मंगळवेढ्यातील मुस्लीम अहमदभाई आणि नवरात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 02:58 PM2018-10-12T14:58:42+5:302018-10-12T15:01:17+5:30

मंगळवेढ्याचे जयभवानी नवरात्र महोत्सव मंडळ खूप वर्षांपासून प्रसिद्ध आहे. भगवानराव सावंजी, यादव आवळेकर आदी मंडळींच्या पुढाकाराने सुरू झालेला उत्सव. ...

Muslimeh Ahmedbhai and Navaratri Festival of Mangalveh | मंगळवेढ्यातील मुस्लीम अहमदभाई आणि नवरात्रोत्सव

मंगळवेढ्यातील मुस्लीम अहमदभाई आणि नवरात्रोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवेढ्याचे जयभवानी नवरात्र महोत्सव मंडळ खूप वर्षांपासून प्रसिद्धहिंदू मुस्लीम ऐक्याचं एक उत्तम उदाहरणपुढच्या पिढ्यांना मानव्याची वाट चालायला लावणारे असेच आहे

मंगळवेढ्याचे जयभवानी नवरात्र महोत्सव मंडळ खूप वर्षांपासून प्रसिद्ध आहे. भगवानराव सावंजी, यादव आवळेकर आदी मंडळींच्या पुढाकाराने सुरू झालेला उत्सव. या सर्व उत्सवाच्या प्रक्रियेत चर्चेचं नाव होतं ते अहमद मुलाणी यांचं. नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अहोरात्र झटणारा हा माणूस. इथल्या हिंदूमुस्लीम ऐक्याचं एक उत्तम उदाहरण. माणसं पूर्वीपासून एकदिलानं, एकोप्यानं नांदत आली म्हणून माणसांचा कळप समाज म्हणून आकाराला आला.

कळपाला संस्काराचे, जिव्हाळ्याचे, त्यागाचे मूल्य चिकटले की त्याची संस्कृती निर्माण होते. ती कुण्या एकट्या दुकट्या माणसाच्या एका रात्रीतल्या प्रयत्नाने निर्माण होत नसते. अशी कितीतरी वर्षे आणि त्या वर्षांतील दिवसरात्र माणसाला झिजावे, पळावे लागते. त्यातूनच निर्माण होतो एकमेकांविषयीचा विश्वास. अथक त्यागपूर्ण परिश्रमातून असा विश्वास संपादन करून अहमद मुलाणी यांनी या मंडळाचा लौकिक वाढविला.

अर्थातच या कामी अनेकांचे हात राबत होते, परंतु अहमदभार्इंचा जो राबता असायचा तो आचंबित करणाराच, फटकळ तोंडातूनही मंत्र बाहेर पडावेत असाच. चार शिव्या खाऊनही समोरचा माणूस हसतच त्यांच्याशी जोडला जायचा. हा एक स्वभावच. असली माणसं असतात. खोटं खूप गुळगुळीत गोड बोलण्यापेक्षा, जे मनात आलं ते ओठांतून उच्चारलं आणि ज्याचं होतं तसं त्याच्यापर्यंत पोहोचवलं. असाच त्यांच्या बोलण्याचा आविष्कार. ते बोलायला लागले की समोरचा निमूटपणे जे जे उच्चार येतील ते सोसायचा आणि तेवढ्याच आदबीने आज्ञा समजून झेलायचा. म्हणूनच माणसं त्यांच्या शब्दांवर पळत राहिली. एक कार्य उभे राहिले.

गेली पन्नास वर्षे या उत्सवाने या मातीत एक श्रद्धेचे शिखर गाठले. त्या कार्याचे एक शिलेदार म्हणून अहमदभाई सदैव कंबर कसून उभे ठाकलेले असायचे. खरं तर नवरात्र हा हिंदूंचा सण. त्यात मुसलमानाचे काय काम? असा सहजच प्रश्न पडणं योग्य आहे. एका मुसलमान माणसाला यात काय कळणार? हिंदूंचे आचार वेगळे.

