पालकांंनो सावध व्हा, बालकांनो शहाणं व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:03 PM2019-02-15T14:03:34+5:302019-02-15T14:04:04+5:30

मी पाचवी-सहावीत असेन. शाळेला जाताना आई- बाबा कधीच पैसे द्यायचे नाहीत. मीच काय माझ्या कोणत्याच मैत्रिणीकडे पैसे नसायचे. कधीतरी ...

Parents, beware, children, be wise! | पालकांंनो सावध व्हा, बालकांनो शहाणं व्हा!

पालकांंनो सावध व्हा, बालकांनो शहाणं व्हा!

Next

मी पाचवी-सहावीत असेन. शाळेला जाताना आई- बाबा कधीच पैसे द्यायचे नाहीत. मीच काय माझ्या कोणत्याच मैत्रिणीकडे पैसे नसायचे. कधीतरी चुकून कोणाकडे तरी एखादा रुपया निघायचा.

एकदा मला माझ्या मैत्रिणीला शाळेच्या मधल्या सुट्टीत बोरं विकणारी शाळेबाहेर दिसली. छोटी छोटी मस्त बोरं! त्याला आम्ही शेंबडी बोरं म्हणायचो. पाहिल्या पाहिल्या तोंडाला पाणी सुटलं. खाण्याचा प्रचंड मोह झाला. पण पैसे? आम्ही दोघी कंगाल. पण बोरं तर खायची होतीच. मग सरळ आम्ही त्या बाईकडे गेलो आणि निर्लज्जपणे म्हणालो ‘ ओ आज्जी थोडी बोरं द्या की,पण आमच्याकडे काहीच पैसे नाहीत.’ हे ऐकल्यावर एकदा-दोनदा हाकललं पण काय कुणास ठाऊक परत बोलावून आमची चिमुकली ओंजळ उतू जाईल इतकी बोरं दिली आणि आम्ही जणू बोराची अख्खी बागच जिंकल्याच्या आनंदात तिथून निघालो. 

हा तसा त्या वयातला निरागसपणा, बावळटपणा आठवला की जाम हसू येतं आज. पण आज या वयातल्या मुलांना नको तितकं शहाणं पाहून आमच्या बावळटपणाचं सच्चा वाटायला लागतो. ज्यात कसलाही दिखावूपणा नाही. काही नकली नाही. जे आहे, जसं आहे तसं आनंदानं स्वीकारल्याच्या खुणा. त्या वेळच्या बालपणात दिसतात आणि आज उसवलेपण झाकून, छोटासा मखमली तुकडाच सगळीकडे मिरवण्याचा आटापिटा केला जातोय. असं वाटत राहतं.

आजच्या लहान मुलांचं अटीट्यूड, त्यांचे कपडे, शूजच्या निवडीतला ठामपणा, मुलीचा मेकअपचा सेन्स, आपल्या दिसण्याचा अतिविचार, सोशल मीडियातलं गुरफटणं. प्रेम, सेक्स याविषयी लहान वयातलं आकर्षण आणि नको तितकी माहिती इत्यादी.  हे असं सारं समोर पाहताना आश्चर्य आणि भीती दोन्ही उभ्या ठाकतात. बºयाचदा पालक आर्थिक परिस्थिती बेताची नसली तरी  मुलांना साºया सुख-सुविधा देण्यासाठी रक्ताचं पाणी करतात. पुढे मुलांनाही आपल्या हट्टांना मंजुरी मिळवल्याशिवाय चैन पडत नाही. यामध्ये पालकांना या गोष्टीचं समाधान असतं की, जे आम्हाला मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देतोय. पण समाधानाच्या पायात एक मोठी गोष्ट मुलांना द्यायची राहूनच जाते आणि ती म्हणजे त्यांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी त्यांना आलेले अनुभव! ते आपल्या मुलांना अशा कुठल्या अनुभवांना भीडू देत नाहीत. त्यांची जडण-घडण, त्यांंचं कष्ट, त्यांच्या अडचणी, अडचणीतून त्यांनी शोधलेले पर्याय, संकटांवर केलेली मात. या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. या अनुभवांपासून ते अनभिज्ञच राहतात. पालक स्वत:च मुलांचे कवच बनून प्रत्येक घाव झेलत राहतात. मग काय मुलांना आयुष्य गोड गोडच वाटायला लागतं.

आयुष्याची दुसरी चव चाखलीच जात नाही आणि मग जेव्हा बोर्डात मार्क कमी पडतात, हवे तिचे अ‍ॅडमिशन मिळत नाही तर कधी कधी माझ्या फोटोला फ. बी. (फेसबुक) वर लाईक मिळत नाही ही सुद्धा मोठी समस्या बनते. अशा अडचणी निर्माण होतात. तेव्हा हे अडथळे  साक्षात पर्वताएवढ्या उंचीचे भासतात. आधी कधी साधी पठारं, डोंगरं सुद्धा वाटेत आलेली नसतात आणि थेट सामना पर्वताशी म्हटलं की, गांगरायला होतं. या वयातही पालकांचाही पवित्रा बदललेला असतो. ते म्हणतात, ‘ आता मोठा झाला आहेस तू. निस्तर  तूच सगळं.’ मग सारंच जीवघेणं वाटतं. डिप्रेशन तर दबा धरुन बसलेलंच असतं. ते लगेच येतं. अस्वस्थ मन भरकटतं. मेन ट्रॅकपासून लांब जायला लागतं. 

या भरकटण्याची पाळमुळं ज्या बालपणात दडलेली आहेत, तिथूनच सावध होणं गरजेचं आहे. असं वाटतं.  त्या वयात येणारा थोडासा अभाव पुढे भरीव यश देणारा ठरतो. स्वत:चं असणं, दिसणं, स्वीकारणं, प्रत्यक्षात हातातल्या  बाबींचा, वास्तवाचा परिचय होणं हे आपल्याला आपली कुवत आणि क्षमता यांची जाणीव करुन देतं. स्वत:ला सिद्ध करण्याच्या धडपडीला आणि स्वत:चं अस्तित्व उभं करण्याच्या प्रयत्नांना तिथूनच सुरुवात होते. जी पुढच्या वाटेतल्या पर्वतांना लहान करत जाते आणि तुम्हाला मोठं करत राहते. 
- प्रा. ममता बोल्ली
(लेखिका सृजनशील युवा कवयित्री अन् साहित्यिक आहेत.)

Web Title: Parents, beware, children, be wise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.