आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि. २१ :- चिंचोली एम.आय.डी.सी. मध्ये उपलब्ध असलेल्या जागांमधून सोलापूर गारमेंट हबसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधितांनी एमआयडीसीकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंमंत्री मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिल्या.
सोलापूरमध्ये गारमेंट उद्योग मोठया प्रमाणावर आहे. एमआयडीसीकडे उपलब्ध असलेल्या मोकळया जागा या उद्योगातील उद्योजकांना जागा उपलब्ध करुन दिल्यास रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे. यासंदर्भात आज शासकीय विश्रामगृह,सोलापूर येथे मा.सहकार,पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या अक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस श्रीकांत मैंदाळे, प्रादेशिक अधिकारी किरण सोनवणे,अशोक चव्हाण, क्षेत्र व्यवस्थापक डी.एस.इंगळे, सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाचे उपाध्यक्ष नीलेश शहा तसेच सचिव अमित जैन, एमआयडीसीचे उप अभियंता सुनिल कोलप व संबधित अधिकारी उपस्थित होते.
चिंचोली एमआयडीसी मधील ओपन स्पेसमधील जागा सोलापूर गारमेंट हबसाठी देण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. तसेच सध्या विनावापर असलेली चिंचोली एमआयडीसीमधील आय.टी.आॅफीससाठी बांधलेली इमारत तसेच अक्कलकोट येथील एमआयडीसी मध्ये मोकळी जागा सोलापूर रेडीमेड गारमेट असोशिएशनला आॅफीस व ट्रेनिंगकरीता उपलब्ध करुन देण्याबाबत आढावा घेण्यात आला.
एमआयडीसीच्या विविध कामांबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी एमआयडीसीतील रस्ते दुरुस्तीबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या अशा सूचना वस्त्रोद्योग मंत्री देशमुख यांनी दिल्या.