अहोरात्र झटून उजनी धरणावर उभारली दुबार पंपिंगची यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 10:38 AM2019-05-07T10:38:19+5:302019-05-07T10:40:23+5:30

 उजनी धरणातील पाणीपातळी उणे ३५ टक्क्यांखाली; २३ पंपांद्वारे उपशाला सुरूवात

Twilight pumping mechanism, built on the Ujani Dam | अहोरात्र झटून उजनी धरणावर उभारली दुबार पंपिंगची यंत्रणा

अहोरात्र झटून उजनी धरणावर उभारली दुबार पंपिंगची यंत्रणा

googlenewsNext
ठळक मुद्देशहराला उजनी ते पाकणी जलवाहिनी, औज ते सोरेगाव आणि हिप्परगा तलाव या तीन योजनांमधून पाणीपुरवठा होतो. हिप्परगा तलाव कोरडा पडल्याने उर्वरित दोन योजनांमधून पाणीपुरवठा सुरू उजनी जलाशयावर महापालिकेचे पंपगृह आहे. जलाशयाच्या काठावर १५ मीटर खोलीची चर आहे, यातून पाणी उपसा केला जातो.

सोलापूर : उजनी धरणातीलपाणीपातळी उणे ३५ टक्क्यांखाली गेल्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उजनी जलाशयातून दुबार पंपिंग सुरू केले आहे. धरणाच्या काठावर नव्याने यंत्रणा उभारण्यात आली आहे. उन्हाच्या झळा आणि रात्रीची धग सोसत धरणाच्या खोल पाण्यात उतरून कामगारांनी ३६ वीजपंपांच्या पार्ईप आणि वायरिंग जोडणीचे काम पूर्ण केले आहे. पुढील दोन महिने दोन वरिष्ठ अधिकारी आणि १५ कर्मचारी या ठिकाणी तैनात असणार आहेत. 

शहराला उजनी ते पाकणी जलवाहिनी, औज ते सोरेगाव आणि हिप्परगा तलाव या तीन योजनांमधून पाणीपुरवठा होतो. हिप्परगा तलाव कोरडा पडल्याने उर्वरित दोन योजनांमधून पाणीपुरवठा सुरू आहे. उजनी जलाशयावर महापालिकेचे पंपगृह आहे. जलाशयाच्या काठावर १५ मीटर खोलीची चर आहे. यातून पाणी उपसा केला जातो. 

उजनी जलाशयाची पाणीपातळी उणे ३५ टक्क्यांखाली गेल्यानंतर पंपगृहाच्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे जलाशयात आणखी पुढे जाऊन पाणी उपसा  केला जातो. हे पाणी जॅकवेलच्या चरपर्यंत सोडण्यात येते.  यंदा उजनी धरण १०० टक्के भरले  होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धरणातून नियोजनापेक्षा  जास्त पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले. परिणामी धरणाची पाणीपातळी लवकर खालावली. 

उजनी धरणातील पाणीपातळीचा अंदाज आल्यानंतर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने १५ एप्रिलपासून दुबार पंपिंगची तयारी सुरू केली होती. महापालिकेने या कामासाठी ३० लाख रुपयांची तरतूद करुन ठेवली आहे. यंत्रणा उभी करण्यासाठी एक कंत्राटदार नेमण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख गंगाधर दुलंगे, उपअभियंता संजय धनशेट्टी, सहायक अभियंता संतोष यलगुलवार, इलेक्ट्रिक सुपरवायझर नितीन अंबिगार यांच्यासह कर्मचाºयांनी उजनी जलाशयाच्या काठावर नव्याने यंत्रणा उभी करुन घेतली.

सोमवारी दुपारी १० अश्वशक्तीच्या पंपाची चाचणी घेण्यात आली. मंगळवारपासून नियमितपणे पाणी उपसा करुन जॅकवेलपर्यंत सोडण्यात येणार आहे. जून-जुलै महिन्यात पाउस पडल्यानंतर उजनी धरणातील पाणी पातळीत वाढ होईल. तोपर्यंत दुबार पंपिंगचे काम सुरू राहणार आहे. पाउस पडल्यानंतर ही सर्व यंत्रणा पुन्हा हटविण्यात येणार आहे. ही सर्व यंत्रणा पुन्हा पाकणी येथील पंपगृहात आणून ठेवण्यात येणार आहे.   

अशी आहे यंत्रणा 

  • - ५० अश्वशक्तीचे दोन पंप : एक पंप चालू, एक पंप पर्यायी
  • - ३० अश्वशक्तीचे चार पंप : दोन पंप चालू, दोन पंप पर्यायी
  • - १० अश्वशक्तीचे ३० पंप : २० पंप चालू, १० पंप पर्यायी
  • - या पंपांसाठी स्वतंत्र वीज पुरवठ्याची यंत्रणा

आजवर पाच वेळा दुबार पंपिंग
- पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय धनशेट्टी म्हणाले, २००८ पासून आजवर पाच वेळा दुबार पंपिंग करावे लागले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये एप्रिल महिन्यात दुबार पंपिंग करण्यात आले होते. यंदा मात्र मे महिन्यात दुबार पंपिंग करावे लागले आहे. उजनी धरणाची पाणीपातळी उणे ५० टक्क्यांखाली गेली तर तिबार पंपिंग करावे लागेल. मागच्या वेळी ३० अश्वशक्तीचे दोन तर ५० अश्वशक्तीचा एक पंप वाढविण्यात आला आहे. 

Web Title: Twilight pumping mechanism, built on the Ujani Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.