प्राचीन शिल्पकलेतील सप्तमातृका शिल्पपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:24 PM2018-10-16T13:24:20+5:302018-10-16T13:25:09+5:30

अनेक मध्ययुगीन देवालयात किंवा देवालयाशेजारी सप्तमातृकांची शिल्पे कोरलेली आहेत.

Saptamatrika Shilpatta of ancient sculptures | प्राचीन शिल्पकलेतील सप्तमातृका शिल्पपट

प्राचीन शिल्पकलेतील सप्तमातृका शिल्पपट

googlenewsNext

अनेक मध्ययुगीन देवालयात किंवा देवालयाशेजारी सप्तमातृकांची शिल्पे कोरलेली आहेत. वेरुळच्या कैलास लेण्यांच्या परिसरातील गुंफेत मोठ्या आकाराच्या सप्तमातृकांच्या मूर्ती आहेत. इतर देवदेवतांप्रमाणे सप्तमातृकांची नावे, त्यांची मूर्तीलक्षणे, त्यांची उत्पत्ती व त्यांचे कार्य याविषयी निरनिराळी पुराणे, मते व हकीकती देतात.

ब्रह्माणी- चतुर्मुख, हातात अक्षमाला, सुरू, पुस्तक, कमंडलू, हंस वाहन, कौमारी- षण्मुख, मयूर वाहन, माहेश्वरी- वृषभ वाहन, वैष्णवी- शंख, चक्र इ. आयुधे, गरुड वाहन, वाराही- वराहशिर, चतुर्हस्त, वराह वाहन, इंद्राणी- चतुर्हस्त, वज्र इ. ऐरावत वाहन, चामुण्डा- उग्ररूप, नररूपमुंडमाला, नर वाहन यापैकी चामुण्डेऐवजी नारसिंही येते. शिवाय या शिल्पपटात गणेशाची मूर्तीही कोरण्याची पद्धत आहे.
एका पौराणिक कथेप्रमाणे अंधकासुराशी युद्धप्रसंगी त्याच्या रक्ताच्या थेंबागणिक असूर निर्माण होऊ लागल्याने शिवाने इतर देवांच्या शक्तींना सहाय्यार्थ बोलविले व त्यांनी रक्ताचे थेंब पिऊन टाकल्याने नवे असूर निर्माण झाले नाहीत व शिवाला अंधकासुराचा नि:पात करता आला. या शक्ती म्हणजेच प्रमुख देवतांच्या शक्तीची पूजा आहे. 

या सप्तमातृका माता, देवी या उपासनापंथात समाविष्ट करण्यात येतात. देवीमाता, जगमाता, आदिशक्ती अशा विविध नावांनी स्त्रीशक्तीची उपासना करण्यात येते. अतिप्राचीन काळापासून सिंधू-संस्कृती, त्यानंतरची ताम्रपाषाणयुगीन संस्कृती तेथपासून जवळपास आजपर्यंत सृजनाचे साक्षात, मूर्तिमंत रूप म्हणून स्त्रीची पूजा होत आहे. प्राचीन अवशेषात मातीच्या स्त्रीमूर्ती गवसल्या आहेत. त्यांचे स्तन व जंघाभाग मोठे व विस्तृत दाखविलेले असून, त्या नाग आहेत. त्यांचीच परंपरा पुढे गज्जागौरी या नावाने परिचित अशा मूर्तीत चालू राहिली. या मूर्ती शिरोहीन (शिराच्या जागी बहुधा कमळपुष्प असते), दोन्ही हात दोन बाजूला, कोपरापासून वर धरलेले व त्यावरही तळहात व बोटे यांच्या जागी कमळेच, दोन्ही पाय लांब केलेले आहेत. या मूर्ती सुट्या असतात. मंदिरांच्या वास्तूंवर दिसत नाहीत. क्वचित या मूर्तीशेजारी नंदी दिसतो.

माता या कल्पनेचे थोडे जास्त सुसंस्कृत रूप म्हणजे पार्वती, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती अशा देवता. यांच्या मूर्ती सहसा स्वतंत्र आढळत नाहीत, परंतु जेथे असतील तेथे काही लक्षणे स्पष्ट दिसतात. लक्ष्मीच्या दोन्ही हातात कमळे, हत्ती वाहन, सरस्वतीच्या हातात वीणा, अक्षमाला व पुस्तक आणि मयूर वाहन किंवा हंस वाहन, पार्वती किंवा दुर्गा ही सहसा अष्टभुजा आणि महिषासुरमर्दिनी या रूपात दिसते. ती सिंहावर आरूढ असून, एका पायाने महिषाला दाबून त्रिशुळाने त्याला मारत आहे, असे तिचे ध्यान असते. शरीर महिषाचे व शिर मानवरूपी राक्षसाचे दिसते. आणखी उग्ररूप म्हणजे चामुण्डा. ती सप्तमातृकांच्या समुदायात दिसते.

शक्तीची उपासना हा तांत्रिक पंथ, बौद्ध व हिंदू दोन्ही धर्मात प्रचलित होता, परंतु हा वाममार्ग समजण्यात येई व त्याचे आचार उघडपणे चालत असत. पुरुष-प्रकृती समागम ही शक्तीपूजेची सर्वोच्च अवस्था समजत. तशा मूर्ती व चित्रे क्वचित सापडतात.
भारतात या देवीच्या प्रतिमा आणि कृषाण काळापासूनचे मिळत असल्याची उदाहरणे असली तरी या जिल्ह्यात मात्र इतक्या प्राचीन प्रतिमा आढळल्याची उदाहरणे नाहीत. त्या प्रामुख्याने मध्यकाळातील मिळतात.
 
-प्रा. डॉ. सदाशिव देवकर
(लेखक शिक्षक आहेत)

Web Title: Saptamatrika Shilpatta of ancient sculptures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.