वर्चस्व राखण्यास भारत उत्सुक, श्रीलंकेविरुद्ध पहिली लढत आजपासून

गेल्या काही महिन्यांपासून कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय संघ आजपासून (बुधवार) श्रीलंकेविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 03:17 AM2017-07-26T03:17:12+5:302017-07-28T13:06:55+5:30

whatsapp join usJoin us
India Vs Sri Lanka: Hardik Pandya Has A Chance Of Playing says virat kohali | वर्चस्व राखण्यास भारत उत्सुक, श्रीलंकेविरुद्ध पहिली लढत आजपासून

वर्चस्व राखण्यास भारत उत्सुक, श्रीलंकेविरुद्ध पहिली लढत आजपासून

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गाले : गेल्या काही महिन्यांपासून कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय संघ आजपासून (बुधवार) श्रीलंकेविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक आहे. याच मैदानावर भारताला दोन वर्षांपूर्वी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता; पण त्यानंतर भारतीय संघाने कामगिरीत सातत्य राखताना जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
विराट कोहली अँड कंपनी २०१५ मध्ये गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक असेल. त्या वेळी चौथ्या दिवशी १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव ११२ धावांत संपुष्टात आला होता.
तेव्हापासून आतापर्यंत बरेच काही बदलले आहे. युवा व आक्रमक कोहली आता परिपक्व झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २०१६-१७च्या मोसमात वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि आॅस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध १७ पैकी १२ कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सहभागी होताना भारतीय संघ त्याच आत्मविश्वासाने उतरणार असून, आपल्या नव्या मोसमाची सुरुवात करणार आहे. त्याचसोबत रवी शास्त्री दुसºयांदा भारतीय संघासोबत महत्त्वाच्या पदावरील नवी इनिंग सुरू करतील. गेल्या पाच दिवसांपासून शास्त्री संघासोबत आहेत. त्यामुळे अनिल कुंबळे यांनी पद सोडणे आणि प्रशिक्षक निवड प्रक्रिया याबाबतच्या नाट्यमय घटनाक्रमाला खेळाडू विसरले असतील, अशी आशा आहे.
शास्त्री आता मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत जुळले आहेत, तर भरत अरुण गोलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिका सांभाळत आहेत. त्यामुळे सपोर्ट स्टाफमध्ये समतोल साधला गेल्याचे भासत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शास्त्री यांची नजर आता गाले स्टेडियममध्ये सकारात्मक निकाल देण्यावर केंद्रित झाली आहे. या मैदानावर नेहमीच पाहुण्या संघाला संघर्ष करावा लागला आहे. त्या वेळी शास्त्री संघाचे संचालक होते. त्यांनी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसºया कसोटीपूर्वी संघाचे मनोधैर्य उंचावले होते. त्याचा लाभही झाला होता. भारताने त्या मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता.
या युवा संघाने त्या वेळी विदेशात प्रथमच विजयाची चव चाखली होती. २०१५-१६ व २०१६-१७ याची तुलना करताना गालेतील पराभवानंतर भारताने २३ कसोटी सामने खेळले. केवळ एक सामना (आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुणे येथे) गमावला. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने हा पराक्रम केला आहे. भारताची बेंच स्ट्रेंथ मजबूत आहे. के. एल. राहुल तापामुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार असला, तरी संघव्यवस्थापनाला चिंता भेडसावत नाही.
कर्नाटकच्या या फलंदाजाने खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर, आताच पुनरागमन केले आहे. मार्च महिन्यानंतर त्याला एकही सामना खेळता आला नव्हता; पण कोलंबोमध्ये दोनदिवसीय सराव सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. राहुलच्या अनुपस्थितीत शिखर धवन व अभिनव मुकुंद यांना सलामीला खेळविण्याचा पर्याय आहे. दौºयाच्या सुरुवातीला या दोन फलंदाजांमध्ये एका स्थानासाठी चुरस होती.
धवन एकेकाळी पहिल्या पसंतीचा सलामीवीर होता; पण गेल्या वर्षी विंडीज दौºयानंतर तो तिसºया पसंतीचा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला संघातून वगळण्यात आले. मुकुंद आॅस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरू कसोटीत खेळला होता; पण दोन डावांत त्याला केवळ १६ धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्याकडे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे..

...आता केवळ खेळावर लक्ष
कुंबळेचा राजीनामा व प्रशिक्षकाच्या नियुक्तीबाबत विचारले असता कोहली म्हणाला, ‘‘प्रशिक्षकाच्या मुद्यावर आम्ही लक्ष देत नाही. आम्ही यापूर्वी शास्त्री यांच्यासोबत काम केलेले आहे. त्या वेळी आम्ही यशस्वीही ठरलो होतो. सध्या आम्ही क्रिकेटवर लक्ष देत आहोत.’’

