एक तास जेवण.. दोन तास शुकशुकाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:17 PM2019-06-12T12:17:09+5:302019-06-12T12:20:14+5:30

‘लोकमत’ चे स्टिंग आॅपरेशन

Meals for one hour .. Two hours of suspicion! | एक तास जेवण.. दोन तास शुकशुकाट !

एक तास जेवण.. दोन तास शुकशुकाट !

Next
ठळक मुद्देशासकीय कार्यालयांमध्ये जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीतदुपारी अडीचनंतरही महसूलमध्ये कुठे अधिकारी नाहीत, कुठे कर्मचारी !

सोलापूर : दुपारचे २़१० वाजलेले़... शासन नियोजित जेवणाची वेळ संपलेली.. महसूल कार्यालयात काही रिकाम्या खुर्च्या पंख्यांची हवा खाताहेत़.. काही जण म्हणतात, समोरची गर्दी संपल्यानंतर जेवतो... काही जण दुपारचे अडीच वाजले तरी जागेवर नाहीत़...कुठे गेले अधिकारी? किती वाजता येणार, या प्रश्नाला उत्तर मिळाले़़़ ‘काही सांगू शकत नाही, समोरची गर्दी हटल्यावरच जेवतो अन् साहेबही जेवायला जातात.’

हा संवाद आणि हे विस्कळीत चित्र आहे महसूल कार्यालयातील़ दुपारच्या जेवणाची शासकीय वेळ पाळून कोण काम करतंय? बाहेर जेवायला गेलाच तर यायला किती वेळ लागतो? हा धागा धरून ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये काही कार्यालयात गर्दी दिसली तर काही ठिकाणी रिकाम्या खुर्च्या अधिकारी-कर्मचाºयांविना पंख्याची हवा खातानाचे निदर्शनास आले़ चक्क सर्वप्रकारचे दाखले देण्याच्या सेतू कार्यालयातही सर्वसामान्यांची दुपारी अडीच वाजता गर्दी दिसली आणि काही कर्मचाºयांच्या खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या़ काही शासकीय कार्यालयात शासनाने जेवणाची निश्चित वेळ न पाळता सोयीनुसार जेवण आणि सोयीनुसार काम करतानाची स्थिती दिसून आली़ काही कार्यालयांमध्ये दुपारी तीननंतरही खुर्चीवर दिसत नव्हते़ हीच स्थिती कृषी, मत्स्यपालन, निबंधक कार्यालय, भूजल कार्यालयात दिसून आली़ वेळा पाळण्याची अंमलबजावणी करायची कोणी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे़ 

जेवणाच्या सुटीबाबत काय आहे शासकीय आदेश..
- दुपारच्या जेवणाच्या सुटीच्या निमित्ताने तासन्तास ओस पडलेल्या सरकारी कार्यालयांचा हा अनुभव नवीन नाही. याबाबत शासनाने २00१ मध्ये आदेश जारी केला आहे. तरी पण असा अनुभव वारंवार येत असल्याने याला चाप बसविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने गेल्या आठवड्यात परिपत्रक जारी केले आहे. शासकीय कार्यालयात जेवणासाठी केवळ अर्धा तास वेळ दिला आहे. दुपारी एक ते दोन या वेळेत केवळ अर्धा तास जेवणासाठी मुभा राहील. जेवणासाठी विभागातील सर्वजण एकाचवेळी जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे. 

काय आढळले स्टिंगमध्ये
- लोकमतच्या चमूने जिल्हा परिषद, महापालिका,  महसूल कार्यालयात दुपारी एक ते दोन या वेळेत फेरफटका मारून परिस्थिती नजरेखाली घातली. जेवणाच्या सुटीत सर्व विभाग बंद होते. अनेक ठिकाणी तर दरवाजा बंद करून कर्मचारी जेवण करताना आढळले. कर्मचारी जेवण करीत आहेत म्हणून लोक कामासाठी   खोळंबून होते. काही कर्मचारी जेवणासाठी घरी गेले होते. वेळ टळून गेली तरी त्यांचा येण्याचा पत्ता नव्हता. कार्यालयात जेवण करून बरेच कर्मचारी फेरफटका मारण्यासाठी चहा कॅन्टीन, पानटपरीवर  गेल्याचे दिसून आले. 

