गरिबी; प्रेरणा की अडथळा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 02:15 PM2019-03-14T14:15:32+5:302019-03-14T14:18:08+5:30

उन्हाळ्याचे दिवस असावेत. सकाळच्या सत्रातील शाळा सुरू झालेली. माझी गाडी शाळेच्या गेटच्या आत शिरली आणि मुलांचा एक घोळका माझ्या ...

Poverty; The impediment of obstruction? | गरिबी; प्रेरणा की अडथळा ?

गरिबी; प्रेरणा की अडथळा ?

Next
ठळक मुद्दे संकटांपुढे कच खाण्यापेक्षा त्यांच्यावर स्वार होऊन पुढे जात राहणं हे केव्हाही श्रेयस्कर समोर अंधार असला तरी त्यापुढे उजेड असतो, यावर विश्वास असला की संघर्ष आणखी सुकर

उन्हाळ्याचे दिवस असावेत. सकाळच्या सत्रातील शाळा सुरू झालेली. माझी गाडी शाळेच्या गेटच्या आत शिरली आणि मुलांचा एक घोळका माझ्या दिशेने धावत आला. ‘गुर्जी, आरज्यानं शाळा सोडून दिली.’ एकानं धापा टाकत खबर दिली. ‘तुमाला कुणी सांगितलं?’ ‘तोच म्हणला स्वता’, ‘बरं ठिकंय, बघतो मी. तुम्ही जा परिपाठाला. मुलांना कसंबसं पिटाळून लावलं. मी विचार करू लागलो.

र्जुनसारख्या मुलानं शाळा का सोडून दिली असावी? तसा तो रेग्युलर येणारा, अभ्यासू मुलगा. अशी कोणती परिस्थिती उद्भवली असावी त्याच्याबाबतीत? मी त्याच्या घरी गेलो. घरी अर्जुन नव्हताच. त्याची आई चुलीपुढे बसलेली. मी विचारल्यावर मला म्हणाली, ‘तेचा बा पेताडा हाय. घरात खायला आन न्हाय आन शाळा शिकून काय करायचं?’ मला धक्काच बसला. मी म्हटलं, ‘अर्जुनला कामाला लावलं तर तोही पुढे जाऊन त्याच्या वडिलांसारखाच होईल. त्याला कामाला लावणे हा उपाय नाही. उलट तुमची ही परिस्थिती पालटायची असेल तर त्याला शिकवा चांगलं. तो तुम्हाला बाहेर काढेल यातून..’ माझ्या बोलण्याचा त्या माऊलीवर बºयापैकी परिणाम झाला. दुसºया दिवशीपासून अर्जुन शाळेत पुन्हा येऊ लागला.

असे अनुभव खूपदा मला आले आहेत. परिस्थिती नाही म्हणून शाळा सोडून चरितार्थाला लागलेली लहान-लहान मुले मला दिसतात. खरं तर गरिबी ही शिक्षणाची प्रेरणा असायला हवी, पण तो शिक्षणातला अडथळा का बनतोय? मुलांना लहान वयातच चरितार्थाला लावण्याची मानसिकता का बळावत चाललीय? याच्याकडे कुणाचेच कसे लक्ष नाही. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणाचे ध्येय आपण स्वातंत्र्यापासून ठेवले आहे. पण ते अद्यापही साध्य झाले नाही. याचे कारण आपण प्रश्नांच्या मुळाशीच जायला तयार नाही.

मी लहान असताना आमच्या शेजारी एक काकू होत्या. त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. त्याच्या उलट परिस्थिती आमची होती. दहा बाय दहाच्या भाडोत्री घरात आम्ही चार भावंडे व आई-वडील राहायचो. काकूचा मुलगा माझ्याच शाळेत शिकत होता. तो अभ्यासात फारच मागे असायचा. मी मात्र वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी होतो. काकू म्हणायच्या, ‘तुम्ही गरीब आहात म्हणूनच तुमची मुले हुशार आहेत, आमच्या मुलांना सगळं मिळतंय म्हणून त्यांना कशाचीच किंमत नाही. आज मी स्वत: पालक आहे आणि त्या काकूच्या वेदना अनुभवतो आहे. मुलांना सगळं वेळच्या वेळी मिळत गेलं की, त्याची किंमत कळत नाही हे अगदी खरं आहे. आयुष्यात संघर्ष वाट्याला आलाच पाहिजे. त्याशिवाय उन्नती होत नाही. जगभरातले अनेक महापुरुष संघर्षामुळेच घडले आहेत.

परिस्थितीला शरण जाऊन शिक्षणापासून दुरावलेली मुलं पाहिली की खूप दु:ख होतं. संकटांपुढे कच खाण्यापेक्षा त्यांच्यावर स्वार होऊन पुढे जात राहणं हे केव्हाही श्रेयस्कर असतं. समोर अंधार असला तरी त्यापुढे उजेड असतो, यावर विश्वास असला की संघर्ष आणखी सुकर होतो. दरवर्षी आमच्या शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असतो. या दिवशी विद्यार्थी खूप भावुक होतात. शिक्षकांना भेटवस्तू आणतात, मी मात्र दरवर्षी त्यांना सांगतो, मला भेटवस्तू देऊ नका. मला भेटभीट यायचीच असेल तर एक करा. तुमच्यापैकी कोणीही किमान बारावीपर्यंत तरी शाळा सोडू नका. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असेल. मुले खूश होतात. काही जणांवर याचा अपेक्षित परिणामही होताना दिसतो.

समाजातही आज अनेक स्वयंसेवी संस्था या दिशेने प्रयत्न करताना दिसतात. ही निश्चितच आशादायी बाब आहे. आमच्यावेळी ही चळवळ क्षीण स्वरूपात होती. मला आठवतं, आमच्या शाळेत गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी नावाची योजना असायची. दरवर्षी वर्षाच्या शेवटी मुलांना आवाहन केले जायचे की, ज्यांच्याकडे कोºया वह्या शिल्लक आहेत त्यांनी त्या शाळेत जमा कराव्यात. अशा वह्यांची पाने काढून त्यांच्या नव्या वह्या तयार केल्या जायच्या. त्या गरीब विद्यार्थ्यांना वाटल्या जात असत. 

आज परिस्थिती बदलली आहे. आपणाला फक्त वस्तुदानाच्या स्वरूपात काम करून चालणार नाही. मानसिकता बदलण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर करावे लागणार आहे. खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर, वीटभट्ट्यांवर काम करणारी असंख्य मुले दिसतात. त्यांच्यासाठी काम करणे हे आव्हानात्मक आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शासन, शिक्षक, पालक आणि स्वयंसेवी संस्थांची वज्रमूठ आवळणे काळाची गरज आहे.
डॉ. प्रेमनाथ रामदासी, अकलूज
(लेखक प्राथमिक शिक्षक आहेत) 

Web Title: Poverty; The impediment of obstruction?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.