सोलापूरची गड्डा यात्रा ; द्वारकेची जड वाळू अन् तेल भरून सज्ज केले यात्रेतील पर्यायी नंदीध्वज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:18 PM2018-12-12T12:18:33+5:302018-12-12T12:21:39+5:30

अनोखा प्रयोग : रेल्वे स्टेशनजवळील काडादी चाळ सराव मंडळच्या सेवेकºयांनी तयार केल्या काठ्या

Solapur's Gadha Yatra; Dwarka's heavy sand and oil filling made the optional Nanded flute in the yatra | सोलापूरची गड्डा यात्रा ; द्वारकेची जड वाळू अन् तेल भरून सज्ज केले यात्रेतील पर्यायी नंदीध्वज 

सोलापूरची गड्डा यात्रा ; द्वारकेची जड वाळू अन् तेल भरून सज्ज केले यात्रेतील पर्यायी नंदीध्वज 

Next
ठळक मुद्देनंदीध्वजांच्या काठ्याची उंची साधारणत: ३० ते ३५ फूटकाठ्याचा वरील आणि खालील भाग पोकळ ठेवल्यामुळे काठीचे हेलकावे कमी होऊन नंदीध्वज पेलणे सुकरनंदीध्वज पेलण्यचा सराव करतानाच त्याच्या सक्षमतेची चाचणी

यशवंत सादूल 

सोलापूर : ग्रामदैवत सिध्दरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजांबाबत काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास पर्यायी काठ्या मागवून त्यांना नंदीध्वजांचा साज चढविला जातो. या पर्यायी  काठ्याही मजबूत राहाव्यात, यासाठी काठ्यांच्या पोकळ जागेच्या ठिकाणी व्दारकेहून आणलेली खास वाळू आणि शेगा, करडीच्या तेलाचे मिश्रण ठासून भरण्यात आले आहे. काडादी चाळ सराव मंडळाने अनोख्या पध्दतीने तयार केलेल्या या मजबूत पर्यायी काठ्या सज्ज ठेवल्या आहेत.

मागील वर्षी लहान काठ्यांवर प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. म्हणूनच यंदा मिरवणुकीत वापरल्या जाणाºया मोठ्या काठ्यांवर हा वाळूचा प्रयोग केला आहे. त्या अधिक सक्षम असल्याचा मंडळाचा दावा आहे. रेल्वे स्टशेनसमोरील काडादी चाळ येथे मागील दोन दिवसांपासून भक्तगण या कार्यात मग्न आहेत. 

सिद्धरामेश्वरांच्या यात्रा मिरवणुकीत सर्व धार्मिक विधींचा साक्षीदार होत डौलाने सहभागी होणारे नंदीध्वज आबालवृद्धांच्या औत्सुक्याचा विषय असतो. या काठ्यांची जीवापाड जपणूक करून वर्षभर निगा राखण्यात येते. यात्राकाळातील मिरवणुक ीत काही अपरिहार्य कारणामुळे, हाताळताना काठीस क्षती पोहचल्यास त्याच क्षमतेचे नंदीध्वज ताबडतोब उपलब्ध करून द्यावे लागतात. नंदीध्वजास लागणारे बांबू उपलब्ध होण्यापासून तर यात्रेत समाविष्ठ होण्यापर्यंतची प्रक्रिया अवघड आहे.

नंदीध्वज पेलण्यचा सराव करतानाच त्याच्या सक्षमतेची चाचणी करण्यात येते. खोबरेहार, फुलांचे हार, तुडूप, हार्डी, पाटली, साज, जरीपटका, गुढी, कळस, खेळणे, भगवी पताका यांनी नंदीध्वज मिरवणुकीत सजविला जातो. सराव नंदीध्वज व मिरवणुकीतील नंदीध्वज यामध्ये ३० ते ४० किलोंचा फरक असतो. साज न चढविताचे वजन सुमारे ८० ते ९० किलो असते, तर साज चढविल्यावर हे वजन १२५ ते १३० किलोवर पोहोचते. त्यामुळे सराव करताना तेवढ्याच वजनाची साखळी बांधण्यात येते. सरावादरम्यान साखळी हेलकाव्याने खाली घसरते व हाताला टोचते. यावर पर्याय म्हणून सक्षम, चिवट व हेलकावे विरहित सरळ राहण्यासाठीद्वारका येथील वाळूचा प्रयोग करण्यात आला आहे.

काठीच्या प्रत्येक कप्प्याला छिद्र पाडून त्यात वाळू, करडी व शेंगा तेल भरण्यात आले. काठीला ईजा पोहचू नये म्हणून त्यास कॉर्कचे टोपण बसविण्यात आले. मागील दोन दिवसांपासून नागनाथ कळंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीशैल वर्धा, श्रीकांत शेंडे, अशोक पाटील, सागर वाले, अरविंद गुडगुंटीकर, विलास कोकरे, मल्लिकार्जून वाले, नागराज तुप्पद, संकेत बाभुळगावकर, आकाश चनपुरे, श्रावण सांबळे भक्तगण कार्यरत आहेत.

द्वारकेची वाळूच का?
- वस्तूत: वाळू सर्वत्र सारखीच असते; पण नंदीध्वजांसाठी वापरण्यात आलेल्या काठ्यांमध्ये व्दारकेचीच वाळू का वापरण्यात येते? असे कळंत्री यांना विचारले असता, ते म्हणाले की, आपल्याकडे मिळणारी वाळू आणि व्दारकेच्या वाळूमध्ये चिवटपणाचा मुलभूत फरक आहे. व्दारकेची वाळू मऊ आणि वजनदार असते. याशिवाय चिवटपणाही अधिक असते. विशेष म्हणजे तेलाबरोबर ती लवकर एकजीव होते.


परराज्यातून बांबू आणण्यातील अडचणीमुळे सध्या लोणंद व पाणशेत येथून काठ्या आणल्या आहेत. यात्रेसाठी नऊ पर्यायी नंदीध्वज तयार केले आहेत. ते पेलण्यास सुकर होण्यासोबतच टिकावू असण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. 
- नागनाथ कळंत्री,
 सराव मंडळ प्रमुख

हेलकावे कमी करण्यासाठी...
- नंदीध्वजांच्या काठ्याची उंची साधारणत: ३० ते ३५ फूट असते. त्यातील खालील भागातील ४ फूट आणि वरील भागातील ४ फूट जागा पोकळ ठेऊन मधल्या जागेतील प्रत्येक कप्प्यात वाळू आणि तेलाचे मिश्रण भरण्यात येते. काठ्याचा वरील आणि खालील भाग पोकळ ठेवल्यामुळे काठीचे हेलकावे कमी होऊन नंदीध्वज पेलणे सुकर होते.

Web Title: Solapur's Gadha Yatra; Dwarka's heavy sand and oil filling made the optional Nanded flute in the yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.