ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची घोषणा सर्वांना चीड आणणारी आहे - मनोहर धोंडे सिद्धेश्वरांचे नाव दिल्याने विद्यापीठाची उंची वाढणार आहे - धर्मराज काडादीसिद्धेश्वरांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी प्रचंड पत्रव्यवहार केला - शिवशरण बिराजदार


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेणार असल्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी, लिंगायत समाज आणि शिवभक्तांच्या प्रचंड विरोधाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. बुधवारी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात झालेल्या बैठकीत सोमवारी १३ नोव्हेंबरला सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. सर्व शिवभक्तांनी आणि लिंगायत समाजाने एकजुटीने बंदमध्ये उतरण्याचे आवाहन केले आहे.
शिवा संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सिद्धेश्वर पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, आमदार सिद्धराम म्हेत्रे, राज्य उपाध्यक्ष माजी आमदार शिवशरणअण्णा पाटील, माजी कुलगुरू डॉ. ईरेश स्वामी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मनोहर धोंडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांची घोषणा सर्वांना चीड आणणारी आहे. कसलीही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न करता त्यांनी ही घोषणा केली आहे. ज्या समारंभात त्यांनी ही घोषणा केली त्या व्यासपीठावर असलेल्या नेतेमंडळींपुढे सभेत बोलताना भावनेच्या भरात ती केली आहे, त्यामुळे ही घोषणा मनावर घेऊ नका. उलट आंदोलनासाठी आणि प्रखर विरोधासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन त्यांनी केले. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात आमदारांच्या मदतीने मुख्यमंत्री आणि सरकारला कोंडीत पकडू, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांना ही घोषणा करण्यापूर्वी चर्चेतून मार्ग काढता आला असता. त्यासाठी सर्वांची तयारी होती. मात्र सर्वांना अंधारात ठेवून त्यांनी ही घोषणा केली. ही घोषणा कसलाही अभ्यास न करता झालेली असल्याने कायदेशीर आणि रस्त्यावरच्या लढाईत उतरा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार शिवशरण पाटील म्हणाले, धनगर समाजाची मागणी आरक्षणाची होती. मात्र ते देणे शक्य नसल्याने विद्यापीठाच्या नामकरणाचे चॉकलेट त्यांनी दाखविले आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजावर अन्याय केला आहे.
धर्मराज काडादी यांनी आपल्या भाषणातून सोमवार बंदची हाक दिली. सिद्धेश्वरांचे नाव दिल्याने विद्यापीठाची उंची वाढणार आहे, असे ते म्हणाले. 
ईरेश स्वामी म्हणाले, महात्मा बसवेश्वर हे लिंग धर्माचे संस्थापक होते. तर सिद्धेश्वर हे संशोधक होते. स्मृती जपण्यासाठी त्यांचे नाव न देता कोणतेही नाव देणे हा कृतघ्नपणा आहे. तो सहन करू नका. 
शिवशरण बिराजदार म्हणाले, सिद्धेश्वरांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी प्रचंड पत्रव्यवहार केला. भेटी घेतल्या. तरीही असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, याचे आश्चर्य आहे.
सभेमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, हत्तूरचे चंद्रशेखर भरले, दक्षिण सोलापूर राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष बसवराज बगले, सिद्धय्या स्वामी, सांगोल्याचे प्रबुद्धकुमार झपके, मुंबईचे माजी महापौर शशिकांत बिराजदार, श्वेता हुल्ले, बसवराज हिरेमठ आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेहब्बू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, केदार उंबरजे, आनंद मुस्तारे, बसवराज बगले, वीरभद्रेश बसवंती, सुदीप चाकोते, अरविंद भडोळे, अरबाळे, दीपक आलुरे आदी उपस्थित होते.
-------------------
...ही तर सिद्धेश्वरांशी गद्दारी - धोंडे
पालकमंत्री विजय देशमुख यांनी सोलापूर रेल्वे स्थानकाला सिद्धेश्वरांचे नाव देण्यासंदर्भात केलेल्या व्यक्तव्याचे तीव्र पडसादही या सभेत उमटले. अनेक वक्त्यांनी या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. प्रा. मनोहर धोंडे म्हणाले, २००० मध्ये भाजपचा पत्ताही नव्हता, त्या काळात शिवा संघटनेच्या व्यासपीठावर बसून मोठे झालेल्या आणि शिवा संघटनेमुळे मंत्रिपदापर्यंत पोहोचलेल्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा विरोध न करता उलट रेल्वे स्थानकाला सिद्धेश्वरांचे नाव देण्याचे वक्तव्य करणे म्हणजे खुद्द सिद्धेश्वरांशी गद्दारी आहे. या मंत्र्यांची आम्ही नाकाबंदी करू.
----------------
अ. भा. वीरशैव संघटनेचा पाठिंबा
अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे राज्याध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी सोमवारच्या सोलापूर बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.