solapur politics; BJP's confidence will increase; Deshukh's attachment will remain forever! | solapur politics; भाजपचा आत्मविश्वास वाढणार; म्हणे दोन देशमुखांचा लगाव कायम राहणार!
solapur politics; भाजपचा आत्मविश्वास वाढणार; म्हणे दोन देशमुखांचा लगाव कायम राहणार!

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर शहर आणि जिल्हा भाजपचा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढला एरवी एकमेकांचे तोंड न पाहणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख मोदींच्या सभामंचावर एकमेकांशी दिलखुलासपणे बोलले.

राकेश कदम 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर शहर आणि जिल्हा भाजपचा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढला आहे. या सभेमुळे दोन देशमुखांमधील अंतर कमी होईल, असा विश्वासही शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.

स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महामार्ग आणि रे नगरमधील ३० हजार गृहप्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सोलापुरात जाहीर सभा घेतली. हा कार्यक्रम प्रशासकीय असला तरी भाजप नेत्यांनी त्याला राजकीय स्वरूप दिले. मोदींनी आपल्या नेहमीच्या शैलीत राजकीय टोलेबाजी केली. ‘चौकीदार ही चोर है’ या काँग्रेसच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मिशेल मामाचा नवा मुद्दाही सोडून दिला. 

या सभेच्या निमित्ताने भाजप पदाधिकाऱ्यांनी शहराच्या विविध भागातून रॅली काढली. प्रभागनिहाय बैठका घेतला. एरवी एकमेकांचे तोंड न पाहणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख मोदींच्या सभामंचावर एकमेकांशी दिलखुलासपणे बोलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परत जाताना हा एकोपा कायम ठेवा, असा सल्ला भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे देशमुखांचे मंचावरील दिलखुलास बोलणे पुढील काळातही कायम राहील, असा आशावाद भाजप कार्यकारिणीतील नेते व्यक्त करीत आहेत. 

 मोदींनी आपल्या भाषणात शेतकरी, साखर कारखानदार, वस्त्रोद्योग या मुद्यांना स्पर्श केला नसल्याची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी केली आहे. मात्र स्मार्ट सिटीतील विकासकामे आणि राजकीय टोलेबाजीमुळे एक राजकीय वातावरण तयार करण्यात मोदी यशस्वी झाल्याचा दावा भाजपने केला आहे. 

माकपची मते कोणाच्या कोटात जाणार
- माकपचे माजी आमदार नरसय्या आडम रे नगरमधील ३० हजार घरांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातही संघर्ष करीत होते. मतपेटीच्या राजकारणामुळे शहरातील काँग्रेस नेत्यांनी या प्रकल्पात अडथळे आणले, असा आरोप आडम मास्तर करीत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. त्यामुळे आडम मास्तरांनी काल झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. मास्तरांचा काँग्रेससोबत सुरू असलेला संघर्ष आणि कालचे भाषण पाहता लोकसभा निवडणुकीत माकपची मते कोणाच्या गोटात जाणार याबद्दल उत्सुकता आहे. 

मोदींची सभा अभूतपूर्व झाली. सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. मी पार्टीमध्ये २९ वर्षे काम करतोय. मोदींचे स्वागत करायची संधी मिळाली. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही मागील सहा महिन्यांपासून तयारीला लागलोय. जो बूथ जिंकतो तो निवडणुका जिंकतो. मोदींच्या सभेसाठी बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. अंतर्गत बाबीमुळे एक मरगळ आली होती ती दूर झाली आहे. दोन देशमुखांमध्ये एकोपा राहावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 
- प्रा. अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष, भाजप.


Web Title: solapur politics; BJP's confidence will increase; Deshukh's attachment will remain forever!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.