पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सोलापूरात साकारतेय स्पॅरो पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:30 PM2018-05-21T12:30:11+5:302018-05-21T12:30:11+5:30

Sparrow Park, which is being developed in Solapur, for the protection of birds | पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सोलापूरात साकारतेय स्पॅरो पार्क

पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सोलापूरात साकारतेय स्पॅरो पार्क

Next
ठळक मुद्देघरटी तयार करण्याचे प्रशिक्षण आणि वाटपाचे नियोजन पाणी आणि धान्य ठेवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने भांडी तयार देशी झाडांची लागवड. शाळा आणि महाविद्यालयातून झाडी लावण्याचा उपक्रम

विलास जळकोटकर
आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट... दाट वनराई... हवंहवंसं प्रसन्न वाटणारं वातावरण कोणाला नकोय; पण हे करणार कोण? या प्रश्नाभोवतीच गाडी रखडतेय. काही मंडळी निसर्ग आणि पर्यावरणासाठी वाहून घेताहेत. मंद्रुपसारख्या ग्रामीण भागात  निवृत्त शिक्षक आणि त्यांचे           सुपुत्र  पक्षी संवर्धनासाठी ‘स्पॅरो पार्क’ची संकल्पना राबवत  आहेत. हाच उपक्रम मोठ्या शहरांसह, खेडोपाडी, घराघरांमध्ये राबविण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. यासाठी सोशल मीडिया ते मित्रपरिवारांच्या माध्यमातून हाक दिली आहे. 

मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) या शहरवजा खेडेगावातील राष्ट्रपती पुरस्कार विजेते विज्ञान शिक्षक सिद्धेश्वर म्हेत्रे आणि त्यांचे शिक्षक सुपुत्र अरविंद म्हेत्रे यांनी त्यांच्या ‘आनंदवन’ शेतामधील मळ्यात   पक्षी संवर्धनासाठी ‘स्पॅरो पार्क’  हा प्रयोग सुरु केला आहे. सध्या       येथे दोन शेडमध्ये एकूण १८  घरटी बसविलेली आहेत. तिसºया नवीन शेडचे काम सुरु आहे़   यामध्ये साधारण १४ घरटी   बसविता येतील. सोबत पोपटांसाठी मोठ्या आणि झाडांवर बांधण्यासाठी वेगळ्या प्रकारची जवळपास आणखी १५ ते २२ घरटी बनविण्यात येणार असल्याचे अरविंद म्हेत्रे यांनी सांगितले.

सर्वत्र कमी होत जाणारी पक्ष्यांची संख्या चिंताजनक आहे. पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी आणि संवर्धनासाठी त्यांना अपेक्षित असणारे वातावरण निर्माण करणे गरजेचे बनले आहे. स्पॅरो-पार्क ही संकल्पना मंद्रुपसारख्या ग्रामीण भागात राबविली जात आहे; परंतु अशा उपक्रमांची शहरांमध्येदेखील आवश्यकता आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये पक्ष्यांसाठी कृत्रिम घरट्याच्या माध्यमातून पक्ष्यांना ‘कोपरा’ देण्याची गरज आहे. 

सोबतच पाण्याची आणि धान्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. सिद्धेश्वर म्हेत्रे यांनी टाकाऊ वस्तूंपासून अभिनव अशी पाण्याची भांडी, धान्यासाठी भांडी बनविलेली आहेत. यातून विद्यार्थ्यांना वेगळं असं शिकायला मिळणार आहे. असाच उपक्रम आपल्याला शाळा             आणि महाविद्यालयातून राबविण्याचा मानस आहे. सोशल मीडिया, मित्रपरिवारांना म्हेत्रे यांनी ‘स्पॅरो पार्क’ उभे करण्यासाठीचे आवाहन केले आहे. 

