सोलापुरी शड्डू ; लष्करमधील बक्कर कसाब तालमीला जिमचीही जोड

By appasaheb.patil | Published: November 21, 2018 04:40 PM2018-11-21T16:40:48+5:302018-11-21T16:45:23+5:30

सैन्यांचे आश्रयस्थान होते : अपार मेहनत घेऊन शेकडो मल्ल घडले, दहा वर्र्षांपूर्वी झाले नामांतर

Solapuri Shaddu; A pair of gymnasiums from the Army, Kasab Talamila | सोलापुरी शड्डू ; लष्करमधील बक्कर कसाब तालमीला जिमचीही जोड

सोलापुरी शड्डू ; लष्करमधील बक्कर कसाब तालमीला जिमचीही जोड

Next
ठळक मुद्देलष्कर भागातील बक्कर कसबा या तालमीला शेकडो वर्षांचा इतिहास व्यायामशाळेत मेहनत करून आजवर येथे शेकडो मल्ल घडले आबादीराजे तालीम संघ म्हणून आज ही तालीम प्रसिद्ध

आप्पासाहेब पाटील 
सोलापूर : ब्रिटिश लष्कराच्या सैन्यांचे आश्रयस्थान असलेल्या लष्कर भागातील बक्कर कसबा या तालमीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. या व्यायामशाळेत मेहनत करून आजवर येथे शेकडो मल्ल घडले आहेत. आता तालमीला आधुनिकतेची जोड देण्यात आली असून, शेजारील खोलीत सुसज्ज जिमही उभारण्यात आले आहे. आबादीराजे तालीम संघ म्हणून आज ही तालीम प्रसिद्ध आहे.

सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बझार पोलीस ठाण्यासमोर १०० वर्षे पार केलेली बक्कर कसाब तालीम आहे़ एका छोट्याशा जागेत स्थापन झालेल्या तालमीत आजच्या घडीला शेकडो मल्ल सराव करीत आपले शरीर पिळदार बनवित आहेत़ ब्रिटिशांच्या काळात लष्कराच्या सैन्यांनी या परिसरात वास्तव्य करून या तालमीत व्यायाम केल्याचे परिसरातील ज्येष्ठ पैलवानांनी सांगितले़ १९५१ साली या तालमीचे पैलवान निजामोद्दीन हाजीहुसेनसाब आबादीराजे यांची कुस्ती झाली होती़ या तालमीला आजपर्यंत हिंद केसरी, महाराष्ट्र केसरीच्या अनेक पैलवानांनी भेटी दिल्या आहेत.

यात इस्माईल शेख, आप्पालाल शेख यांच्यासह अन्य पैलवानांचा समावेश आहे़ या तालमीत निजामोद्दीन आबादीराजे, महामूद कुरेशी, बाशा शेख, पोलीस कॉन्स्टेबल नाईकवाडी, अब्दुल अजीज जमादार, अब्दुल करीम शेख, गुलाम कुरेशी, दिलावर कुरेशी, संभाजी परळकर यांनी सराव करीत ठिकठिकाणच्या स्पर्धांत यश मिळविले़ सध्याच्या काळात फिजाउद्दीन आबादीराजे, शौकत पठाण, आप्पाराव कलागते, अय्युब शेख, महादेव मोरे, भागवत मोरे, सोमनाथ शिंदे, महंमद शेख, फकरुद्दीन जमादार, शब्बीर काझी आदींनी तालमीचे वैभव जपण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले़ या तालमीत संभाजी परळकर व अब्दुल लतिफ यांनी खलिफाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली.

आबादीराजेंचे योगदान
- १०० वर्षे पूर्ण केलेल्या तालमीचे १० वर्षांपूर्वी आबादीराजे तालीम संघ असे नामांतर करण्यात आले़ या तालमीला वैभव प्राप्त करून देण्याबरोबर सेवासुविधा पोहोचविण्यात आबादीराजे कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे़ पैलवान निजामोद्दीन हाजी हुसेनसाब आबादीराजे हे मागील ९१ वर्षांपासून या तालमीत सराव करतात़ दरम्यान, फिजाउद्दीन आबादीराजे हे सध्या तालमीचे काम पाहत आहेत़ आबादीराजे कुटुंबीयांनी या तालमीला पाणी, वीज अशा सेवासुविधा मोफत पुरवित आहेत़ 

माझा जन्म १९२९ साली झाला़ मागील ९१ वर्षांपासून मी या तालमीत सराव करीत आहे़ या तालमीत माझ्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्ल तयार झाले़ अनेकांनी वेगवेगळ्या स्पर्धांत सहभाग घेऊन यशस्वी कामगिरी केली़ आज या तालमीचे नाव आबादीराजे तालीम संघ असे आहे़ या तालमीत पाणी, वीज व इतर सेवासुविधा पुरविण्यासाठी आमचे कुटुंबीय प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. 
- निजामोद्दीन हाजी हुसेनसाब आबादीराजे, पैलवान, लष्कर

Web Title: Solapuri Shaddu; A pair of gymnasiums from the Army, Kasab Talamila

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.