म्हशीच्या दूध संकलनात घट; खरेदी दरात केली दोन रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 04:12 PM2019-04-12T16:12:17+5:302019-04-12T16:14:06+5:30

गायीचे दूधही सात हजार लिटरने घटले; पाणी, चारा मिळत नसल्याचा झाला परिणाम

Reduction in milk buffaloes; A two-rupee increase in the purchase price | म्हशीच्या दूध संकलनात घट; खरेदी दरात केली दोन रुपयांची वाढ

म्हशीच्या दूध संकलनात घट; खरेदी दरात केली दोन रुपयांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे- सोलापूर शहराच्या दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या  तालुक्यात प्रामुख्याने म्हशीचे दूध संकलन होते. केगाव, टेंभुर्णी, करमाळा व बार्शी या संकलन केंद्रावर प्रामुख्याने दूध कमी झाले आहे. गायीच्या दुधाला संघ प्रतिलिटर २२ रुपये व शासनाचे तीन रुपये असे २५ रुपये शेतकºयांना मिळतात.

सोलापूर : दुष्काळाची दाहकता वरचेवर वाढत असल्याचा फटका दूध संकलनाला बसत असून, महिनाभरात एकट्या दूध पंढरीचे(सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  म्हशीचे दूध संकलन ९ हजार लिटरने घटले आहे.  संकलन घटू लागल्याने संघाने म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. गायीच्या दूध संकलनातही प्रतिदिन सात हजार लिटरची घट झाली असल्याचे सांगण्यात आले.

मागील वर्षी पडलेल्या अल्प पावसाचे परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवू लागले असून फेब्रुवारी महिन्यानंतर पाणी टंचाईची तीव्रता झपाट्याने वाढत आहे.  याचे परिणाम जनावरांवर सर्वाधिक होत आहेत. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पशुधन असल्यानेच दूध संकलन दिवसाला १२ ते १३ लाख लिटरपर्यंत होते. ही आकडेवारी जानेवारी महिन्यापर्यंतची आहे. त्यानंतर पाणी व चाºयाच्या टंचाईमुळे संकलनात वरचेवर घट होत आहे. 

एकट्या सोलापूर जिल्हा दूध संघाचे म्हशीचे दूध संकलन फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रतिदिन २८ ते २९ हजार लिटर होत होते. वरचेवर त्यात घट होऊन एप्रिल महिन्यात ते २० हजारांवर आले आहे. पाणी व चाºयाची स्थिती पाहता म्हशीच्या दूध संकलनात आणखीन घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

दूध संकलन कमी झाल्याने संघाने दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ केली असून आता दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३४ ऐवजी ३६ रुपये दिले जाणार आहेत. हा दर एक एप्रिलपासून वाढविण्यात आला आहे. 

दूध संघाच्या गायीच्या दूध संकलनातही घट झाली असून फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात ६ ते ७ हजार लिटर कमी झाले आहे. जसजशी उन्हाची तीव्रता वाढेल तसतसे दूध संकलन कमी होईल असे सांगण्यात आले. 

जनावरे जगविण्यासाठी छावण्यांचा आधार
- शेजारच्या कोल्हापूर,सांगली,सातारा, पुणे या जिल्ह्यात तसेच उजनी धरणालगतच्या भागात आजही चारा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतो; मात्र याचे नियोजन अधिकाºयांनी विभागीय स्तरावर करणे अपेक्षित आहे. एकट्या-दुकट्या शेतकºयांना दोन-चार जनावरांसाठी दूरवरुन चारा आणणे परवडणारे नाही मात्र छावण्या सुरू करून त्याठिकाणी चारा उपलब्ध करुन दिला तरच पशुधन वाचणार आहे. अन्यथा लाख-मोलाची जनावरे कत्तलखान्याला विकण्याशिवाय शेतकºयांसमोर पर्यायच नाही.

  • - सोलापूर शहराच्या दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या  तालुक्यात प्रामुख्याने म्हशीचे दूध संकलन होते.
  • - केगाव, टेंभुर्णी, करमाळा व बार्शी या संकलन केंद्रावर प्रामुख्याने दूध कमी झाले आहे. 
  • - गायीच्या दुधाला संघ प्रतिलिटर २२ रुपये व शासनाचे तीन रुपये असे २५ रुपये शेतकºयांना मिळतात.

काही ठिकाणी जनावरांसाठी आवश्यक तेवढेही पाणी मिळेना झाले आहे. मका २३०० रुपये क्विंटलनेही मिळत नाही. अशी सध्याची स्थिती असल्याने दूध संकलनावर परिणाम होत आहे. एप्रिलअखेर व मे महिन्यात याचे परिणाम अधिक जाणवतील.
- सतीश मुळे
व्यवस्थापकीय संचालक,
दूध पंढरी

Web Title: Reduction in milk buffaloes; A two-rupee increase in the purchase price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.