सोलापूर जिल्ह्यातील पाणीपातळी सव्वादोन मीटरने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:06 AM2018-10-08T11:06:55+5:302018-10-08T11:10:40+5:30

Water supply reduction meters in Solapur district decreased | सोलापूर जिल्ह्यातील पाणीपातळी सव्वादोन मीटरने घटली

सोलापूर जिल्ह्यातील पाणीपातळी सव्वादोन मीटरने घटली

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील १०० गावांतील खरीप पिकांच्या परिस्थितीचा अंदाज घेतलापर्जन्यमान घटल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी खोलवर गेलीउजनी धरण वगळता अन्य तलावांतील पाणीसाठे शून्यावर

अरुण बारसकर
सोलापूर: जिल्ह्यात यावर्षी सरासरी ४०. ७१ टक्के इतकाच पाऊस पडला असल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी २.२८ मीटरने खाली गेली आहे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयाने आॅक्टोबरमधील पाणी पातळीच्या मोजणीत पातळी ६.७० मीटरने खाली गेल्याचे स्पष्ट झाले असून, पाणी टंचाईची तीव्रता वाढल्याचे संकेत यामुळे मिळाले आहेत.

जिल्ह्यातील १५६ निरीक्षण विहिरींंची पाणीपातळी वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयामार्फत मोजणी केली जाते. वर्षातून जानेवारी, मार्च, मे व आॅक्टोबर असे चार वेळा पाणीपातळी मोजून त्याचा अहवाल शासनाला सादर केला जातो. यावरच पाणी नियोजन केले जाते. मे महिन्यात पाऊस पडण्याअगोदर व आॅक्टोबरमध्ये पाऊस पडल्यानंतर मोजणी केलेली पाणीपातळी महत्त्वाची समजली जाते. यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने वरिष्ठ भू- वैज्ञानिक कार्यालयाच्या पाणीपातळी अहवालावर प्रशासनाला पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. मागील पाच वर्षांच्या पाणी पातळीचा विचार केला असता  सरासरीआॅक्टोबर महिन्यात ४.४२ मीटर पाणीपातळी होती. यावर्षीची आॅक्टोबर महिन्यात निरीक्षण विहिरींची पाणीपातळी ६.७० मीटर खाली गेली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेचा विचार केला असता यावर्षी २.२८ मीटरने पाणीपातळी खोलवर गेली आहे.

बार्शी तालुक्यात ६१ टक्के, माळशिरस तालुक्यात ४८ टक्के, दक्षिण तालुक्यात ४२ टक्के, सांगोला व पंढरपूर तालुक्यात प्रत्येकी ४१ टक्के, मोहोळ तालुक्यात ४० टक्के, उत्तर सोलापूर तालुक्यात ३९ टक्के, मंगळवेढा तालुक्यात ३७ टक्के, अक्कलकोट तालुक्यात ३६ टक्के, माढा तालुक्यात ३२ तर करमाळा तालुक्यात २८ टक्के पाऊस पडला आहे. 

सर्वच तालुक्यांची पाणीपातळी वजा
- मागील वर्षी आॅक्टोबर महिन्याची पाणीपातळी वरती (अधिक) आली होती. यावर्षी मात्र सर्वच तालुक्यांची पाणीपातळी वजा झाली आहे. २०१७ मध्ये(जून ते सप्टेंबर) ४८८.८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होता, प्रत्यक्षात ४१५.३ मि.मी. तर ८५ टक्के पाऊस पडला होता. यावर्षी ४८८.८३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना १९९.०२ मि.मी. म्हणजे ४०.७१ मि.मी. पाऊस पडला आहे.

यावर्षी पर्जन्यमान घटल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी खोलवर गेली आहे. सरासरी ४० टक्के पाऊस पडल्याची नोंद असली तरी अनेक भागात यापेक्षा कमी पाऊस पडला आहे. आमचा अहवाल जिल्हाधिकारी व वरिष्ठ कार्यालयाला दिला आहे.
- मुश्ताक शेख, वरिष्ठ भू-वैज्ञानिक सोलापूर 

उजनी धरण वगळता अन्य तलावांतील पाणीसाठे शून्यावर आहेत. लहान-मोठे तलावही कोरडे आहेत. आता पशुधन जगविणे व नागरिकांना पिण्यासाठीच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. उजनी धरण भरले असले तरी सर्वांना पाणी मिळेल याची दक्षता घेण्याची गरज आहे.
- राजन पाटील, माजी आमदार, सोलापूर 

जिल्ह्यातील १०० गावांतील खरीप पिकांच्या परिस्थितीचा अंदाज घेतला आहे. या १०० गावांतील पिकांची परिस्थिती आॅनलाईन भरण्याचे काम तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक उद्या(रविवारी) करणार आहेत. 
- बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

Web Title: Water supply reduction meters in Solapur district decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.