सलामी जोडीव्यतिरिक्त तीन स्थानांसाठी चेतेश्वर पुजारा, कोहली व अजिंक्य रहाणे यांची निवड निश्चित आहे. दोन वर्षांपूर्वी भारताने येथे पाच गोलंदाजांसह खेळण्याची चूक केली होती आणि त्याचा भारताला फटकाही बसला होता. कारण, तळाच्या फलंदाजांना रंगाना हेराथच्या गोलंदाजीला समर्थपणे तोंड देता आले नव्हते. त्यामुळे या वेळीही कोहली तशाच प्रकारचा जुगार खेळणार का? याबाबत उत्सुक आहे. असे जर घडले नाही तर रोहित शर्माला गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध इंदूर कसोटीनंतर प्रथमच फलंदाजी क्रमवारीत संधी मिळू शकते.

आर. आश्विन आपला ५० वा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज आहे; पण भारतीय आक्रमणामध्ये कुणाचा समावेश राहील, हा विषय नाणेफेकीपर्यंत चर्चेचा राहील. जर कोहलीने पाच गोलंदाजांना संधी दिली, तर कुलदीप यादवला अतिरिक्त फिरकीपटू म्हणून पसंती राहील. अंतिम ११ खेळाडूंमध्ये दोन वेगवान गोलंदाज कोण असतील, हा मोठा प्रश्न आहे. मायदेशातील सत्रात मोहम्मद शमी व उमेश यादव यांना प्राथमिकता देण्यात आली होती. यजमान श्रीलंका संघ सध्या संक्रमणाच्या स्थितीत आहे. प्रशिक्षक ग्रॅहॅम फोर्ड यांनी आपले पद सोडले असून, निक पोथास यांना प्रभारी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावण्यास सांगितले आहे. सपोर्ट स्टाफ मजबूत करण्यासाठी चामिंडा वास व हसन तिलकरत्ने यांच्याकडे अनुक्रमे गोलंदाजी व फलंदाजी सल्लागार म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, नवा कसोटी कर्णधार दिनेश चंडीमल न्यूमोनियाने आजारी असल्यामुळे तो या लढतीत खेळणार नाही. फिरकीपटू हेराथने झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ११ बळी घेतले होते. भारताविरुद्धच्या मालिकेत हेराथ श्रीलंकेसाठी प्रमुख गोलंदाज राहील. वेगवान गोलंदाज नुवानच्या पुनरागमनामुळे श्रीलंकेची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. धनंजय डिसिल्वाला चंडीमलच्या जागी संघात स्थान मिळाले आहे, पण फिरकीपटू मलिंदा पुष्पकुमारा संघासाठी उपयुक्त ठरू शकेल.

हार्दिकला संधी मिळण्याची शक्यता : कोहली
गाले : श्रीलंकेविरुद्ध आजपासून (बुधवार) प्रारंभ होणाºया पहिल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते, असे संकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत. सन २०१५ मध्ये भारतीय संघ गालेमध्ये पाच गोलंदाजांसह खेळला होता. त्या वेळी अंतिम ११ खेळाडूंमध्ये एक फलंदाज कमी होता. कोहलीच्या नेतृत्वाखाली त्या वेळी भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. पांड्याच्या समावेशामुळे भारतीय संघाचा समतोल साधला जाईल. या अष्टपैलू खेळाडूमध्ये जवळजवळ १४० किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. कोहली म्हणाला, ‘‘गेल्या वेळी कदाचित आम्ही एक फलंदाज कमी खेळविला होता आणि पाचवा गोलंदाज सामन्यात विशेष काही करीत नाही. आमच्याकडे पुन्हा हा पर्याय आहे, पण त्याचसोबत आमचा संघ समतोल आहे. आमच्याकडे हार्दिक पांड्यासारखा खेळाडू आहे. तो विकेट घेण्यास सक्षम आहे.’’

आम्हाला विशेष कामगिरी करावी लागेल : हेराथ
गाले : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या मालिकेत विजय मिळवण्यासाठी आमच्या संघाला विशेष कामगिरी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा प्रभारी कर्णधार रंगाना हेराथने व्यक्त केली.
पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना हेराथ म्हणाला, ‘‘आम्ही यापूर्वीच्या कसोटी सामन्यात जवळजवळ ३८० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. भारत व झिम्बाब्वे वेगवेगळे संघ आहेत, पण आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल. भारतीय संघ सध्या अव्वल स्थानावर असून, चांगला खेळ करीत आहे. त्यामुळे आमच्यासाठी ही मालिका आव्हानात्मक राहील. आम्हाला विशेष कामगिरी करावी लागेल.’’
वेगवान माºयाबाबत बोलताना हेराथ म्हणाला, ‘‘आम्हाला मायदेशातील परिस्थितीचा लाभ घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.’’

प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि अभिनव मुकुंद.
श्रीलंका : रंगाना हेराथ (कर्णधार), उपूल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, असेला गुणरत्ने, निरोशन डिकवेला (यष्टिरक्षक), धनंजय डिसिल्वा, धनुष्का गुणतिलका, दिलरूवान परेरा, सुरंगा लकमल, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, मलिंदा पुष्पकुमारा आणि नुवान प्रदीप.

सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १० पासून

Web Title: India Vs Sri Lanka: Hardik Pandya Has A Chance Of Playing says virat kohali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.