कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात तरुणाईच्या विविध कलागुणांचे दर्शन घडविणारा ‘शिवोत्सव-२०१७’ हा युवा महोत्सव दि. १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे. असोसिएशन आॅफ इंडियन युनिर्व्हसिटीज् (एआययु) आणि केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयाच्या सहकार्याने आठ वर्षांनंतर विद्यापीठामध्ये हा महोत्सव होणार आहे. त्यात देशभरातील १२५ विद्यापीठांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी कलाकार सहभागी होणार आहे.
विविध कलाप्रकारांद्वारे भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे. महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या कलागुणांना राष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एआययू आणि केंद्र सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयातर्फे दरवर्षी राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सव घेण्यात येतो. गेल्यावर्षी म्हैसूरमध्ये महोत्सव झाला होता. यंदाचा ३२वा महोत्सव शिवाजी विद्यापीठात होणार आहे. त्यात संगीत, गायन, फाईन आर्टस्, नृत्य, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, लघुनाटिका, मूकनाट्य, एकांकिका, अशा विविध २५ कलाप्रकारांमध्ये महोत्सवात स्पर्धा होतील. देशातील पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्यवर्ती विभागातील महोत्सवातील विविध कलाप्रकारांमधील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजेत्या विद्यापीठांचे संघ ‘शिवोत्सव’मध्ये सहभागी होतील. आतापर्यंत चार विभागांचे महोत्सव पूर्ण झाले असून, सध्या पाचव्या विभागाचा महोत्सव गुजरातमध्ये सुरू आहे.
‘शिवोत्सव’मध्ये देशातील विविध विद्यापीठांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी कलाकार सहभागी होतील. त्यांच्या कला-गुणांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे कोल्हापूरकरांना दर्शन घडणार आहे. या महोत्सवातील विजेत्यांची निवड दक्षिण आशियाई आंतरविद्यापीठ युवा महोत्सवासाठी होणार आहे. (प्रतिनिधी)


विविध २६ समित्यांद्वारे महोत्सवाची तयारी सुरू
शिवाजी विद्यापीठाने केलेल्या मागणीनुसार ‘एआययू’ने यावर्षीच्या महोत्सवाचे यजमानपद विद्यापीठाला दिले असल्याचे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांनी सोमवारी दिली. ते म्हणाले, यंदाच्या युवा महोत्सवाला विद्यापीठाने ‘शिवोत्सव’ असे नाव दिले आहे. आठ वर्षांनंतर विद्यापीठाला या महोत्सवाचे संयोजन करण्याची संधी मिळाली आहे. त्याची तयारी गेल्या महिन्यापासून सुरू आहे. यासाठी निवास-जेवण, परीक्षक नियुक्ती, आदी स्वरुपातील विविध २६ समित्यांची नियुक्ती केली आहे. महोत्सवासाठी विद्यापीठात व्यासपीठांची उभारणी, आवश्यक साहित्यांची खरेदी, निमंत्रण पत्रिकांची छपाई, आदी स्वरुपातील तयारी सुरू आहे.