पेशंट्सहो पेशन्स ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 02:29 PM2019-04-16T14:29:36+5:302019-04-16T14:30:06+5:30

अनेकदा डॉक्टर रुग्णांना वेळ देत नाहीत असा आरोप रुग्णांच्या नातलगांकडून होतो. काही डॉक्टरांसाठी हे खरे असले तरी सर्वसाधारणपणे डॉक्टर्स ...

Patients keep in patins! | पेशंट्सहो पेशन्स ठेवा !

पेशंट्सहो पेशन्स ठेवा !

Next

अनेकदा डॉक्टर रुग्णांना वेळ देत नाहीत असा आरोप रुग्णांच्या नातलगांकडून होतो. काही डॉक्टरांसाठी हे खरे असले तरी सर्वसाधारणपणे डॉक्टर्स त्याच्या आजाराची जरुरी इतकी माहिती नक्कीच प्रत्येक रुग्णाला देत असतात. उलट बºयाच डॉक्टरांचा अनुभव असा असतो की वारंवार तीच माहिती घेण्यासाठी घरातील विविध नातेवाईक अथवा मित्र हे डॉक्टरांना भेटत राहतात. पुन्हापुन्हा तेच प्रश्न विचारून भंडावून सोडतात. या नातेवाईकांपैकी बºयाच जणांना रुग्णाच्या काळजीपेक्षा मी डॉक्टरांशी बोललो हे दाखवायचे असते. उगाचच डॉक्टरांना नीट उपचार करा, असे सांगायचे असते. जणूकाही यांनी सांगितले नसते तर डॉक्टर चुकीचेच उपचार करणार होते.

डॉक्टर गरज नसताना तपासण्या करण्यास सांगतात असाही समज असतो. जसे पेजर किंवा डायल फोन मागे पडले तसेच नाडी तपासून निदान करण्याचे दिवसही गेले. निदान करताना डॉक्टरांना तपासण्याच्या मदतीची गरज असते. उलट तपासण्यांची खूप मोठी मदत उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी होत असते. असे असताना तपासण्या न करणे म्हणजे मूर्खपणा होईल. वाढत्या वयोमानामुळे डॉक्टरांकडे येणाºया वृद्ध रुग्णांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. त्यांच्यावर उपचार वा शस्त्रक्रिया करणे यात डॉक्टरांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा कस लागतो. त्यासाठी उपचारातले धोके कमी करण्यासाठी डॉक्टरांना वारंवार अशा तपासण्यांची मदत घ्यावी लागते. निदान किंवा उपचार चुकल्यानंतर कमीत कमी चाचण्या केल्या म्हणून कोणीही डॉक्टरला मेडल देत नाही. उलट शिव्याशापच मिळतात. 

सुपर स्पेशालिटीच्या या जमान्यात प्रत्येक बोटासाठी वेगळा डॉक्टर असण्याची वेळ आता आलेली आहे. जसे एखाद्या डॉक्टरचे एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य तेवढे चांगले उपचार रुग्णाला मिळण्याची शक्यता जास्त. असे असताना रुग्ण एकमेकांना रेफर करणे हे अपरिहार्य आहे.  सगळे उपचार एकाच डॉक्टरचे एकाच छताखाली करणे आता शक्यच   नाही. तेव्हा रेफरल हे पेशंटच्या भल्यासाठीच आहे हे समजून घेण्याची गरज आहे.

डॉक्टर महागडी औषधे लिहून देतात असाही आरोप होतो. मुळात डॉक्टर आणि औषधांच्या किमती याचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. औषधांच्या किमती नियंत्रित करणे हे सरकारचे काम आहे. तसेच त्या औषधांचा दर्जा वेळोवेळी तपासण्या करून राखणे हेही. आजपर्यंत तरी जेनेरीक औषधे बाजारात सहजपणे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाला शक्य झालेले नाही. अनेक वर्षांच्या अनुभवानंतर दिलेल्या औषधांमुळे रुग्णाच्या तब्येतील सुधारणा होत आहे किंवा नाही एवढे तरी डॉक्टरांना नक्कीच कळत असते. याउपर प्रत्येकवेळी डॉक्टरांच्या औषध लिहून देण्याच्या हेतूबद्दल शंका घेणाºया नातेवाईकांनी होणाºया परिणामांची जबाबदारीही स्वीकारायला हवी. स्वस्तात औषध हवे पण त्यामुळे नुकसान झाले तर डॉक्टर जबाबदार असे कसे चालेल?

आय. सी. यू. मध्ये ठेवलेला रुग्ण बरा व्हायलाच हवा, असाही अनेकांची धारणा असते. मुळात आय. सी. यू. मध्ये ठेवलेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर असते म्हणूनच त्याला तिथे ठेवलेले असते. अशा परिस्थितीत रुग्ण १०० टक्के बरा होण्याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही अनेकदा रुग्ण हाती लागत नाही. रुग्ण बरा होणे अथवा न होणे हे संपूर्णपणे डॉक्टरांच्या हातात नसतेच. तेव्हा अशी अपेक्षा ठेवणे हेच मुळात चूक आहे. मुळात आॅपरेशन कोणत्या आजारासाठी केले जात आहे, त्यात किती गुंतागुंत झालेली आहे, आॅपरेशन करतेवेळी रुग्णाची प्रकृती कशी होती यावर आॅपरेशनचा रिझल्ट अवलंबून आहे. काही वेळेला या साºया गोष्टी नियंत्रित असूनही रुग्ण दगावू शकतात. कारण वैद्यकीय शास्त्र हे गणितासारखे नाही. इथे दोन अधिक दोन मायनस चार होऊ शकतात. रुग्णाला असलेले इतर आजार, भुलेमधली गुंतागुंत, आॅपरेशनमधली गुंतागुंत, काही औषधे दुष्परिणाम याला जबाबदार असू शकतात. महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांनी पुरेशी काळजी घेऊनही या बाबी आॅपरेशनच्या वेळी घडू शकतात हे लक्षात घेणे जरुरी आहे. रुग्णांनी, नातेवाईकांनी डॉक्टर हाही मनुष्य आहे त्यास समजून घ्यायला हवे मानसिकता जपायला हवी. 
- डॉ. सचिन जम्मा
(लेखक लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत.) 

Web Title: Patients keep in patins!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.