ऑनलाईन लोकमत 

सोलापूर, दि. 21 -  जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बहुमताजवळ पोहोचणारे संख्याबळ असताना देखील भाजपा महाआघाडीने ‘चमत्कार’ घडविण्याचा इरादा व्यक्त केला आहे. भाजपा महाआघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू आणि अपक्ष म्हणून निवडून आलेले संजय शिंदे (माढा) यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस फाटाफुटीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास बाकी असतानादेखील अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला नाही. त्यामुळे ही निवडणूक प्रचंड उत्सुकता निर्माण करणारी आणि इतिहास घडविणारी होणार आहे.  
 
सर्वाधिक 23 जागा जिंकून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ‘काठावरचे’ बहुमत आहे तर बहुमत नसतानाही गोवा आणि मणिपूर राज्यांप्रमाणे ‘चमत्कार’ करू पाहणा-या महाआघाड्यांना संजय शिंदे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. संजय शिंदे यांनी जवळपास ४४ सदस्यांना गोवा टूरवर नेले होते. सोमवारी सायंकाळी हे सर्व सदस्य गोव्याहून थेट टेंभुर्णीत दाखल झाले. आज मंगळवारी सकाळी हे सदस्य सोलापुरातील हेरिटेज हॉल येथे येणार असून जेवण करुन हे सर्व जण दुपारी दोन वाजता जि. प. सभागृहातच दाखल होणार आहेत. 
 
काँग्रेसच्या सात मतांमध्ये फाटाफूट होऊ नये, यासाठी पक्षाचे निरीक्षक मोहन जोशी सोमवारी सोलापुरात आले होते. त्यांनी काँग्रेसच्या सात सदस्यांबरोबर बैठक घेण्याचे नियोजन केले होते; मात्र एकही सदस्य नसल्यामुळे शिवाय आ. सिद्धराम म्हेत्रे ‘नॉट रिचेबल’ असल्यामुळे बैठक झालीच नाही. भाजपा, काँग्रेस, शेकाप तसेच स्थापन झालेल्या विविध आघाड्यांचा कौल संजय शिंदे यांच्या बाजूने असल्यामुळे चमत्कार होईल, असे चिन्ह आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले २३, काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले ७, सांगोल्यातील शेकाप ३ व दीपक साळुंखे यांचे २ असे सदस्य न फाटाफूट होता एकत्र आले तरच त्यांना ३५ ही मॅजिक फिगर गाठता येते आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष होऊ शकतो. याला फाटा देऊन संजय शिंदे यांनी ३८ ते ४२ सदस्यांचा ‘आकडा’ निश्चित केला आहे. त्यामुळे चमत्कार होईल का, हे देखील औत्सुक्याचे आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करू, असे जाहीरपणे सांगणाºया काँग्रेसच्या आ. सिद्धराम म्हेत्रे यांच्या सात सदस्यांचा देखील कौल संजय शिंदे यांच्या बाजूने आहे. अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पुत्र शिवानंद पाटील (अपक्ष) यांनी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. इकडे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या बाळराजे या मुलाची उमेदवारी निश्चित होईल, असे मानले जात होते. याबाबत त्यांना विचारले असता कुणीही सांगितले तरी आम्ही अर्ज भरणार नाही, मात्र शरद पवार यांनी सांगितले तर पराभव झाला, तरीही आम्ही अर्ज भरु, असे पाटील म्हणाले़ 
'जि. प. अध्यक्षपदासाठी मी उभा आहे़ सर्वांनी प्रयत्न केले आहेत, सर्वांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे यश मिळेल असा दावा भाजपा महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांनी केला. आमच्याकडे बहुमत नसतानाही भाजपा पुरस्कृत अध्यक्ष होणारच', असा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केला. 
 
असे आहे ६८ जणांचे पक्षीय बलाबल
-राष्ट्रवादी- २३ 
-काँग्रेस- ७ 
-दीपक साळुंखे व गणपतराव देशमुख- ५ 
-भाजप- १४ 
-शिवसेना- ५ 
-परिचारक गट- ३ 
-शहाजीबापू पाटील- २ 
-महाडिक गट- ३ 
-समाधान आवताडे गट- ३ 
-संजय शिंदे यांचे- २ 
-सिद्रामप्पा पाटील गट- १ 
 
दोन वाजता फैसला!
जिल्हाधिका-यांनी पाठवली नोटीस 
जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्यांची पहिली बैठक जिल्हाधिकारी रणजित कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि़ २१ मार्च रोजी दुपारी दोन वाजता होणार असून यासाठी जिल्हाधिका-यांच्या सहीने प्रत्येक जि. प. सदस्यांना सभेची नोटीस पाठविली आहे. या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडला जाणार असून त्याच दिवशी सकाळी १० ते १२ या वेळेत जि़ प़ सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्षांची नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. दुपारी दोन वाजता सभा सुरू होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षासाठी निवडणुका हात वर करून घेतल्या जाणार आहेत. गोवा आणि मणिपूर पॅटर्नप्रमाणे बहुमत नसतानाही भाजपाने महाआघाडीच्या माध्यमातून मिनी मंत्रालयावर झेंडा फडकवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे काय काय होणार याबाबत मोठ्या पैजा लागल्या आहेत.