The stoppage of the car awaiting the VIP road in Solapur city | जागोजागी कार थांब्याने सोलापूर शहरातील व्हीआयपी रस्ता बनलाय अरुंद
जागोजागी कार थांब्याने सोलापूर शहरातील व्हीआयपी रस्ता बनलाय अरुंद

ठळक मुद्देवाहतुकीस अडथळे, जामर लावण्याची कारवाई थंडच !रस्त्याच्या कडेला कारचालक अन् टेम्पो-ट्रॉलीचालकांनी केलेले थांबे वाहतुकीला अडथळे तासाभरातील या रिपोर्टिंगवेळी जवळपास ५० हून अधिक वाहने बेकायदेशीर थांबल्याचे चित्र कॅमेºयात कैद

रेवणसिद्ध जवळेकर 

सोलापूर : विमानतळ ते पार्क चौक हा व्हीआयपी रस्ता म्हणून परिचयाचा... चारपदरी असलेला हा रस्ता पार दुपदरी होेऊन गेलाय... रस्त्याच्या कडेला कारचालक अन् टेम्पो-ट्रॉलीचालकांनी केलेले थांबे वाहतुकीला अडथळे ठरत असल्याचे चित्र शुक्रवारी ‘लोकमत’ चमूने केलेल्या आॅन द स्पॉट रिपोर्टिंगवेळी  प्रखरपणे जाणवले. तासाभरातील या रिपोर्टिंगवेळी जवळपास ५० हून अधिक वाहने बेकायदेशीर थांबल्याचे चित्र कॅमेºयात कैद झाले.

दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी होटगी रोडवरील विमानतळापासून ‘लोकमत’ चमू या मोहिमेवर निघाला. येथून आसरा चौकापर्यंत दोन-तीन ट्रकचा अपवाद वगळता कार थांबल्याचे चित्र पाहावयास मिळाले नाही. ट्रॅफिक जामचे चित्र दिसू लागले. आसरा चौकापासून पुढे महावीर चौकाकडे मार्गस्थ होताना आसरा चौकाच्या पुढे टंकसाळ शॉपिंग सेंटरसमोर एक ट्रक थांबला होता. ट्रकचा चालकही जागेवर नव्हता. ग्रीन सिग्नल पडल्यावर आसरा चौकातून पुढे येणाºया वाहनांना नीट रस्ता मिळत नव्हता. १२ वाजून ३० मिनिटांनी हॉटेल किनाºयासमोर एका पक्षाच्या बैठकीसाठी आलेल्या नेतेमंडळींची कार थांबली होती. पुढे अ‍ॅपेक्स हॉस्पिटल ते महावीर चौक या अंतरावरही कार अन् इतर चारचाकी वाहने थांबल्याचे चित्र चमूतील छायाचित्रकाराने आपल्या कॅमेºयातून टिपले. 

याच चौकाच्या पुढे लिटिल फ्लॉवर स्कूलच्या पुढे गांधीनगर चौकापर्यंतच्या वळणापर्यंतही तीन-चार कार थांबलेल्या दिसल्या. तेथून हेरिटेज, त्रिपुरसुंदरी हॉटेलपासून कारीगर पेट्रोल पंपापर्यंतही वाहतुकीस अडथळे ठरण्यासारखी स्थिती चारचाकी वाहनांच्या थांब्यामुळेच दिसून आली. दुपारी पाऊण वाजता चमूची स्वारी पुढे मार्गस्थ झाली. बीएसएनएल कार्यालयासपासून पुढे जुना एम्प्लॉयमेंट चौकापर्यंतही ठराविक अंतराने कार आणि इतर छोट्या-मोठ्या गाड्या थांबलेल्या होत्या.

जुना एम्प्लॉयमेंट चौकातील एका हॉटेलपासून ते डॉ. हेडगेवार रक्तपेढीपर्यंतच्या सह्याद्री शॉपिंग सेंटरपर्यंत ८ ते १० कार एका रांगेत अन् वाहतुकीस अडथळे येतील या पद्धतीने थांबल्या होत्या. तेथून पुढे डफरीन चौकापर्यंत हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत कारचालकांचे बेकायदेशीर थांबेही चमूच्या नजरेत भरले. डफरीन चौकातील एका रसवंतीसमोर दुचाकी गाड्या थांबल्यामुळे वळणावर इतर मार्गावर जाणाºयांना तारेवरची कसरत करावी लागत होती.दुपारी १ वाजून २ मिनिटांनी पार्क चौकातून पुन्हा विमानतळापर्यंत परतीच्या मोहिमेकडे वळलो. नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानासमोरील रस्त्याच्या कडेला १० ते १२ कारचालक आपल्या गाड्या पार्क केल्याने हा रस्ता एकेरीच बनला होता. तेथून सात रस्ता, बांधकाम खात्याचे कार्यालय, गांधीनगर विणकर वसाहत आणि पुढे आसरा चौकमार्गे विमानतळापर्यंतच्या मोहिमेतही ठराविक अंतरावर कारसह इतर चारचाकी गाड्या थांबल्याचे नजरेत भरले. 

कारचे उघडे दरवाजे घातक...
- व्हीआयपी रस्त्यावर थांबलेल्या कारपैकी काही चालक दरवाजा उघडून बाहेर येतानाचा अंदाज पाठीमागून येणाºया दुचाकीस्वारांना आलाच नाही. एक-दोघा दुचाकीस्वारांनी ‘अहो, आमचा विचार करा. आमचं काही बरंवाईट झालं तर कोण जबाबदार’ अशी तंबीही त्या चालकास देतानाही दिसून आले. अचानक कारचा दरवाजा उघडण्याच्या प्रकारामुळे मागे काही अपघात घडले आहेत. तसा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर कार पार्किंग करणाºयांवर कारवाई करावी, असा सूरही काही दुचाकीस्वारांना बोलते केले असता त्यांच्यामधून ऐकावयास मिळाला.


Web Title: The stoppage of the car awaiting the VIP road in Solapur city
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.