देवदेवतांच्या पूजेचे सोपस्कार वेगळे. कसा धागा जुळणार या सगळ्यांशी? तसं काही व्हावं हे अपेक्षेच्याही पलीकडचं होतं. पण जेव्हा अहमद मुलाणी या सर्व उत्सवाशी एकजीव झाले, तेव्हा हा उत्सवच त्यांचा एक जीव झाला. मग काय! वर्षभर आणि पुढे आयुष्यभर याच उत्सवाच्या तयारीत मग्न असा त्यांचा जीवनपट. पूजा, मिरवणूक, डेकोरेशन एक ना अनेक कामं पाहिली तर आश्चर्य वाटेल इतकं काम या माणसाने केले. त्यातूनच मग अहमद भाई हिंंदू की मुस्लीम असा प्रश्न पडावा इतके ते तरबेज झाले.
पन्नास वर्षांच्या सातत्यपूर्ण योगदानानंतर हा उत्सव आजही माणसांच्या अभिमानाचा विषय. त्या उत्सवाच्या केंद्रस्थानी असणारे अहमदभाई त्याहूनही अभिमानाची गोष्ट. एक मुसलमान हिंंदूच्या देवाजवळ इतक्या श्रद्धेनं नतमस्तक कसा होऊ शकतो? तो होतो. त्याच्या हृदयात आणि मेंदूत कसल्याही धार्मिक भिंती नव्हत्या. म्हणूनच कोणताही आडपडदा न ठेवता. केवळ आपण दुसºया धर्मात जन्माला आलो म्हणून इथं मला जोडता  येणार नाही का? हा प्रश्नच नव्हता.

माझ्या आत श्रद्धा आहे. ती अल्लाह विषयीही आहे, तेवढीच अंबिकेविषयीही आहे. प्रश्न श्रद्धेचाच येतो तेव्हा आपलं डोकं कुठं झुकतं तिथं देव उभा राहतो. श्रद्धा तिथं ईश्वर. तो अमूर्त रुपात उभा असतोच. प्रश्न आहे तो आपल्या आतल्या श्रद्धेचा. मी हिंदू आहे, ख्रिश्चन आहे. की आणखी कुणी? याला महत्त्व राहात नाही, हेच यातून सिद्ध होतं. प्रथमत: मी माणूस आहे. माझ्या आत एक हृदय आहे. त्या हृदयाच्यावर एक मस्तक आहे. त्या मस्तकातून विचारांच्या आणि चैतन्याच्या लहरी ईश्वरालाही एकाच तराजूत तोलतात. तोच खरा माणसाच्या माणूसपणाचा साक्षात्कार म्हणावा लागेल. असा साक्षात्कार अहमद मुलाणी यांच्या रूपाने मंगळवेढ्याच्या मातीत सामाजिक एकतेचा फक्त दिखाऊपणा नाही, तर प्रत्यक्षात कार्याच्या सुगंधाने दरवळत होता.

हा दरवळ २०१८ यावर्षीच अनंतात विलीन झाला. धर्मभेदाचे रान माजत असताना, ज्या माणूसपणाच्या ऊर्मीजवळ जाऊन आपण आपली जात, धर्म, पंथ, आचारभेद, विचारभेद, लिंगभेद विसरून जावं. ते कसं विसरावं हे अशा माणसांकडून शिकता येतं. माणूस गेला तरी त्याचे आयुष्यभराचे निधर्मी काम ज्यांनी ज्यांनी पाहिलंय; त्या पुढच्या पिढ्यांना मानव्याची वाट चालायला लावणारे असेच आहे.
 -इंद्रजित घुले
(लेखक कवी, साहित्यिक आहेत) 

Web Title: Muslimeh Ahmedbhai and Navaratri Festival of Mangalveh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.