नऊ जिल्ह्यांमधील तीन हजार पोलीस अकलूजमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 02:25 PM2019-04-16T14:25:29+5:302019-04-16T14:27:39+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या जाहीर सभा; सभास्थळाला पोलीस छावणीचे रूप, हेलिपॅडची झाली चाचपणी

Three thousand police officers from nine districts were admitted in Akluj | नऊ जिल्ह्यांमधील तीन हजार पोलीस अकलूजमध्ये दाखल

नऊ जिल्ह्यांमधील तीन हजार पोलीस अकलूजमध्ये दाखल

Next
ठळक मुद्देमाढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलासमोरील जागेत होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला

अकलूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकलूज येथील सभेसाठी पोलीस विभागाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे़ नऊ जिल्ह्यांमधील सुमारे तीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी अकलूज शहरात दाखल झाले आहेत़ सभास्थळाला पोलीस छावणीचे रूप आले आहे. सभास्थळाचा कोपरा न् कोपरा पोलीस कर्मचारी कसून तपासत आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलासमोरील जागेत होत आहे़ सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या मार्गदर्शनाखाली सात जिल्हा पोलीस प्रमुख व अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, २१ उपविभागीय पोलीस अधिकारी, ५३ पोलीस निरीक्षक, १८२ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक असे एकूण २५६ पोलीस अधिकारी, १ हजार ८९० पुरुष पोलीस कर्मचारी, १४४ महिला पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे २६ पोलीस कर्मचारी असे एकूण २ हजार ६० पोलीस कर्मचारी, क्यु. आर. टी. विभागाचे ३ पथक, १३ बॉम्ब शोध पथके व राज्य राखीव पोलीस दलाच्या २ तुकड्यातील २०० पोलीस कर्मचारी असे एकूण ३ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद शहर व ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, रायगड, रत्नागिरी या ९ जिल्ह्यांतून आज अकलूज शहरात दाखल झाले आहेत.

अकलूज पोलीस ठाण्यात हजेरी देऊन सभास्थळावर बंदोबस्त करीत असल्याने त्या ठिकाणी छावणीचे स्वरूप आले आहे. सभास्थळावर बॉम्ब शोध पथकातील पोलीस कर्मचारी व डॉग स्कॉड सातत्याने तपासणी करीत आहेत. अकलूज पोलीस ठाणे ते सभास्थळापर्यंत खाकीधारक पोलिसांचे ताफे दिसून येत आहेत तर पोलिसांच्या गाड्यांचीही ये-जा सुरू आहे.

हेलिपॅडची झाली चाचपणी
- अकलूज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्ताने हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत़ त्या हेलिपॅडचीही चाचपणी करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी सभास्थळानजीकच्या हेलिपॅडवर, शंकरराव मोहिते महाविद्यालय माळेवाडी-अकलूज व बायपास रोडनजीकच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर तीन वेळा लँड करून हेलिपॅडची चाचपणी करण्यात आली़

Web Title: Three thousand police officers from nine districts were admitted in Akluj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.