उपनगराध्यक्षपदासाठी चुरस

By Admin | Published: December 26, 2016 11:45 PM2016-12-26T23:45:03+5:302016-12-26T23:48:24+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही नगरपरिषदांमध्ये सोमवारी नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्याने आता खऱ्या अर्थाने पालिकांच्या कामांना गती येणार आहे.

Churus for the post of Deputy Chairman | उपनगराध्यक्षपदासाठी चुरस

उपनगराध्यक्षपदासाठी चुरस

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही नगरपरिषदांमध्ये सोमवारी नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारल्याने आता खऱ्या अर्थाने पालिकांच्या कामांना गती येणार आहे. दरम्यान, आता सर्वांच्याच नजरा शुक्रवारी होणाऱ्या उपनगराध्यक्षासह स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे लागले असून, इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे यासाठी फिल्डिंग लावली आहे. या निवडीवरून जिल्ह्यातील या पुढील राजकारण कोणत्या दिशेने जाणार हेही स्पष्ट होणार असल्याने या निवडींकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
उमरगा नगरपालिकेत काँग्रेसने आठ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविलेले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपा-काँग्रेस आघाडीसाठी बोलणी सुरू होती. मात्र ताळमेळ जमलेला नव्हता. आता या पुढचा कारभार पाहण्यासाठी काँग्रेस भाजपाला सोबत घेण्याची शक्यता आहे. तसेच झाल्यास भाजपाकडून विजयाची हॅट्ट्रीक केलेले हंसराज गायकवाड यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागू शकते. गायकवाड यांच्या प्रभावामुळेच भाजपाला शहरातील तीन ते चार जागांवर निवडणूक जिंकण्यास मोठी मदत झालेली आहे. त्यांचा पालिका कामकाजाचा अनुभव पाहता पक्षश्रेष्ठींचे मतही त्यांच्यासाठी अनुकूल आहे. दुसरीकडे भाजपाकडून निवडून आलेले इतर बहुतांश सदस्य पालिकेत पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करणार आहेत, तर चार जागा मिळविलेली शिवसेना व तीन जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीला उमरगा पालिकेत विरोधकांची भूमिका पार पाडावी लागणार आहे.
परंडा नगरपालिकेत राष्ट्रवादीने नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविला आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकतानाच पक्षाने पूर्ण बहुमत मिळविलेले असल्याने पालिकेवर पूर्ण पाच वर्षे राष्ट्रवादीचेच वर्चस्व दिसणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी सध्या इच्छुकांनी आ. राहुल मोटे यांच्यासह नगराध्यक्ष सौदागर यांच्याकडे लॉबिंग सुरू केली आहे. उपनगराध्यासह स्वीकृत सदस्य निवडीचे अधिकार पदाधिकाऱ्यांनी आ. राहुल मोटे यांच्याकडे सोपविले आहे. मात्र तरीही नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांची भूमिका यामध्ये निर्णायक राहील, असे चित्र आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका खुर्शीदबेगम दखनी, रत्नमाला बनसोडे, जैतुनबी पठाण, माजी नगराध्यक्षा नसरीन शाहबर्फीवाले इच्छुक असल्याचे समजते. दुसरीकडे स्वीकृत सदस्यत्वासाठी मसरत काझी, गजेंद्र घाडगे, सत्तार पठाण, मकसूद पल्ला अशी इच्छुकांची मोठी यादी असल्याने यामध्ये कोणाची लॉटरी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संजय गाढवे यांच्या नेतृत्वाखाली भूम नगरपरिषदेची सत्ता राखण्यात राष्ट्रवादी पुन्हा यशस्वी झालेली आहे. १५ नगरसेवक निवडून आलेले असल्याने उपनगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, पुढील पाच वर्षांच्या काळातील राजकारण पाहून पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्याच्या दृष्टिकोनातून उपनगराध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. हीच बाब स्वीकृत सदस्याच्या संबंधी असून, याबाबतचा निर्णय संजय गाढवे यांचाच राहणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या मुरूम नगरपरिषदेत १५ जागा जिंकत काँग्रेसने बाजी मारलेली आहे. या विजयावरून मुरूम शहरात आ. बसवराज पाटील, बापुराव पाटील व आमदारपुत्र शरण पाटील यांची राजकारणावरील पकड अत्यंत मजबूत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सध्यस्थितीत पालिकेत नऊ महिला नगरसेवक असून, आठ पुरुष नगरसेवक आहेत. काँग्रेसच्या सदस्यांची संख्या सर्वाधिक असून, आ. बसवराज पाटील ठरवतील त्याचीच वर्णी उपनगराध्यक्ष पदावर लागणार असल्याने आ. पाटील यांच्या निर्णयाकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Churus for the post of Deputy Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.