अशी सूचली कल्पना...
२० मार्च २०१८ या दिवशी भल्या पहाटे ‘चिमणी दिना’वर विचार करत असताना आपण केवळ चिमणी दिनी ह्यया चिमण्यांनो परत फिरा रे.. ह्य म्हणत बसण्यापेक्षा काहीतरी कृतिशील उपक्रम राबवूया या अनुषंगाने ‘स्पॅरो पार्क’ ची संकल्पना उदयास आली. सोशल मीडियावर चिमणी दिनाचं औचित्य साधून स्पॅरो पार्क संकल्पना पोस्ट केली आणि पर्यावरणप्रेमी मित्रांना त्यांच्या सूचना आणि कल्पना मांडण्याचे आवाहन केले. सर्व मान्यवर पक्षी अभ्यासकांच्या आणि पर्यावरणप्रेमी मित्रांच्या माध्यमातून सर्वांगसुंदर ‘स्पॅरो पार्क’ची निर्मिती करण्याचा संकल्प केला आहे. सर्वांच्या सक्रिय योगदानातून ही संकल्पना पुढे नेण्याचा आपला मानस असल्याचे अरविंद म्हेत्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

काय आहे उद्देश़़
- विविध प्रकारच्या पक्ष्यांचे संवर्धन. पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी आणि अधिवासासाठी उपयुक्त जागा. 
- विद्यार्थी जेव्हा या ‘स्पॅरो पार्क’ला भेट देतील तेव्हा या ठिकाणच्या पक्ष्यांची त्यांना ओळख व्हावी, त्यांना काही तरी नवीन शिकायला मिळावे आणि पर्यावरण संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कृतिशील संदेश देता यावा हा उद्देश आहे. 

पक्षी निरीक्षणात आढळले १६ विविध पक्षी 
- मंद्रुप येथे म्हेत्रे यांच्या शेतावर साकारत असलेल्या स्पॅरो पार्कवर पक्षीमित्र मुकुंद शेटे, राष्टÑपती पारितोषिक विजेते विज्ञान शिक्षक सिद्धेश्वर म्हेत्रे, अरविंद म्हेत्रे, त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी दीड तास केलेल्या पक्षीनिरीक्षणात विविध प्रकारचे १६ पक्षी आढळले. यामध्ये राखी वटवट्या, रॉबिन, सनबर्ड, परपल रम्पेड सनबर्ड, चष्मेवाला, भारद्वाज, कोकिळा,सुबक, बुलबुल, टेलर बर्ड, वेडा राघू , नाचºया, राखी धनेश (दुर्मिळ पक्षी), पिवळ्या डोळ्यांचा वटवट्या, कोतवाल, चिमण्या यांचा समावेश होता.

स्पॅरो पार्कमध्ये समावेश 

  • - पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे 
  • - विविध प्रकारची अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलेली २२ घरटी सध्या बसविलेली आहेत
  • - पक्ष्यांची माहिती आणि पक्ष्यांवरच्या मान्यवर कवींनी केलेल्या कवितांचे वाचन सुरु आहे
  • - निसर्ग छायाचित्रकारांनी टिपलेल्या पक्ष्यांच्या सुंदर फोटोंचे संकलन सुरु आहे 
  • - घरटी तयार करण्याचे प्रशिक्षण आणि वाटपाचे नियोजन 
  • - पाणी आणि धान्य ठेवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने भांडी तयार केली आहेत
  • - देशी झाडांची लागवड. शाळा आणि महाविद्यालयातून झाडी लावण्याचा उपक्रम स्पॅरो-पार्कसोबत घेतला आहे 
  •  
  •  
  • ‘निसर्ग संवर्धन’ हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रति रुची, आवड निर्माण करणे आवश्यक आहे. स्पॅरो पार्कच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना खूप काही शिकता येईल. विविध स्वनिर्मित विज्ञान उपकरणांद्वारे त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याचा मानस आहे. या उपक्रमाला सुरूवात केली आहे, मान्यवर पर्यावरण अभ्यासकांच्या सहकार्याने ही संकल्पना नक्कीच पूर्णत्वास जाईल.

- सिध्देश्वर म्हेत्रे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते विज्ञान शिक्षक, मंद्रुप.

 

Web Title: Sparrow Park, which is being developed in Solapur, for the protection of birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.