शाळा म्हणजे मोठी आई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:58 AM2018-11-27T10:58:49+5:302018-11-27T10:59:12+5:30

अगदी खरंय. शाळा म्हणजे मोठी आईच असते. जन्म देणारी आई असते तर आपल्याला घडविणारी मोठी आई म्हणजे शाळा असते. ...

School is big mother ... | शाळा म्हणजे मोठी आई...

शाळा म्हणजे मोठी आई...

googlenewsNext

अगदी खरंय. शाळा म्हणजे मोठी आईच असते. जन्म देणारी आई असते तर आपल्याला घडविणारी मोठी आई म्हणजे शाळा असते. शाळा आपल्या आयुष्यात आली नसती तर आपण घडूच शकलो नसतो.आम्हाला घडविणाºया कुचन प्रशालेच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने नुकताच माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा झाला.

या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांना उद्देशून एक आॅडिओ व्हायरल करण्यात आली. ती शाळेची म्हणजेच मोठ्या आईची  हाक होती. तिच्या हाकेचा आदर करीत मीही कार्यक्रमासाठी शाळेत गेलो. खूप दिवसानंतर मोठ्या आईचा मातृस्पर्श अनुभवला. अनेक माजी विद्यार्थी जमले होते. सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. कार्यक्रम संपन्न झाला. शाळेची इमारत, त्याकाळच्या आठवणी,आम्हाला घडविणारे शिक्षक, वर्गातील मित्रमैत्रिणी, मोठ्या आईच्या कुशीतला तो संपूर्ण परिसर पुन्हा एकदा अनुभवला.

शाळेने दिलेल्या विषयज्ञानाबरोबर केलेल्या संस्कारांचे ऋण कधीच विसरता येणार नाही. त्याची परतफेड करता येत नाही. परंतु मोठ्या आईच्या हाकेनुसार योगदान घ्यावे ज्यामुळे तिला समाधान वाटेल. तसे तिला स्वत:साठी काहीच नकोय. तिला काळजी शाळेतल्या  गरीब वंचित मुला-मुलींची.या गरजू लेकरांना सक्षम माजी विद्यार्थ्यांनी  मदत आणि मार्गदर्शन करावी हीच तिची माफक इच्छा. मदत म्हणजे फक्त आर्थिक नव्हे. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी गरजेनुसार सुविधा द्याव्यात. त्याहीपेक्षा गरजेचे म्हणजे आपल्या शाळेत शिकणाºया गरीब कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांच्या  करिअरसाठी यशस्वी माजी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शनाची. विशेषत: विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी, येत्या काळातील संभाव्य नोकºया रोजगाराची संधी, अशा संबंधित विषयावर यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांशी बोलणे गरजेचे आहे. स्पर्धा खूप वाढली. त्याविषयी मुलांना जाणीव दिली पाहिजे. हीच मोठ्या आईची हाक आहे.

शंभर वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी पदरमोड करून येणारी पिढी शिक्षित करण्यासाठी  शिक्षणसंस्था उभारल्या. त्यानंतरही अनेक समाजबांधवांनी संस्थेच्या विकासासाठी मोलाची भर घातली. शिक्षकांनीही कष्ट केले. पालकांनी विश्वास दाखविला. होतकरू विद्यार्थ्यांच्या योगदानातून शाळेचा नावलौकिक  झाल्यामुळे मोठ्या आईचा उर भरून येतो. त्याचबरोबरीने हल्ली वाढत चाललेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे ती व्यथित होते.

शिक्षकांना १२० हून अधिक प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागणारा भारत हा जगातील एकमेव देश असल्याची खंत तिला आहे. भोवतालच्या वास्तव परिस्थितीमुळे मुलं दिवसेंदिवस हिंसक बनत चालली आहेत. पालक हवालदिल झालेत. ‘ग्लोबल टीचर्स स्टेटस इंडेक्स’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारताचे स्थान आठव्या क्रमांकावर आहे. याचे कारण आपल्या शिक्षकांची सामाजिक प्रतिष्ठा देखील खालावत चालली आहे. आपण मुलांना मुलांसारखं,त्यांच्या वयानुसार,बुद्धीच्या क्षमतेनुसार वाढू देत नाही. त्यांना जे येतंय,आवडतंय त्यापेक्षा पालक आणि समाजाला काय हवंय ते करायला लावतोय. त्यामुळे मुलंही बिथरली. एकंदरीत शैक्षणिक पातळीवरील विदारक आणि शाळेत येणाºया विद्यार्थ्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे केवळ शासन,शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि कर्मचारी वर्गावर मुलांचे भवितव्य सोडून देणे धोक्याचे सिद्ध झाले आहे.विद्यमान शिक्षणव्यवस्था ही परिस्थिती बदलण्यात अयशस्वी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर शाळेतून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून मोठ्या आईच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हे नक्की.  
- प्रा. विलास बेत
  (लेखक हे सामाजिक शास्त्राचे तज्ज्ञ आहेत़)

Web Title: School is big mother ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.