. त्यामुळे रात्रीच्या दरम्यानच आरामदायी प्रवास करून पहाटे कोकणात दाखल होणं शक्य झालं. त्यामुळे प्रवाशांची या ट्रेनला सर्वाधिक गर्दी असते.

    कोकणातील चाकरमन्यांसाठी दादर-सावंतवाडी ही ट्रेन सर्वाधिक आवडीची आहे. केशवसूत या टोपण नावाने ओळखले जाणारे मराठी कवी कृष्णाजी केशव दामले यांच्या सन्मानार्थ दादर-सावंतवाडी ट्रेनचे नामकरण करण्यात आले आहे. केशवसूत यांची तुतारी ही कविता जनमानसात लोकप्रिय असल्यानं ते नाव या ट्रेनला देण्यात आलं आहे. त्यामुळे दादर-सावंतवाडी ट्रेनचे नाव बदलून तुतारी एक्स्प्रेस ठेवण्यात आले आहे. ब्रिटिशांच्या कार्यकाळात केशवसुतांनी तुतारी कविता बनवली. या कवितेतून केशवसुतांनी ब्रिटिशांविरोधात एकत्र येण्याचे आणि पेटून उठण्याचे आवाहन केले. केशवसुतांच्या तुतारी कवितेने अनेकांना ब्रिटिशांविरोधात उभे राहण्याची प्रेरणा दिल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे कवी कृष्णाजी केशव दामले यांचा जन्मही कोकणातच झाला आहे. महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS