- सिध्देश्वर शिंदे

बेंबळे (जि. सोलापूर): उजनी धरणातून सौर उर्जेद्वारे एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प चेन्नईच्या टेकफेडरल या कंपनीने सादर केला आहे. या संदर्भात मंत्रालयात नुकतेच सादरीकरण करण्यात आले.
राज्यातील मोठ्या जलप्रकल्पांमध्ये उजनी धरणाचे स्थान अग्रभागी आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. ते रोखून त्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प कंपनीने तयार केला आहे. जलाशयावर ५ एकराच्या परिसरात तरंगत्या स्वरुपात हा प्रकल्प असेल. जवळपास ६ हजार ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक टेकफेडरल कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे. गुंतवणुकीच्या बदल्यात तीन ते सव्वातीन रुपये दराने महाराष्ट्र शासनाने वीज खरेदी करावी, असा प्रस्ताव कंपनीने ठेवला आहे.
तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पामधून वीजनिर्मितीबरोबर धरणातून होणारे बाष्पीभवन रोखले जाणार आहे. यामुळे मासेमारीला आणि पर्यटनाला कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.

पुढील टप्प्यात दोन हजार मेगावॅटचे लक्ष्य
उजनीतील सौरऊर्जा प्रकल्प जलाशयाच्या मध्यभागी होणार आहे. यातून तीन महिन्याला शंभर मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. पुढील टप्प्यात २ हजार मेगावॅटपर्यंत निर्मिती करण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.