'Please vote for anyone, I have come to tell Shivsena's social commitment', aditya thackeray in solapur | 'मतदान कोणालाही करा, मी शिवसेनेची सामाजिक बांधिलकी सांगायला आलोय'
'मतदान कोणालाही करा, मी शिवसेनेची सामाजिक बांधिलकी सांगायला आलोय'

सोलापूर : मी येथे तुमची मते मागायला आलेलो नाही, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, मतदान कोठेही करा असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनेची सामाजिक बांधिलकी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आलो असुन, दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शिवसेनेचं नाव घ्या. शिवसेना तुमच्या सेवेसाठी सज्ज राहील, असा आत्मविश्वास युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पशुखाद्याचे वाटप व पाण्याच्या टाकीचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार रविंद्र गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर, सेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अस्मिता गायकवाड, शैला स्वामी, जि.प सदस्या शैला गोडसे, पोखरापूर पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले, पुष्कराज पाटील आदी उपस्थित होते. 
मोहोळ तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मोहोळ तालुका शिवसेनेच्यावतीने सारोळे येथे धावता दौरा आयोजित केला होता. आदित्य ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून दुष्काळाबाबत विचारपूस केली. उद्धव ठाकरे यांनी मला ग्रामीण भागात पडलेल्या दुष्काळी भागाचा दौरा करुन शिवसेनेच्या माध्यमातून जी मदत करता येईल ती मदत करण्यासाठी पाठविल्याचे सांगितले.

या भेटीत प्रारंभी पोखरापूर येथील तलावास भेट देऊन परिसरातील पाणी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. 1996 सालापासून पोखरापुर तळ्यात पाणी सोडावे या पाण्याच्या मागणीसाठी आम्ही सातत्याने संघर्ष करत आहोत. अनेकजण आले गेले, परंतु प्रश्न मार्गी लागला नाही, आपण लक्ष घालावे, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. तातडीने हा प्रश्न मार्गी न लागल्यास या पंचक्रोशीतील शेतकरी येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
यावर आदित्य ठाकरे म्हणाले, मतदान तुम्ही कोणालाही करा, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, याच्याशी काही संबंध नाही. तुमचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दोनच दिवसांमध्ये मुंबईत जाऊन जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी काम मार्गी लावण्याचे आश्वासन आदित्य यांनी दिले. 


Web Title: 'Please vote for anyone, I have come to tell Shivsena's social commitment', aditya thackeray in solapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.