सोलापूर काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घेराव, आमदार प्रणिती शिंदेंसह ७० लोकांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:20 PM2018-01-03T12:20:02+5:302018-01-03T12:21:09+5:30

शासनाने १ जानेवारीपासून शासकीय रुग्णालयातील उपचार शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. डीपीडीसीच्या बैठकीला निघालेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

Solapur: Guardian Minister of the Congress party, Praniti Shinde and 60 people filed a complaint against Sadar Bazhar Police Station | सोलापूर काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घेराव, आमदार प्रणिती शिंदेंसह ७० लोकांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर काँग्रेसचा पालकमंत्र्यांना घेराव, आमदार प्रणिती शिंदेंसह ७० लोकांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

googlenewsNext


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ३ : शासनाने १ जानेवारीपासून शासकीय रुग्णालयातील उपचार शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. डीपीडीसीच्या बैठकीला निघालेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
शासकीय रुग्णालयातील उपचार शुल्कात शासनाने केलेली दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. सरकारी रुग्णालयातील ही दरवाढ गरिबांना परवडणारी नाही. केसपेपरपासून शस्त्रक्रिया, एक्स-रे, एमआरआय, सोनोग्राफी तपासणीच्या शुल्कात भरमसाट वाढ केली आहे. आरोग्य सेवा स्वस्त करा, गरिबांना न परवडणारी शुल्कवाढ मागे घ्या, अशा घोषणा असलेले फलक कार्यकर्त्यांनी हातात घेऊन निदर्शने केली. कुठे आहेत पालकमंत्री, कुठे आहेत आरोग्य मंत्री अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी देऊन लक्ष वेधले. 
याच दरम्यान डीपीडीसीच्या बैठकीसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून घेराव घातला. त्यावेळी आमदार शिंदे यांनी शासकीय रुग्णालयातील शुल्कवाढ रद्द करण्याचे पालकमंत्री देशमुख यांना निवेदन दिले.  पालकमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले. या दरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना लाठीमार करून गाडीपासून दूर केले. यावेळी माजी आमदार यलगुलवार यांच्याशीही पोलिसांची झटापट झाल्याने वातावरण तापले होते. आंदोलनात शहर अध्यक्ष प्रकाश वाले, प्रदेश सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, नगरसेवक चेतन नरोटे आदी उपस्थित होते.
--------------
 आरोग्य सेवा स्वस्त करण्याच्या मागणीला धरुन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करणाºया आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार आणि काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वालेसह ६० ते ७० जणांवर सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ 
आरोग्य सेवा स्वस्त करा मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी काँग्रेसने पालकमंत्री विरोधात आंदोलन केले़ पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घालत घोषणाबाजी केली़ याप्रकरणी आ़ प्रणिती शिंदे, प्रकाश वाले, प्रकाश यलगुलवार, नगरसेवक चेतन नरोटे आणि बाबा करगुळेसह जवळपास ७० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ या घटनेत जखमी झालेले पोलीस नाईक देशमुख यांनी फिर्याद दिली आहे़ 

Web Title: Solapur: Guardian Minister of the Congress party, Praniti Shinde and 60 people filed a complaint against Sadar Bazhar Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.