मराठी गझल समृद्ध होतेय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 02:11 PM2019-01-19T14:11:20+5:302019-01-19T14:15:23+5:30

गझल हा एक सर्वांगसुंदर असा काव्यप्रकार.. मराठीतही आता हा प्रकार लोकप्रिय होतोय. अरबी, पारशी, उर्दू, हिंदी आणि मराठी असा ...

Marathi ghazal is rich ..! | मराठी गझल समृद्ध होतेय..!

मराठी गझल समृद्ध होतेय..!

googlenewsNext
ठळक मुद्देआजमितीस मराठीत दोन-अडीचशे गझलकार तंत्रशुद्ध गझलरचना करताहेतगझलकारांना लिहिते करण्यासाठी गझल मुशायºयांबरोबरच गझल लेखन कार्यशाळा घेतल्या जाताहेतजणू मराठी गझलांना समृद्ध करण्याचा विडा यांनी उचललाय, असंच म्हणावं लागेल

गझल हा एक सर्वांगसुंदर असा काव्यप्रकार.. मराठीतही आता हा प्रकार लोकप्रिय होतोय. अरबी, पारशी, उर्दू, हिंदी आणि मराठी असा जरी मराठी गझलचा प्रवास झाला असला तरी आपला अस्सल मराठमोळेपणा मराठी गझलेने जपला आहे. कवी माधव ज्युलियन यांनी गझल सर्वप्रथम मराठीत आणली.

गझलांजली हा पहिला मराठी गझलसंग्रह प्रकाशित केला. त्यानंतर अनेक तत्कालीन व नंतरच्या अनेक कवींनी हा काव्यप्रकार हाताळला. कविवर्य सुरेश भटांनी गझल या काव्यप्रकाराला तंत्रशुद्ध अशी बाराखडीची जोड देऊन स्वत: अनेक उत्तमोत्तम गझलरचना तर केल्याच, पण इतर समकालीन कवींनाही गझल लेखनाबद्दल मार्गदर्शन केले. त्यांची गझलेची बाराखडी ही अजूनही समस्त नव्या व जुन्या गझलकारांसाठी एखाद्या दीपस्तंभासारखे कार्य करीत आहे.

जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाºया पिढ्यांशी बोलतो आम्ही
अशा रचनांमधून त्यांनी मराठी गझलेच्या प्रश्नचिन्हावर भाष्य केलेय. एवढंच नव्हे तर गझल या काव्यप्रकाराला लोकमान्यतेबरोबरच राजमान्यताही मिळवून दिली. आता खरोखरच गझलांच्या एकाहून एक जबरदस्त विजा घेऊन आलेल्या गझलकारांची एक मोठी फौज तयार झालीय. अनेक गझल मुशायरे, गझल संमेलने पादाक्रांत करताहेत. ही मराठी गझलेच्या दृष्टीनं सुखावह बाब आहे. पूर्वी गझलेमध्ये प्रेम या विषयाला प्राधान्य होतं, अन्य विषय क्वचितच गझलेच्या शेरात डोकावत असत. पण नंतरच्या काळात मराठी गझलेने आपला चेहरामोहराच बदलून टाकला.

शेतीप्रधान देशा दे एव्हढेच उत्तर
केव्हा बुडेल माझी डाळीत पूर्ण भाकर
अशाप्रकारचा शेर जेव्हा सतीश दराडे लिहितो तेव्हा खरोखरच याचं प्रत्यंतर येतं.
अनेक वैविध्यपूर्ण विषय आणि आशय मराठी गझलेमध्ये येताहेत. आता गझल विविध प्रवाहात लिहिली जातेय. एकप्रकारे गझलेच्या संक्रमणाचा काळच आता आला आहे, असं वाटतं. 

अनेक गझलकारांच्या गझला आता चित्रपटांमधून, मैफिलींमधून सादर होताहेत. नवनवीन शायर तर उदयास येताहेतच, त्याचबरोबर नव्या दमाचे गझल गायकही उदयास येताहेत. ही मराठी गझल रसिकांच्या दृष्टीने पर्वणीच होय.
 कशाला व्यथांची मिरवणूक नुसती
बघ्यांचीच होते करमणूक नुसती
या सुप्रिया जाधव यांच्या रचनेला आपल्या गझल गायकीने चार चाँद लावणारे राहुलदेव कदम असोत वा
हासणे हे जरीही स्वभावात आहे
जिंदगी भाकरीच्या दबावात आहे
अशा किरणकुमार मढावी यांच्या अस्सल वैदर्भीय गझलेला स्वरबद्ध करून त्याला स्वर्गीय आवाजात सादर करणारे रूद्र कुमार असोत, मराठी गझलेला एका उंचीवर नेण्याचे काम ही सारी मंडळी करताहेत.

जळणाºयाला विस्तव कळतो, बघणाºयाला नाही
जगणाºयाला जीवन कळते, पळणाºयाला नाही
या नितीन देशमुखांच्या गझलेला तर गझलनवाज भीमराव पांचाळेदादांनी गाऊन त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन बसविले आहे.
आजमितीला चंद्रशेखर सानेकर, जयदीप जोशी, गणेश नागवडे, संतोष वाटपाडे, गोविंद नाईक, शुभानन चिंचकर, वैवकु, सतीश दराडे, इंद्रजित उगले, सचिन क्षीरसागर या पुरुष गझलकारांबरोबरच शिल्पा देशपांडे, रत्नमाला शिंदे, ममता सिंधुताई, सुप्रिया जाधव अशा स्त्री गझलकारांनी आपापली वेगळी शैली निर्माण करून मराठी गझल अधिकाधिक वैशिष्ट्यपूर्ण व लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. इतरही अनेक नवे-जुने गझलकार आपापल्या परीने मराठी गझलेचा परीघ विस्तारण्याचे काम करीत आहेत. त्या सर्वांचा नामोल्लेख करणे अशक्य आहे.

आजमितीस मराठीत दोन-अडीचशे गझलकार तंत्रशुद्ध गझलरचना करताहेत, ही खूपच समाधानाची बाब आहे. गझलरंग, ब्रह्मकमळ, करम, गझलसागर प्रतिष्ठान, ध्यास गझल, गझल तुझी माझी, ध्येयाचा प्रवास, अशा विविध गझल मुशायºयांचे आयोजन करणाºया मंडळींनी गझलकारांना व्यासपीठ मिळवून दिलेय. अनेक नवीन गझलकारांना लिहिते करण्यासाठी गझल मुशायºयांबरोबरच गझल लेखन कार्यशाळा घेतल्या जाताहेत. जणू मराठी गझलांना समृद्ध करण्याचा विडा यांनी उचललाय, असंच म्हणावं लागेल. 
- कालिदास चवडेकर
(लेखक हे गझलकार आहेत)

Web Title: Marathi ghazal is rich ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.