खंडित वीजपुरवठ्यामुळे मंगळवेढ्यावर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:27 AM2019-04-29T10:27:36+5:302019-04-29T10:28:33+5:30

शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आल्याने संताप व्यक्त होत आहे.

Water Resource on Mars | खंडित वीजपुरवठ्यामुळे मंगळवेढ्यावर जलसंकट

खंडित वीजपुरवठ्यामुळे मंगळवेढ्यावर जलसंकट

Next
ठळक मुद्देनगरपालिका पाणीपुरवठा विभागाने खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरावर जलसंकट ओढत असल्याचे सांगितले.सोलापूर शहराला उजनीतून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या हा बंधारा पाण्याने भरून घेतला आहे.या बंधाºयात मुबलक पाणी असतानाही मंगळवेढा शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.  

मंगळवेढा : शहराला पाणीपुरवठा करणारा उचेठाण को. प. बंधारा फुल्ल भरला असतानाही शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत आल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने खंडित वीज पुरवठ्यामुळे शहरावर जलसंकट ओढत असल्याचे सांगितले.

शहराला उचेठाण येथील भीमा नदीवरील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो़ सोलापूर शहराला उजनीतून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या हा बंधारा पाण्याने भरून घेतला आहे. त्यामुळे या बंधाºयात मुबलक पाणी असतानाही मंगळवेढा शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.  

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र पाण्याची मागणी वाढली आहे. शिवाय शहरातील हातपंपाला क्षारयुक्त पाणी येत असल्याने त्याचा वापर केवळ कपडे धुण्यासाठीच केला जातो़ पाणी पुरवठ्यातील अनियमतितेबाबत नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडे संपर्क साधला असता वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे़ त्यामुळे शहरातील पाण्याच्या टाक्या भरू शकत नाहीत याचा परिणाम पाणीपुरवठा वितरणावर होत असल्याचे सांगण्यात आले. 

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उचेठाण जॅकवेल व जलशुध्दीकरण केंद्र येथे स्वतंत्र फिडर बसवण्याची मागणी नगरपालिकेने उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे १५ एप्रिल रोजी केली आहे. शहरासाठी ३० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या ५ टाक्या आहेत. यामध्ये नागणेवाडी येथे (जुनी) ७ लाख लिटर क्षमतेची तर नागणेवाडी येथेच नवीन ६़५० लाख लिटर क्षमतेची दुसरी टाकी बांधण्यात आली आहे. तसेच संभाजीनगर येथे ६़५० लाख लिटर क्षमतेची, सांगोला रोड येथे ६़५० लाख लिटर क्षमतेची, साठेनगर येथे ३़५०  लाख लिटर क्षमतेचे अशा ५ ठिकाणी टाक्या बांधून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये प्रतिदिनी ३० लाख लिटर पाणी नदीपात्रातून उचलले जाते आहे. शहरामध्ये जवळपास ३३५० बिगर मीटरचे नळ कनेक्शन आहेत़ प्रति व्यक्ती, प्रतिदिनी १३५ एल. पी. सी. डी. पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या उन्हाळा पाण्याची मागणी होत आहे़ 

स्वतंत्र फिडर बसविण्याची केली मागणी
- मंगळवेढा शहराला पाणीपुरवठा करणाºया जॅकवेलला सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पाण्याच्या टाक्या भरण्यास अडचण येत आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करण्यात विलंब होत आहे. स्वतंत्र फिडर बसविण्यासाठी वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना लेखी पत्र दिले आहे. स्वतंत्र फिडर कार्यान्वित झाल्यास नित्यनियमाने शहराला पाणीपुरवठा होईल. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपालिका पाणीपुरवठा अभियंता अजय नरळे यांनी केले आहे़

मंगळवेढा नगरपालिकेकडून उचेठाण येथील जॅकवेल व जलशुध्दीकरण केंद्रास स्वतंत्र फिडर बसविण्यासाठी मागणी आली आहे़ त्यानुसार त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. 
- सत्यजित आमरे, 
सहायक अभियंता, शहर विभाग

भीमा नदीच्या पात्रात पाणी असतानाही शहराला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही़ त्यामुळे पाण्यासाठी भर उन्हात भटकंती करावी लागत आहे. शहरामध्ये हातपंपाला क्षारयुक्त पाणी असल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही़ परिणामी पिण्याचे पाणी कोठून आणायचे असा प्रश्न आहे. 
- शिवाजी माळी,
नागरिक 

Web Title: Water Resource on Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.