वैकुंठ एकादशीनिमित्त उत्तरद्वार दर्शन; गोविंदाऽ गोविंदाऽऽ च्या गजरात सोलापुरातील व्यंकटेश्वर मंदीरात ८० हजार भाविक नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:33 PM2018-12-19T12:33:13+5:302018-12-19T12:35:03+5:30

सोलापूर : वैकुंठ एकादशीनिमित्त पूर्व भागातील व्यंकटेश्वर मंदिरात मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी रांगा लावल्या होत्या. तीस तमिळ भाषेतील ...

Vaikunth Ekadashi on the occasion of the north gate; Govinda Govinda's Gazette at Vyankateswara temple in Solapur, 80 thousand devotees | वैकुंठ एकादशीनिमित्त उत्तरद्वार दर्शन; गोविंदाऽ गोविंदाऽऽ च्या गजरात सोलापुरातील व्यंकटेश्वर मंदीरात ८० हजार भाविक नतमस्तक

वैकुंठ एकादशीनिमित्त उत्तरद्वार दर्शन; गोविंदाऽ गोविंदाऽऽ च्या गजरात सोलापुरातील व्यंकटेश्वर मंदीरात ८० हजार भाविक नतमस्तक

Next
ठळक मुद्देतीस तमिळ श्लोकांद्वारे सहा तास भगवंताची आराधनापालखी सोहळ्यानंतर दिले भक्तांना आरशातून दर्शन

सोलापूर : वैकुंठ एकादशीनिमित्त पूर्व भागातील व्यंकटेश्वर मंदिरात मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांनी रांगा लावल्या होत्या. तीस तमिळ भाषेतील श्लोकांद्वारे भगवंताची आराधना करण्यात आली. सकाळी सहा वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. गोविंदा ऽ गोविंदाऽऽ च्या गजरात रात्री ११ वाजेपर्यंत जवळपास ८० हजार भाविकांनी बालाजीचे दर्शन घेतले. 

धनुर्मासात येणारा शुक्ल पक्ष एकादशीचा दिवस म्हणजे वैकुंठ एकादशी. या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडातील ३३ कोटी देव विष्णूच्या दर्शनासाठी वैकुंठात येतात. या दिवशी भगवान विष्णूच्या दर्शनामुळे देवलोकात शापित व्यक्तींना शापमुक्ती मिळते. प्रत्येकाच्या समस्यांचे निराकरण या दर्शनामुळे होते, अशी आख्यायिका असल्यामुळे या दिवशी हजारो लोक विष्णूचे दर्शन घेतात.

पहाटे पाच वाजता धार्मिक विधीला सुरुवात झाली. सुप्रभात, अभिषेकाचा कार्यक्रम झाल्यानंतर तिरुपतीहून पाचारण करण्यात आलेल्या स्वामींनी तीस तमिळ भाषेतील श्लोकांद्वारे व्यंकटेशाची आराधना केली. यानंतर भगवंत पालखीत विराजमान झाले. पहाटे साडेपाच वाजता मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली. सकाळी साडेसहाच्या दरम्यान उत्तर द्वारातून देवाची स्वारी मंदिरात दाखल झाली.

यावेळी समोर लावलेल्या आरशात भगवंताची प्रतिकृती पाहून उपस्थित भाविकांनी गोविंदाऽ गोविंदाऽऽ चा गजर केला. साडेसहा वाजता धर्मदर्शन सुरू करण्यात आले. दर्शनानंतर भाविकांना पुलहोरा, शिरा, फळे, खडीसाखर, लाडू, दहीभात, पोंगाली भात, असा प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी व्यंकटेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष जयेंद्र द्यावनपल्ली, रायलिंग आडम, राजेशम येमूल, व्यंकटेश चिलका, नरहरी चिप्पा, श्रीनिवास बोद्धूल, लक्ष्मीनारायण कमटम, श्रीनिवास गाली, राजीव जक्कन, गोविंद बुरा यांच्यासह हजारो भक्त उपस्थित होते.

राजकीय नेत्यांचा टेंपल रन!
- वैकुंठ एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे दर्शन घेतल्यास सर्व समस्या आणि अडचणी दूर होतात, असे सांगितले जात असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडेसाती दूर व्हावी, यासाठी राजकीय दिग्गजांनी आजच्या दिवशी भगवंताचे दर्शन घेतले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक, राजकीय पदाधिकाºयांनी दर्शनासाठी व्यंकटेश्वर मंदिरात हजेरी लावली होती.

वैकुंठ एकादशीच्या मुहूर्तावर हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही यावर्षी दीडशे स्वयंसेवक तैनात ठेवले होते. रांगेत उभा ठाकलेल्या भाविकांना सर्व सुविधा मिळण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे वैकुंठ एकादशीचा उत्सव सुरळीत पार पडला.
- जयेंद्र द्यावनपल्ली
अध्यक्ष, व्यंकटेश्वर देवस्थान.

१०५ जणांचे रक्तदान 
च्धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्याच्या ऊर्मीने देवस्थानच्या वतीने वैकुंठ एकादशीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात सायंकाळी सहा वाजेपर्यंत १०५ दात्यांनी रक्तदान केले.

Web Title: Vaikunth Ekadashi on the occasion of the north gate; Govinda Govinda's Gazette at Vyankateswara temple in Solapur, 80 thousand devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.