Manashakti's report: Women's staff in Boise Hospital, unutilized; Solapur Municipal Commissioner Avinash Dhakane takes action | लोकमतच्या वृत्तानंतर बॉईस हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी कार्यमुक्त, सोलापूर मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांची कारवाई 
लोकमतच्या वृत्तानंतर बॉईस हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी कार्यमुक्त, सोलापूर मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांची कारवाई 

ठळक मुद्देशारदा गणेश घंटे यांना सेवेतून कार्यमुक्त करण्याचा आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला ‘लोकमत’ने याबाबत २८ डिसेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने फाईल बाहेर काढलीमनपाच्या फसवणूकप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी करावी, अशी शिफारस मनपाच्या विधान सल्लागारांनी केली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : मनपा सेवेत असलेली सासू मरण पावल्यावर तिची मुलगी असल्याचे भासवून आरोग्य खात्यात नोकरी मिळविलेल्या शारदा गणेश घंटे यांना सेवेतून कार्यमुक्त करण्याचा आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिला आहे.
याबाबत अयाज शेख यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. बॉईस प्रसूतिगृहातील सफाई कामगार मालन घंटे यांचे २ डिसेंबर २००० रोजी निधन झाले. त्यामुळे १० जानेवारी २००१ रोजी त्यांचे नाव मनपा सेवेतून कमी करण्यात आले. त्यानंतर शारदा गणेश घंटे यांनी ६ आॅगस्ट २००१ रोजी लाड कमिटीच्या शिफारशीनुसार मनपात नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालन यांची मुलगी असल्याचे नमूद केले आहे. तत्कालीन आयुक्तांनी ४ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांच्या अर्जाला मान्यता देऊन पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण आरोग्य विभागाकडे पाठविले. त्यावर ११ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांची सफाई कामगार म्हणून विभागीय कार्यालय क्र. १ कडे नियुक्ती करण्यात आली. पुन्हा ६ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांची बॉईस प्रसूतिगृहाकडे बदली करण्यात आली. 
याबाबत शेख यांनी तक्रार केल्यावर चौकशी सुरू झाली. लेखापरीक्षकांनी फेरतपासणी करून ४ आॅक्टोबर २०१७ रोजी अहवाल दिला. त्यात शारदा गणेश घंटे यांचे खरे नाव शारदा उमेश घंटे असून मालनबाईच्या सूनबाई आहेत. १९ जुलै २०१२ रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माझ्या आईच्या ठिकाणी नोकरी मिळावी, असे नमूद केले आहे. वास्तविक त्यांच्या आईचे नाव मृदिका, वडिलांचे नाव अर्जुन वाघमारे आहे. त्यांचे पती उमेश हे मनपाच्या जयभवानी हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. 
-------------------
लोकमतच्या वृत्ताने कारवाई
- चौकशीची फाईल पडून होती. ‘लोकमत’ने याबाबत २८ डिसेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने फाईल बाहेर काढली. शारदा यांनी मंद्रुप येथील महात्मा फुले शाळेत आठवीपर्यंत शिकल्याचा दाखला दिला आहे. पण त्या कधीच शाळेत गेलेल्या नाहीत, असे त्यांच्या भावाचे म्हणणे आहे. त्यामुळे मनपाच्या फसवणूकप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी करावी, अशी शिफारस मनपाच्या विधान सल्लागारांनी केली आहे. 


Web Title: Manashakti's report: Women's staff in Boise Hospital, unutilized; Solapur Municipal Commissioner Avinash Dhakane takes action
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.