दुपारी तीननंतरही गर्दी होती कमी (सेतू कार्यालय - दुपारी २:५५ )
- काही शासकीय कार्यालयांमध्ये ग्रामीण भागातून काम घेऊन येणाºयांची गर्दी होते़ हेच उदाहरण कृषी कार्यालय, अन्न पुरवठा कार्यालय आणि जिल्हा कोषागार कार्यालयात दिसून आले़ सकाळी १० वाजता ग्रामीण भागातील लोक बस पकडतात आणि जिल्हा परिषदेत यायला दुपारचे १२ आणि १ वाजवतात़ त्यांना जायची घाई गडबड असते, काहींना बस मिळत नाही म्हणून गडबड सुरू असते़ त्यांचे अर्ज घेऊन विषय मार्गी लावण्यात जेवणाची वेळ अडसर ठरते, असे तेथील कर्मचाºयांचे म्हणणे आहे़ 

दुपारी अडीच वाजता कोषागार कार्यालयही रिकामे (कोषागार कार्यालय - दुपारी २.३२)
- नागरी अन्न व पुरवठा कार्यालयासारखीच स्थिती जिल्हा कोषागार कार्यालयात दिसून आली़ या कार्यालयात पेन्शनर्स आणि इतर लोकांची गर्दी दिसून आली़ शासकीय नियोजित जेवणाच्या वेळी दोन वाजताही या कार्यालयात कामकाज सुरू होते आणि चक्क २़३० वाजता काही लोक जेवायला बाहेर तर काही लोक तिथेच सामूहिकरित्या टेबलावर डबे उघडून बसलेले निदर्शनास आले़ गप्पा रंगत डबे संपवले जातात आणि अर्ध्या तासात पुन्हा खुर्च्यांवर बसून कामकाजाला सुरुवात केली जाते़ येथेही कर्मचाºयांशी संवाद साधला असता जेवायची वेळ निश्चित नसल्याचे सांगितले जाते़ 

अन्न पुरवठा कार्यालयात दुपारी दोननंतर जेवण (अन्न पुरवठा कार्यालय -  दुपारी २़ ०४ )
- प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीमधील नागरी अन्न पुरवठा कार्यालयात चक्क २ वाजून ४ मिनिटांनी येथील कर्मचारी जेवायला बसलेले दिसून आले़ प्रत्यक्षात जेवणाची शासकीय वेळ ही दुपारी १़३० ते दुपारी २ ही निश्चित करण्यात आली आहे़ याबाबत येथील एका कर्मचाºयाशी संवाद साधताच म्हणाले, ‘काम घेऊन येणाºयांची संख्या खूप आहे़ त्यांचे विषय संपवण्यात वेळ जातो आणि जेवणाची वेळ निघून जाते़ त्यांना समोर थांबवून जेवणार कसं साहेब?़़़’

झेडपीत दिसला टेबलावर डबा
- झेडपीमध्ये आज स्थायी समितीची बैठक असल्याने पदाधिकारी व सदस्यांची वर्दळ दिसून आली. त्यामुळे सर्व विभागाचे प्रमुख कार्यालयात हजर होते. दोन वाजता विविध विभागांना भेट दिल्यावर काही जण जेवणखान आटोपून फेरफटका मारण्यास बाहेर गेल्याचे दिसून आले. समाजकल्याण विभागात तीन कर्मचारी जेवण करीत होते. प्रवेशद्वारावर असलेल्या कर्मचाºयांकडे वसतिगृहाचे काम कोणाकडे आहे, असे विचारल्यावर ते काय आत जेवत आहेत, असे उत्तर दिले. कृषी व आरोग्य विभागात महिला कर्मचारी जेवण करीत असताना दिसल्या. मात्र डॉ. हागरे यांची केबिन बंद दिसली. बांधकाम व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी जेवणखान आटोपून आपल्या कामात व्यस्त झाल्याचे दिसून आले. 

वाट पाहून पाहून कट्ट्यावरच मारला ठिय्या...
- शासकीय कामासाठी आल्यानंतर तलाठी व कर्मचारी यांची भेट होत नसल्याने यावेळी अनेक नागरिक व शेतकरी वैतागलेले दिसून आले. त्यामुळे दुपारच्या वेळी त्यांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या कट्ट्यावरच सुमारे दीड तास बसून ठिय्या मारला. कर्मचारी व तलाठी यांना कामाचे वेळ व ठिकाण निश्चित करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Meals for one hour .. Two hours of suspicion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.