भाजपच्या एकहाती नेतृत्वामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाढले बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 04:37 PM2019-05-24T16:37:09+5:302019-05-24T16:38:33+5:30

प्रचारातील काँग्रेस नेत्यांचा विसंवाद लोकसभा निवडणुकीत तालुक्यात चर्चेचा विषय ठरला

South Solapur assembly constituency increased strength due to BJP's leadership | भाजपच्या एकहाती नेतृत्वामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाढले बळ !

भाजपच्या एकहाती नेतृत्वामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाढले बळ !

googlenewsNext
ठळक मुद्देपाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेतृत्व नसतानाही सोलापूर दक्षिणमधून भाजपला मताधिक्य मिळालेसहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नेतृत्व मिळाल्याने भाजपची शक्ती मतदारसंघात वाढली विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत  भाजपने आपले बळ वाढवले

सोलापूर : एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपच्या एकहाती नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा एकदा बळ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचारातील काँग्रेस नेत्यांचा विसंवाद लोकसभा निवडणुकीत तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. त्याचेच पडसाद मतदानात उमटल्याचे दिसून येते.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेतृत्व नसतानाही सोलापूर दक्षिणमधून भाजपला मताधिक्य मिळाले. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नेतृत्व मिळाल्याने भाजपची शक्ती मतदारसंघात वाढली आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत  भाजपने आपले बळ वाढवले. कार्यकर्त्यांचा समन्वय साधत पक्षाला सत्तेपर्यंत आणून सोडले. ग्रामीण भागात विशेषत: भीमा आणि सीना नदीकाठी असलेल्या गावात भाजपविरोधी वातावरण असल्याची चर्चा होती त्याचे पडसाद मतदानात उमटणे अपेक्षित होते तसे घडले नाही.  डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींना या गावातूनही चांगले मताधिक्य मिळाले.

विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात कुठेच ताळमेळ नव्हता. इतकेच काय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सेनेने काँग्रेसच्या नेत्यांना साथ दिली; मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप  नेतृत्वाने सेनेला चुचकारण्याचा केलेला प्रयत्न जयसिद्धेश्वर स्वामीजींना मताधिक्य देण्यात उपयोगी ठरला. काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा तालुक्यातील विविध घटकाशी पूर्वी थेट संपर्क होता,  परंतु गेल्या काही वर्षांपासून तो तुटला. त्याचाही फटका शिंदे यांना या निवडणुकीत बसला. नव्या कार्यकर्त्यांशी संबंध प्रस्थापित करण्यात उमेदवार शिंदे आणि काँग्रेसची नेतेमंडळी कमी पडल्याचे प्रचारादरम्यान जाणवत होते, त्यावर पक्षात चर्चाच झाली नाही. याउलट क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून भाजपने या वर्गाला जवळ केले. त्यामुळे यंग ब्रिगेड भाजप उमेदवाराच्या प्रचारात कामी आली.

मतदारसंघातील बंदलगी बंधाºयाचे अर्धवट काम, भीमा नदीवरील वडापूर बॅरेजेस,  भीमा आणि सीना नद्यांना पाणी सोडणे आधी प्रश्नावर सत्ताधाºयांना धारेवर धरण्याची संधी काँग्रेसकडे होती, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

  दुष्काळी स्थिती असताना तालुक्यात जनावरांच्या चारा छावण्या उघडण्यात आल्या नाहीत,  अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज आहे अशा प्रश्नावर भाजपा नेतृत्वाला घेरण्याची संधी काँग्रेसने गमावली. थकित ऊस बिले लोकमंगल कारखान्याकडून मिळाली नाहीत याची चर्चा काँग्रेसच्या सभातून झाली पण नेत्यांनी तो प्रश्न उचललाच नाही. मोठ्या गावात भाजपाचे नवोदित कार्यकर्ते सक्रिय होते तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेचा बोलबाला अधिक होता

काँग्रेससाठी मोठे आव्हान
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला कमी मते मिळाल्याने आगामी निवडणुकीत पक्षाचे बळ वाढवण्यासाठी प्रथम नेतेमंडळीत मनोमिलन घडवण्याचे मोठे आव्हान संभाव्य उमेदवारासमोर आहे. संघटनात्मक बांधणी करून कामाला लावण्याचे कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. सामान्यांचे प्रश्न घेऊन तालुक्यात गावोगावी सत्ताधाºयांच्या विरोधात जनमत निर्माण करण्याचेही आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांचे रुदन थांबवून त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचे कामही येत्या तीन महिन्यात करावे लागणार आहे.

Web Title: South Solapur assembly constituency increased strength due to BJP's leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.