आषाढीपूर्वी आरोग्य राज्यमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यात औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 04:26 PM2018-06-07T16:26:18+5:302018-06-07T16:26:18+5:30

सोलापूर जिल्ह्यातील आरोग्याची ऐशीतैशी, शासकीय यंत्रणेतील ढिसाळ कारभाराचा परिणाम

In the Solapur district, there is a shortage of medicines | आषाढीपूर्वी आरोग्य राज्यमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यात औषधांचा तुटवडा

आषाढीपूर्वी आरोग्य राज्यमंत्र्यांच्या सोलापूर जिल्ह्यात औषधांचा तुटवडा

Next
ठळक मुद्देऔषध भांडारात मागणीच्या तुलनेत अनेक औषधे पोहोचलेली नाहीत. औषध भांडारात अनेक औषधांचा तुटवडा

राकेश कदम 
सोलापूर : शासनाच्या हाफकीन जीव औषध महामंडळाकडून वेळेवर औषध पुरवठा होत नसल्याने आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या जिल्ह्यातील सरकारी आरोग्य औषध भांडारात अनेक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय पातळीवरूनही यासंदर्भात कोणतीच हालचाल होत नसल्याने आषाढी एकादशीच्या तोंडावर नेमके काय करायचे, असा प्रश्न सरकारी आरोग्य यंत्रणेला पडला आहे. इतर जिल्ह्यातील भांडारातून औषधे पाठवा किंवा जिल्ह्यातच औषध खरेदीला परवानगी द्या, अशी मागणी सरकारी यंत्रणेने आरोग्य सहसंचालकांकडे केली आहे. 

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसाठी पूर्वी जिल्हास्तरावरच औषध खरेदी केली जायची. यातील ‘कमिशन लॉबी’ला रोखण्यासाठी चार वर्षांपूर्वी शासनाने राज्य स्तरावर एकत्रित औषध खरेदीचा निर्णय घेतला. यातून राज्यस्तरावर थेट दुकानदारी सुरु झाली. औषध पुरवठ्यासाठी नामांकित हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले.

जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेने ‘हाफकीन’कडे मागणी नोंदवायची आणि त्यानुसार ‘हाफकीन’च्या यंत्रणेने जिल्हा आरोग्य औषध भांडारांना औषध पुरवठा करायचा, अशी व्यवस्था सुरू झाली. परंतु, गेल्या वर्षभरात औषध पुरवठ्यात ढिसाळपणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांचे निरीक्षण आहे. २०१७-१८ या वर्षात जिल्हा औषध भांडारात मागणीच्या तुलनेत अनेक औषधे पोहोचलेली नाहीत. 
यावर्षी निविदा आणि कंत्राटदार ठरविण्यात बराच वेळ गेल्याने राज्यभरात औषध पुरवठ्याचा गोंधळ निर्माण झाल्याचेही अधिकाºयांचे म्हणणे आहे. 

तत्काळ निर्णय कळवा
- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाºयांनी राज्य शासनाच्या आरोग्य सेवा सहसंचालकांना पत्र पाठविले आहे. यात म्हटले आहे की, २०१८-१९ साठी सोलापूर औषध भांडारात औषधे शिल्लक नाहीत. मागील दोन वर्षांपासून थोड्याफार प्रमाणात औषधे पुरवठा झाली आहेत. आवश्यक तो औषध पुरवठा शासन स्तरावरुन न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. आषाढी यात्रेनिमित्त दहा ते बारा लाख वारकरी येत असतात. त्यानिमित्त ५५ ते ६० तात्पुरते उपचार केंद्र स्थापन केले जातात. त्यात आवश्यक ती औषधे उपलब्ध करावी लागतात. इतर जिल्ह्यातील औषध भांडारामधून औषधे मिळावीत यासाठी आदेश पारित करा किंवा तत्काळ खरेदी करण्यासाठी परवानगी द्या. 

मागणी प्रमाणात पुरवठा कमी
- जिल्हा आरोग्य औषध भांडाराकडून दरवर्षी अँटीबायोटिक्ससह ४८० प्रकारच्या औषधांची मागणी नोंदवली जाते. गेल्या दोन वर्षांपासून यातील केवळ २०० ते २५० औषधे पूर्ण प्रमाणात येतात. उर्वरित औषधे कमी प्रमाणात येतात. यामुळे सामान्य माणसांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. सबका साथ, सबका विकास असा नारा देणाºया भाजप सरकारकडून सरकारी रुग्णालयातील व्यवस्था उत्तम होणे अपेक्षित होते. परंतु, सध्या तसे वातावरण दिसत नाही. 

आरोग्य भांडारात औषधे कमी असल्याचे मला सांगण्यात आलेले नाही. परंतु मी माहिती घेतो आणि चौकशीही लावतो. आषाढी एकादशी सोहळ्याच्या  पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये एक बैठकही आयोजित केली जाईल. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क राहील. औषधांसह इतर आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांकडून नियमितपणे माहिती घेईन. अत्यावश्यक काळात जिल्हा स्तरावर १० टक्के औषध खरेदी करण्यास परवानगी आहे. त्यानुसार काही करता येते का ? हे सुद्धा पाहिले जाईल. कोणत्याही परिस्थितीत औषधे कमी पडणार नाहीत, याची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे. 
- विजयकुमार देशमुख, आरोग्य राज्यमंत्री.

Web Title: In the Solapur district, there is a shortage of medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.