आॅनलाइन लोकमत सोलापूर
माळीनगर दि ११ : लोणंद-फलटण-पंढरपूर या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेला सुरुवात झाली आहे़ याबाबत खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती आल्याचे भारतीय रेल्वे पुणे येथील सर्वेअर मुकुंद खिलारी यांनी सांगितले़
अधिक माहिती देताना मुकुंद खिलारी म्हणाले, पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गाचा सर्व्हे जी़ पी़ एस़ म्हणजेच ग्लोबल पोझिशन सिस्टीमद्वारे केला जातो़ या सिस्टीममुळे सॅटेलाइटवरून ज्या भागाचा सर्व्हे चालू आहे तेथील चढ, उतार व सर्व भौगोलिक परिस्थितीची माहिती कार्यालयात कळते़ त्या माहितीच्या आधारे रेल्वेलाईन नकाशा तयार केला जातो़ यापूर्वी इंग्रजांच्या काळात या रेल्वे मार्गाचा सर्व्हे झाला होता, परंतु तो सर्व्हे नॅरोगेजचा झाला होता़ आता हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग होणार आहे़ त्यामुळे पुन्हा सर्व्हे काम चालू केले आहे़ फलटणपर्यंतच्या सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे़ पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात आहे़ त्यामुळे वर्षभरात प्रत्यक्ष रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे मुकुंद खिलारी यांनी सांगितले़ 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.